Literature

सार्थ मंत्रराज

।। श्रीराम समर्थ ।।

यो ब्रह्माण विद्ध्याति पूर्व
यो वै वेदांश्र्च प्रहिणोती तस्मै
तं ह देवमात्म बुद्धी प्रकाशं
मुमूक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये ।।

नमो बह्मादीभ्यो ब्रह्मविद्या सम्प्रदाय कर्तृभ्यो
वन्शऋषिभ्यो नमो महदभ्यो नमो गुरुभ्या: ।।

सर्वोपफ्लवरहीत प्रज्ञानघन प्रत्यगर्तो
ब्रह्मेवाहमस्मि ब्रह्मेवाहमस्मि ।।

गुरु गणपति दुर्गा भास्करं शिवमच्युतं
ब्रह्मण गिरीजा लक्ष्मी वार्णी वंदे विभूतये ।।

गुरुराजा…

आज,
नमः शांताय दिव्याय, सत्यधर्मस्वरुपिणे ।
स्वानंदामृत तृप्ताय, श्रीधराय नमोनमः ।।
ह्या गुरुमंत्राचा अर्थ सांगावा अशी तुमची प्रार्थना आहे ना? असो हरकत नाही ! हा गुरुमंत्र. तत्व गुणातिती गुरु: गुरु शब्दाचा अर्थ ह्मणजे तत्व सांगणारा, असा आहे. तत्व ह्मणजे सत्य सांगणारा खरे सुख कोणते हे सांगणारा
‘गुकारश्र्च अंधकारश्र्च’ गुरु मंत्रात दोन अक्षरे आहेत.
पाहिल्या अक्षराचा अर्थ,
गुकारश्र्चन्धकारश्र्च रुकास्तदविनाशकृत
अंधकार विनाशत्वात गुरूरीत्यभिदीयते ।।
पहिले अक्षर अंधकार, अज्ञान, तम ह्या सर्वांचा अर्थ एकच. रुकारामध्ये अग्निबीज आहे. रं हे अग्निबीज असल्याने अज्ञान अंधकार नष्ट करणारा तो गुरु होय.
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शालकया ।
चक्षुरुंमिलीतं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।।
अज्ञान, अंधकार, तम ह्या सर्व शब्द प्रयोगाचा अर्थ एकच आहे. ह्याकरीता डोळे झाकलेल्या व्यक्तीला कोणतीच दिशा दिसत नाही म्हणुनच “ज्ञानांजन शलाकया”. ह्या झाकलेल्या डोळ्यांना उघडण्यासाठी ज्ञानांजन (ज्ञानरूपी अंजन) लावणारा एक काडी घेऊन आंतमध्ये चिरतप्रकाश डोळ्यांना दाखवणारा ह्मणजेच श्रीगुरुदेव होय.
म्हणुन गुरुशब्द ह्मणजे ज्ञानाचा बोध देणारा, तात्पर्य “तद्विज्ञानार्थ स गुरुमेवाभिगच्छेत” ते परब्रह्म तत्व जाणवयाचे असेल तर “स गुरु मेवाभिगच्छेत” अशा श्रीगुरूंना शरण गेले पाहिजे असे मुंडकोपनिषदात सांगितले आहे. “आचार्य प्ला रहिता” आचार्य ह्मणजे सद्गुरु ते ह्या भवसमुद्राच्या पार करणारे तारु आहेत. होडी चालवणारे नावाडी श्रीसद्गुरुच असेही ह्मटले जाते.
“भवरोग वैद्य” असेही त्यांना नाव आहे.
तद्विज्ञानार्थ स गुरुमेवा भिगच्छेत ।
समित्पाणि: श्रोत्रीयं ब्रह्मनिष्ठ ।।
तस्मै स विद्वान उपसन्नाय सम्यक ।
प्रशांत चित्ताय समान्विताय ।।
येनाक्षरं पुरुषं वेद सत्य ।
प्रोवाच तां तत्वतो ब्रह्मविद्याम ।।
शिष्याने हात जोडुन हातात समिधा घेऊन श्रीगुरूंना शरण जाणे हे पावित्र्याचे द्योतक आहे.
“तद्विज्ञानार्थ स गुरुमेवा भिगच्छेत”
“मुमुक्ष” – “मोक्ष इच्छु मुमुक्ष मुमुक्षानी ह्या संसार बंधनातुन विषय पाशातुन वासनेचा बंध तोडुन स्वतःला सोडवुन घेतले पाहिजे. जन्ममरणाची परंपरा सोडुन घ्या.
अंनत असणाऱ्या आनंद स्वरुपात एकरुप होऊन राहणे योग्यच. ह्याकरिता ज्याकोणाचा निश्चय होईल त्याने सद्गुरुला शरण जावे. हि ब्रह्मविद्या “गुरूगम्य शास्त्र” आहे असे ह्मटले जाते. ब्रह्मनिष्ठ असणारे सद्गुरु “शब्दे परेच निष्णांत:” “यो ब्रह्मणे वेदितव्य दोन प्रकारांनी ब्रह्म स्वरूपाचे वर्णन केले आहे. ब्रह्म दोन प्रकारचे असते. शाब्दिक व पर. “शाब्दे परे च निष्णांत:” “शब्दक्षरं परब्रह्म” सांगितल्याशिवाय कळत नाही. सांगणे आणि ऐकणे ह्यानेच जगाचा व्यवहार चालतो सांगणारा गुरु व ऐकणारा शिष्य. समजून घेतले पाहिजे व समजुन घेण्यास ऐकुन घेतले पाहिजे. ऐकून घेण्याकरता सांगणारा अनुभवीच पाहिजे. सामान्यतः कोणताही नियम असा आहे की ज्याला पूर्ण ज्ञान आहे त्यानेच तो विषय समजवून सांगावा. ज्याला माहिती नाही त्याने तो समजवून घ्यावा. ह्याप्रमाणे ह्या जगात सांगून व ऐकून सर्व व्यवहार चालता आला आहे. आई व वडील , गुरु व शिष्य “गुरुर्माता गुरुर्पिता” आई-वडील हे विद्या सांगणारे ह्मणजेच हि ऐहिक विद्या व्यवहार ज्ञान शिकवणाऱ्या गुरूंना अध्यापक असे ह्मणतात.
ब्रह्मविद्या पऱिज्ञानं ब्रह्म प्राप्ती करं शुभं ।
अन्यविद्या पऱिज्ञानं अवश्य नश्र्वरं भवेत ।।
नश्वर विद्या शाश्वत विद्या
नश्वर विद्या ह्मणजे अशाश्वत असणाऱ्या पदार्थांचे अल्पज्ञान, शाश्वत ज्ञान ह्मणजे परमात्म स्वरूपाचे पूर्ण ज्ञान. “यया तदक्षरमधिगम्यते सा विद्या” ज्या विद्येने एकाक्षरस्वरूप परब्रम्हाचे ज्ञान होते तिच पराविद्या होय. आत्मस्वरूप हे शाश्वत स्वरूपाचे असते.
“ब्रम्हात्म यो: नविचिकित्सा”
ब्रह्म ह्मटले तरी एकच, आत्मस्वरुप ह्मटले तरी एकच. आत्मा-ब्रह्म ह्या दोन्ही मध्ये भेद नाही. आत्मा ह्मणजेच ब्रह्म व ब्रह्म ह्मणजेच आत्मा. अशा प्रकारच्या अविनाशीरूप परब्रह्म स्वरूपाचे परीज्ञान त्यालाच पराविद्या, ब्रह्मविद्या किंवा अध्यात्म असे ह्मटले जाते. “अध्यात्म विद्या विद्यानां” सर्व विद्ये मध्ये अध्यात्म विद्या स्रेष्ठ. श्रीसमर्थ अशी हि सदगुरुजी लक्षणे सांगतात.
जो ब्रह्मज्ञान उपदेशी । अज्ञान अंधकार निरसी ।
जीवात्म्यया परमात्म्ययासी । ऐक्यता करी ।।
जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करुन अज्ञान अंधकार नाहीसा करतो, इतकेच काय जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य घडवुन आणतो तो सद्गुरु होय.
विघडले देव भक्त आणि भक्त ।
जीवशिवपणे द्वैत ।
तया देवभक्ता एकांत ।
करी तो सद्गुरु ।।
आत्मा व परमात्मा ह्यांच्यामध्ये भेद नसला तरी अज्ञान आवरणामुळे भेद असल्यासारखे दिसते. “जीवशिवपणे द्वैत” ह्मणजे जीवशिव ह्यांच्यातील द्वैताचे भान मात्र होते. ह्या भिन्नभावनेचा निरास करुन “तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरू” देव भक्तांचे ऐक्य घडवुन आणणारे हेच सद्गुरू.

भवव्याघ्रे घालुनी उडी
गोवत्सास तडातोडी ।
केली देखोनि सीघ्र सोडी ।
तो सद्गुरु जाणावा ।।
भव ह्मणजे संसार तो जणू काही एखाद्या वाघासारखा. “गोवत्सास तडातोडी” वाघाने उडी घेतल्यावर जसे गाय व वासरु यांच्यामध्ये वाघामुळे ताटातूट होते. एका दिशेला गाय व एका दिशेला वासरु घाबरुन पळुन जातात. तसे ह्मणजे भव ह्मणजे संसार एक प्रकारचा वाघच आहे. गाय ह्मणजे परमात्मा व वासरु ह्मणजे जीव. परमात्मा आणि जीव ह्या दोहोंमधील ह्या संसाररुपी वाघामुळे ताटातुट होऊन दोहोमधील ऐक्य नाश पावते. सामन्यतः वाघाला पाहुन गाय पळुन जाते. पण इथे परमात्मा अविनाशी निर्भय आनंद आहे म्हणुन त्याला भय काहीच नाही. “नाहि दृष्टान्ते सर्व साम्ये” दृष्टांताद्वारे सर्वप्रकारचे एकसारखे सारखे साम्य दाखवले जात नाही. “जगतः पिता” जगत्पिता ह्मणजे इथे जगाच्या सर्वही कार्याचे कारणरूप असणारा परमात्माच.
“पिता महस्य जगतः माता भ्राता पितामहः”
ह्मणजे माताहि, तोच पिताही तोच, पितामह हि तोच त्याच्यामध्ये भीती संभव नाही. त्याच्यामध्ये द्वैत वस्तूंचा वासहि नाही. “तदु नास्तेति कश्चन” सत्य ह्मणजे “तेन कोह्रती स्पर्धिन्तु” हाँ ! ह्मणजे “न तस्य कश्चित चलितान केशिता” असा परमात्मा सर्वाधीन सर्व प्रभु असा आहे त्याचे दुसरे कोणतेही कारण नाही. ते कारणाचेहि कारण आहे त्याला कोणापासून भय उत्पन्न होउ शकत नाही. “नतु तदद्वितीयमस्ति नतः समस्या भेदिकश्य विद्यते”
त्याच्यापेक्षा दुसरा, वरचढ, स्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. श्रीसमर्थांनी पिता-पुत्र सम्बन्ध इथे स्पष्ट समजवुन सांगितला आहे. ज्याप्रमाणे पितापुत्र भिन्न दिसत असले तरी त्यांच्यामध्ये अभिन्नताच अनुभवास येते, हे खालील वाक्यावरुन सिद्ध होते.
“आत्मा वै पुत्र नामासी”
“केली देखोनी सीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा”
जो पितापुत्रामधील ऐक्य प्रस्थापित करतो तो सद्गुरु
प्राणी मायाजळी पडिले । संसार दुःखे दुखवले ।।
ऐसे ज्याने मुक्त केले । तो सद्गुरु जाणावा ।।
प्राणिमात्र मायाजाळात अडकून संसाराच्या त्रिविध तापाने होरपळुन कष्ट पावत असतात, कण्हत असतात, त्यांना पाहुन ज्याला दया येते व त्या जीवाची भवसागरातुन सोडवणुक करतात ते सद्गुरु. वासना नदी महापुरी । प्राणी बुडता ग्लांती करी । तेथे उडी घालोनि तारी । तो सद्गुरु जाणावा ।।
वासनारूपी नदीच्या महापुरात सापडुन प्राणी बुडत बुडत गटांगळ्या खात असता , त्याला पश्याताप होत असता , त्यावेळी त्या महापुरात उडी घालुन त्याला तरण्याचा महत्कृत्य जो करतो तो सद्गुरु जाणावा
गर्भवास अतिसांकडी । इच्छा बंधनाची बेडी ।
ज्ञान देवोनि सीघ्र सोडी । तो सद्गुरु स्वामी ।।
गर्भवास ह्मणजे महादुःख, गर्भवास किंवा जन्म इच्छेमुळे होतो. इच्छा ह्मणजेच विषयांची वासना. “इच्छाबंधनाची बेडी” इच्छा हेच एक बंधन आहे. त्या बंधनाच्या बेडीतुन सोडवणारे निजस्वरूपी स्थिर करणारे ते सद्गुरु होत.
फोडुन शब्दाचे अंतर । वस्तु दाखवी निजसार
तोचि गुरुमाहेर । अनाथांचे ।।
शब्दांच्या आतील तत्वज्ञानाचा गाभा, महावाक्याचा गूढार्थ, स्वस्वरूपाचा अनुभव प्राप्त करून देणारे ते सद्गुरूच होत. सद्गुरु ह्या शब्दापाठीमागे केवढा मोठा गर्भित अर्थ आहे बरे ! सद्गुरूची लक्षणे कोणती, सद्गुरू कसे असतात हे आपण थोडक्यात पहिले.
मंत्र
“मननात त्राणनाचैव मन्त्रमित्यभीधीयते”
ज्याच्या मननाने अंतरी विचार स्थिर होऊन मंत्रसिद्धी प्राप्त होते, त्यायोगे ह्या भवसागरातुन तरून जाता येते तोच मंत्र.
गुकारंच गुणातीतं । रुकारं रूपवर्जितम ।।
गुकार ह्मणजे गुणातीत व रुकार ह्मणजे रूपवर्जित अशा गुणरूपविहीन निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूपाची प्राप्ति होय.
“गुणातीतमरूप च यो ददयात सद गुरूस्मृ त्या नाम रूप रहित निर्गुण निराकार अशा अनतानंद रूपाची, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ति ज्या मंत्राचे योगाने होते तो “गुरुमंत्र”.
तोच गुरुमंत्र. देवता मंत्रमय असतात, व देवता मंत्रात्मक असतात. अशा गुरूंचा मन्त्रगुरुत्त्वाचा मन्त्र-गुरु ह्मणजे नामरूपात्मक एक मनुष्य किंवा व्यक्ती नव्हे.
श्रीसद्गुरुचे ध्यान अशा प्रकारे गुरुगीतेमध्ये दिले आहे.
ब्रम्हानंद परमसुखदं केवल ज्ञानमूर्तिम
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्षणम ।।
एक नित्य विमलचलं सर्वधी साक्षीभूतं
भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तन्नामामि ।।
“ब्रम्हानंद” ह्मणजे ते ब्रम्हानंदरूपच आहे. जे आनंदरूप परब्रह्म तेच गुरुदेव ! गुरु-ब्रम्हा-भूम ह्या सर्वही शब्दात एकच अर्थ असा सर्वात बृहुत, अनंतानन्त असा आहे.
सत्य ज्ञानमनन्त ब्रह्म
ब्रह्म कसे ? सत्य असणारे ते अंनतज्ञानरूपच आहे. अशी त्याची व्याख्या आहे. “परम सुखद” परम सुख ह्मणजे “ब्रह्मविद्यान्प्रेती परं”
“ब्रह्मवित परमानप्रोती” ह्मणजे परब्रह्मच आहे. ह्मणजे ह्या सर्वांपेक्षा परब्रह्मच अधिक सुखदायक आहे. जगात तुम्ही कोठेही जा, काही प्राप्त करा,
कसलाही अनुभव घ्या, तो शाशवत असू शकत नाही. आकाशात चमकणाऱ्या विजेप्रमाणे क्षणार्धात नाहीसा होणारा तो अल्पसुखात्मक आनंद आहे.
यद्ल्पं तन्मर्त्य
ज्याला म्हणुन आकार आहे ते नाशवन्त आहे. नाशिवंन्त वस्तूंपासून उत्पन्न होणारा आनंद नाश पावणारा असतो.
हे सर्व ज्ञान श्रीसद्गुरूंकडून समजवुन घेतले पाहिजे. श्रीसद्गुरुशिवाय तरणोपाय नाही.
न गुरोरधिकं न गुरोरधिकं
न गुरोरधिकं न गुरोरधिकं
शिवशासनतः शिवशासनतः
शिवशासनतः शिवशासनतः
(गुरुगीता श्लोक)
श्रीगुरुगीता हा श्रीशिव पार्वती संवाद आहे. शिवानी स्वतःच असे सांगितले आहे. गुरूशिवाय कोणीही श्रेष्ठ नाही.
शिवाने स्वतः शासीत केलेले हे शासन आहे सर्व लेकरांच्या अंतरी हे ठसावे म्हणुन “शिवशासनतः शिवशासनतः शिवशासनतः” असे त्रिवार सांगितले आहे असे हे गुरुमहात्म सर्वात श्रेष्ठच आहे.
“गुरो: परतरनास्ति तस्मात्सम्पूजयेदगुरुम”
श्रीगुरूंपेक्षा श्रेष्ठ काही नाहीच नाही ह्मणून श्रीगुरुगीतेत मनापासून गुरुसेवा करा असे ठासून सांगितले आहे.
श्रीमत्परब्रह्म गुरु स्मरामी ।
श्रीमत्परब्रह्म गुरु स्मरामी ।
श्रीमत्परब्रह्म गुरु स्मरामी ।
श्रीमत्परब्रह्म गुरु स्मरामी ।
ह्मणजे ह्या श्लोकावरुन श्रीगुरुसेवेसाठी किती तत्परता असली पाहिजे हे सिद्ध होते. श्रीगुरूंचे समरण, श्रीगुरुंचे भजन, श्रीगुरुशी आपला सुखसंवाद व शरणागती जास्तीत जास्त घडली पाहिजे. ज्ञान विना मुक्तिपद लभ्यते गुरुभक्तीत: ।
गुरो: समानता नास्ती,
गुरो: समानता नान्यत साधनं गुरूमार्गीणाम ।।
एखादेवेळी ज्ञानोपदेश झाला नसला तरी “ज्ञानं विना मुक्तिपद लभ्यते गुरूभक्तीत: । श्रीगुरुभक्ती केली तर ….
ददामि बुद्धी योगं तं । येन मामुपयान्ति ते ।।
तेषामहं समुद्धर्ता । मृत्यू संसार सागरात ।।
असे श्रीमदभगवतगीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे गुरुभक्तीनेच आपोआप ज्ञानप्राप्ती होते.
गुरो: समानता नान्यत साधनं गुरूमार्गीणा:
गुरूमार्गीणा: मोक्षमार्गीण:
मोक्षप्राप्ती व्हावी अशी ज्यांची इच्छा असेल त्यांना श्रीसद्गुरुशिवाय गती नाही तसे ह्मणायला गेले तर ब्रम्हा, विष्णू, महेश, गणपती, देवी, सूर्य इत्यादी सर्वहि उपासकच ना? तेही श्रीगुरुरूपच.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: । गुरुर्देवो महेश्वरा:
सर्वही देवता श्रीगुरुस्वरूपच होत.
नमो ब्रम्हादिभ्यो नमो गुरुभ्य: ।
सर्वही देवता वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यामुळेच परंपरा प्राप्त झाली आहे.
श्रीगुरुमध्ये ब्रम्हा-विष्णू-महेश्वर अशा सर्व देवतांची उपासना ठेवावी. “सर्वदेवात्मको गुरु:” सर्व गुरुतत्व एकच नाही का? आनंदघनस्वरुप असे परब्रह्म अशा श्रीगुरुंचा आणखी एक मंत्र
ध्यानमुल गुरोर्मुर्ती: ।
पूजामूल गुरो: पदंम ।।
मंत्र मुलं गुरोर्वाक्य ।
मोक्षमुल गुरो: कृपा ।।

“ध्यानमुल गुरोर्मुर्ती:” ध्यानात्मास मूळ श्रीगुरुच होत
“पूजामूल गुरो: पदंम” पूजेचे परम मूळ स्थान
श्रीगुरूंचे चरणच होत. “मंत्र मुलं गुरोर्वाक्य”
मंत्राला मूल कारणीभूत ह्मणजे श्रीगुरुंवाक्यच !
“मोक्षमुलं गुरो: कृपा” मोक्षाचे मूळ ह्मणजे गुरुकृपाच
“दुर्लभा चित्त: विश्रांती: श्रीगुरो: करुणा विना”
श्रीगुरुकृपेशिवाय चित्ताला विश्रांती लाभणे परम दुर्लभता
दुर्लभो विषयत्यागा: दूर्लभं तत्वदर्शनम ।
दुर्लभो सहजावस्था सद्गुरो: करुणा विना ।।
आधी वैराग्य दुर्लभ. त्यातून तत्वज्ञान दुर्लभ. इतकेच काय अत्यन्त शांती देणारी सहजावस्था हि दुर्लभ.
असे हे आनंदघन परमात्म्याचे स्वरूप आहे. अशा ह्या दुर्लभ तत्वज्ञानाची प्राप्ती कशी बरे होणार? हे सर्वही सद्गुरुकृपेनेच सुलभ होते.
या “नमः शांताय” गुरुमंत्राच्या उपासनेत परब्रह्म स्वरूपाची प्राप्तीच सांगितली आहे.
प्रथम नमः असे पद आहे. नमः याचा अर्थ एक्यात्मक नमस्कार, एक्यच. नमस्कार ह्मणजे मी व माझे असे सर्व परमात्मपदी समर्पण.
द्वेपदे बंधमोक्षाय निर्ममेति ममेतीच
ममेति बध्यते जन्तु: निर्ममेति विमुच्यते ।।
बंध व मोक्ष ह्यास दोनच पदे कारणीभुत आहेत. “ममेती बध्यते जन्तु:” मी व माझे अशी उत्पन्न झालेली भावना तीच बधास कारणीभूत होते. “निर्ममेति” ह्मणजेच निर्मम होणे. माझे काही नाही सर्व परमात्म स्वरूपाचे आहे अशी समर्पणात्मक बुद्धी ह्मणजेच नमस्कार.
“निर्ममो निरहंकारो भूत्वा ब्रम्हीष्ठ शरणमुगम्य”
तत्वज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी प्रथम निरहंकारी झाले पाहिजे. मी, माझे हे सर्वही समर्पित करून सर्वसंग परित्यागी जीवन खऱ्या सुखाचे गमक आहे. दुःखरूप संसार सोडल्यांनंतर मग कशाचा आश्रय करावा बरे ? त्रिकालबाधित नित्यपरिपूर्ण असणाऱ्या सत्यस्वरूपाचा आश्रय करावा. त्या आनंदघन स्वरूपाशी समरस होऊन तदरुप होऊन राहणे हाच श्रीगुरुचरणी घडणारा ऐक्यात्मक नमस्कार आहे.
“नमस्कार” ह्या शब्दात एवढा मोठा गहन गर्भित मतितार्थ आहे. केवळ देहाने आडवे पडणे ह्मणजे प्रणिपात नव्हे. ती एक शारीरिक कसरतच होय.
“नमः शांताय” ह्मणजे कोणाला नमस्कार करावयाचा? “शांताय” “सर्वं खल्विदं ब्रह्म” “तेज्जलानी इति शांतमुपासीत” दुःखरूप दृश्याचा निरास करून येथे केवळ एक आनंद स्वरुपच ग्राह्य आहे.
सुवर्णाज्जायमानस्य सुवर्णत्व च शाश्र्वतम ।
ब्राह्मणोज्जायमानस्य ब्रह्मत्व च तथाभवेत ।।
(सुवर्णापेक्षा) सुवर्णा पासून बनलेले अलन्कार सुवर्णाहुन वेगळे नसतात. सुवर्णत्वच शाश्र्वत आलन्कारातले सुवर्ण अधिष्ठान रूपाने शाश्र्वत असते. कार्यामुळे ब्रह्मत्वरूपाला बाधा येत नाही. असे असल्यामुळे “ब्रम्हे वेद विश्र्वमिदं वरिष्ठ” सर्वही विश्व् ब्रह्मस्वरूपच होय. कारणरूप परब्रह्मरूपाशी कार्य अभिन्नच आहे. कारणरूप सत्ता कार्यात निहीतच असते.
“अस्ति चेत अत्सिता सत्ता ब्राह्मणी उच्चते” असे म्ह्टल्यानन्तर ते ब्रह्मच अस्तित्व रूपाने असते. कार्य हे जड स्वरूप आहे. कार्यात असणारी सत्ता हि परब्रह्मस्वरूपाचीच असते.
अस्ति भाति प्रियंरूपं नाम चेत्यशं पंचकम ।
आद्यत्रयं ब्रह्मरूप जगतरूपं ततोद्वयम ।।
अस्ति,भाति,प्रिय अस्ति ह्मणजे जगाचे असणे. पण भाती ह्मणजे जगाचा प्रत्यक्ष होणारा भास. प्रियत्व ह्मणजे दृश्य रूपात जी जी गोष्ट आवडते, प्रिय वाटते, त्यापासुन अल्पआनंद मिळतो हेच प्रियत्वाचे लक्षण होय. हे सर्वही अस्ति भाति प्रियत्व सचिदानंद सरूपच होय.
नाम व रूप – देहालाही आकारही आहेच. त्याचप्रमाणे त्याला एक नामही आहे. म्हणुनच नाम व रुप हि संग्न्या जड पिंडाला दिली जाते. परमात्म्याची प्राप्ति खरेतर नामरूपातीत आहे. दिसणारे जग दाखवला जाणारा आपला देह हे सर्वही “तज्जलानि इति शांत उपासित” तज्ज = त्याच्यापासून उत्पन्न होणारे, तल्ल = त्याच्यामध्ये लय पावणारे, तदनीति तत + अनीती = तडनीती – असे समजविणे योग्यच आहे.

“नांत: प्रज्ञ, न बहि: प्रज्ञ, नो भयत: प्रज्ञ, न प्रज्ञाघनं, न प्रज्ञ, ना प्रज्ञ, अद्रुष्टम, अव्यवहार्यम, अग्राहयम, अलक्षणम, अचिंत्यम, अव्यपदेशम एकत्म प्रत्यय सारं प्र पं चोपशम, शांत, शिव, अद्वैतम, चतुर्थ मन्यते स आत्मा सविज्ञेयं:”

ते निष्प्रपंच असणारे, अद्वैतरूपाने विलासते कोणतेही स्वप्न, सुषुप्ती किंवा कोणत्याही कार्याचे चांचल्य नसताना सदैव स्थिर असणारे निश्चल स्वरूपच होय दुसरे काहीच नसताना केवळ आपणच आनंदरूपानी अस्तित्वात असणारे ते शांत स्वरूप होय. “एकात्म प्रत्यय” काही गलबला नसताना केवळ आपल्याच अनुभवात असणारे ते स्वरूप आहे. माझ्या अनुभवात असणारे ते स्वरुप आहे. माझ्या अनुभवात माझामीच असतो. “प्रपंचोपशमं शांत” प्रपंचात असूनसुद्धा, देहसंग सुटल्यामुळे ते देहात असून नसल्यासारखे शांतच असतात. शिवस्वरूप ह्मणजे केवळ सुखरूपच होय. अद्वैत ह्मणजे अद्वैतच: “स आत्मा स विज्ञेय:” आत्मस्वरूप कसे ? ह्मणजे वर असल्याप्रमाणे समजले पाहिजे. “शांत” असे परब्रह्मस्वरूपाचे एक नाव निष्प्रपंच हे दुसरे नाव अद्वितीय स्वरूपच ते आहे. “जन्मादस्ययतः” ह्यांनीच जगाची निर्मिती झाली. जसे दागिन्यात सुवर्णाची दृष्टी ठेवावी तशीच तशीच जगामध्ये परब्रह्म स्वरूपाची दृष्टी ठेवावी.
जगामध्ये शांत स्वरूपाचेच दर्शन घ्यावे.
यच्छिद्वा मनसि प्राज्ञ:। तदिच्छे ज्ञानमात्मनि ।
ज्ञानमात्मनि मनसिनीर्यच्छेत तदिच्छेत शांतआत्मानी ।
सर्व दृश्यजात प्रपंचाचा लय बुध्दिन्त, बुद्धीचा लय “मी” अशा शुद्ध जाणिवेत, “मी” अशी केवळ स्फूर्ती पुढे “एकी हं बहुस्या” मी एकटा एक बहु व्हावे असा संकल्प ज्याला उत्पन्न झाला “सर्वहं मन्ये हिरण्यगर्भ:” ह्मणजे हिरण्यगर्भात मीच एक आहे असे केवळ भान ठेवुन बहु व्हावे हा संकल्प नष्ट करुन, शांत आनंदघनस्वरूपात लय पावून ते ‘ज्ञाप्तिमात्र’ आपणच आहोत हे ठरवले पाहिजे ह्मणजे “शांत” ह्या पदाने व्यक्त होणारा हा साधनाक्रम परब्रह्म स्वरूपाने पहिले स्फुरण ह्मणजेच “नमः शांताय”
आणखी एक मंत्राचे रहस्य समजवुन घ्यायचे असेल तर – “असित्यर्थे चतुर्थीस्यात” “नमः” हे पद जीवभावात्मक असुन त्वंमपदवाच्य आहे. गुरु असोत देव असोत वा उपास्यदेवता असोत कोणीही असले तरी. “तत्पदवाच्य” हि चतुर्थी विभक्ती “नमः” ह्या पदात येत नाही. त्याचे शब्दाने वर्णन करता येत नाही म्हणुन ते “असिपद” द्योतक. “तत्वमसि” “ते मी आहे” हाच सर्वही मंत्राचा अर्थ अशा प्रकारचे वर्णन रामातापिनी उपनिषदात सांगितले आहे.
अशा शांत स्वरूपात असणे हीच एक उपासना. नमः शांताय दिव्याय: – ते शांतस्वरूप कसे आहे ? ते स्वयंप्रकाषरूपच आहे.
न तत्र सुर्योभाति न चन्द्रतारकं ।
नेमा विद्यतो भांती कुतो यमाग्नि: ।।
तमेव भांतमनुभती सर्व ।
त्स्यभासा सर्वमींदं विभाती ।।
“न तत्र सूर्यो भाति” तेथे सूर्याचा उजेड नाही ह्मणजे सूर्यच नाही. ज्या सूर्यामध्ये सर्वांचा समावेश होतो. (चंद्रमा, तारका आदि) त्यांचेही अस्तित्व तेथे नाही.
“सूर्यात्म जगत तत्सुवश्र्च असावा दित्यो ब्रह्म” सूर्योपासनेच्या दृष्टीने परब्रह्मस्वरूप ह्मणूनच सूर्य उपासिला पाहिजे तिथे वीज ही नाही अग्नीही नाही.
“तमेवभांत मनुभाती सर्व” त्याच्या अस्तित्वावरच हे सर्वही जग भासते.
यचन्द्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकं ।
चन्द्र सूर्य आदी प्रकाश वस्तूत स्वयंप्रकाश परमात्म्याचा प्रकाश अल्प प्रमाणात प्रकाशित असतो. “उपाधि” ह्या शब्दाने निर्देश केल्यांनतर सूर्यमालेतील सर्वही ग्रहांचा प्रकाश सोपाधिक असल्यामुळे, तो परमात्म्याच्या अंशामुळे प्रकाशमान होतो. वस्तुतः परब्रह्म स्वरूप स्वयं प्रकाशमान आहे. त्याला प्रकाश देण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाची अथवा वस्तूची आवश्यकता नाही. ते ब्रह्मस्वरूपच दुसऱ्याला प्रकाशविते हा सामान्य सिद्धांत आहे.
न तत भासयते सूर्यो न शशांको न पावका: ।
यदगत्वा न निवर्तन्ते तद्दाम परमं मम ।।
(गीता अध्याय १५)
“न तत भासयते सूर्यो: सूर्यो:” सूर्य त्याला प्रकाशीत करत नाही. चन्द्रही त्याला प्रकाशीत करु शकत नाही. असे हे स्वयंप्रकाशरूप माझे परमधाम आहे.
तेच माझे निजस्वरूप होय.
ते अद्वितीय स्वरूप आहे. जसा बिंदू समुद्राला मिळाला ह्मणजे समुद्रच होतो त्याप्रमाणे त्याच्या चिन्मय दर्शनाला गेल्याबरोबर, त्याचे दर्शन घडल्याबरोबर,
दर्शन करणारा वेगळा राहत नाही, त्या स्वरूपाच्या ठिकाणी विरुन जातो. अद्वितीय स्वरूपामध्ये दुसरे काहीही राहत नाही.
स-यो-ह वै तत परम ब्रह्मवेद ब्रहमैव भवति ।
त्या परब्रह्म स्वरूपाचे परीज्ञान झाल्याबरोबर तो ब्रह्मच होतो.
जाग्रतस्वप्न सुषुप्तादि प्रपंच यत प्रकाशते ।
तत ब्रह्माह इतिज्ञात्वा सर्व बंधै: प्रमुच्यते ।।
जागृत, स्वप्न, सुषुप्ति अशा तिन्ही अवस्थातून प्रकाशमान असणारे एकमेव “चिद्रूपं ब्रह्म” ते चिद्रूपच आहे.
त्या स्वयंप्रकाश परब्रह्म स्वरुपाला सद्गुरु असे ह्मणतात.
परमात्म्याच्या सर्वही उपासना त्या स्वरूपाला धरुनच असतात.
उपासनेचा अर्थच श्रीसद्गुरुंचे सन्निध राहून श्रीगुरूंची केलेली उपासना, मग तो देहाने असो किंवा मनाने असो. आदीनारायण किंवा सदाशिव ह्यांच्यापासून ही ज्ञानाची परंपरा सुरू होते. ही परंपरा पुढे ब्रम्हा विष्णू महेश ह्यांच्यापर्यन्त पोचते. त्यांचे कार्य हे जड स्वरूपाचे असते. कार्याला प्रकाशणारी कोणतीतरी अदृश्यशक्ती असलीच पाहिजे. ती शक्ती स्वयंप्रकाशस्वरूपाची असते व सर्व कार्याला प्रकाश देते.
“दिव्यते” “प्रकाशत इति दिव्य” आपले आपणच प्रकाशरुप असणारे, स्वतःची शुद्ध जाणीव स्वरुप असे परब्रह्म स्वयंप्रकाशरूप असते.
-विज्ञानतारं केनारे वीजनिया-
अशी ती केवळ शुद्ध जाणीव अनन्तस्वरूप आपल्या अस्तित्वाने असते.
दिव्यो ह्यमूर्त: पुरुष:
स बाह्याभ्यान्तरो हयय:
ते परतत्व चराचराला आतबाहेर व्यापून परिपूर्ण असते.
“ह्यमूर्त:” हा सूर्य किंवा चन्द्र प्रकाशासारखा प्रकाश नव्हे.
तो स्फूर्तीरूप आहे.
यदत किमतयत अनूभ्योनु चं
यास्मिन लोका निहिता लोकिनश्र्च तदेतदक्षरंब्रह्म
यदते किमत अभिमत अर्बि
ते परब्रह्म स्वरूप स्वयंप्रकाशरूप आहे व महासूक्ष्म आहे.
सर्वही लोक व त्या लोकांमध्ये असणाऱ्या सर्वही देवता, मनुष्य प्राणिमात्र त्या लोकांमध्ये असणारे जे जे काही आहे ते सर्वही त्या स्वयंप्रकाशरूप परब्रह्ममुळेच
प्रकाशत असतात. जसे आरश्यामध्ये बाह्य पदार्थाचे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे किंवा सूर्यामुळे सर्वही जग प्रकाशते त्याप्रमाणे हे सर्वही घडते. कोणत्याही पदार्थामुळे सूर्यप्रकाश आवृत्त होत नाही. जसे पदार्थ ह्मणजे सूर्यप्रकाश होऊ शकत नाही तसेच सर्वांनाहि आपल्या अस्तित्वाने प्रकाशवणारे परब्रह्म त्या वस्तुपासून भिन्न असते. परब्रम्हाच्या अस्तित्वाने सर्व वस्तु दिसतात. सूर्यप्रकाशामुळे सर्वही जग दिसत असूनसुद्धा, सूर्याला आपल्यामुळे सर्व वस्तु दिसतात ह्याचे भान नसते. सूर्य सहजच प्रकाशत असतो. तसे स्वरूपही सहजच प्रकाशत असते. परब्रह्म स्वरूप स्वतःच प्रकाशणारे निरुपाधिक असते.
यदा पश्चत पश्यते रुकमवर्ण
कर्तारमीशं पुरुष ब्रह्मयोनि:
तदा विद्वान पुण्यपापे विधूय
निरंजना: परम साम्यमुपति ।।
असे असंग, परम पवित्र व शुभ्र असे स्वरुप असते. परमात्म्याचे रूप ह्मणजे जगत कारणरुप, स्वकारणरूप ब्रह्मयोनीच. मग तो विद्वान सर्वही पुण्यपापांना नष्ट करुन स्वयंप्रकाशरुप असतो. ते परब्रह्म स्वरुप सर्वाधिक, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ठ स्वरूपाचे असते. “परम साम्यमुपयति” त्या परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य घडवुन आणणारा असे “दिव्याय” हे पद ह्या श्रीगुरुमंत्रात कसे समाविष्ट झाले त्याचे विवेचन थोडक्यात केले आहे.
“सत्यधर्म स्वरुपिणे”
सर्व सत्य पर ब्रह्म
नचान्य द्वितीयामती: ।।
नैव सत्य परं प्रोक्त
मुनेर्वेदांत वादिभि: ।।

सत्य ह्मणजे काय ? सत्य ह्मणजे त्रिकालबाधीत परब्रह्मस्वरूप.
सतत एकसमान असणारे अद्वितीय रूप. स्वयंपूर्ण असते. परब्रम्हाशीवाय ह्या जगात दुसरी कोणाचीही सत्ता नाही.
कारणरूप परब्रह्म नसेल तर जगहि अस्तित्वात राहणार नाही. परब्रम्हाच्या अस्तित्वामुळेच जगाला अस्तित्व आहे.
ह्मणजेच परब्रह्म व त्याची सत्ता भिन्न नाही. परब्रम्हाचीच सत्ता जगतरूपाने दृश्यमान आहे.
हे उत्पत्तीनाशयुक्त असलेले जग, उत्पत्तीनाशरहीत परब्रह्मवस्तुमुळे दिसते कसे बरे ? दोरीवरचा भुजंगाचा भास झाल्याप्रमाणे ते दिसते मग त्याला काय ह्मणावे बरे ? जरी दोरीवर सर्पाचा भास होत असला तरी तिथे प्रत्यक्ष सर्पाचे अस्तित्व असते का ? किंवा दोरी कधी सर्प झाली आहे काय ? हे दोन्हीही सम्भवत नाही. तसेच हे जग परब्रम्हास्वरूपाच्या अस्तित्वावर असल्यासारखे भासमान होत असले तरी ते प्रत्यक्षात नसते. जर दोरीच सर्पाकार दिसत असेल तर दोरीशिवाय दुसरी वस्तु अस्तित्वात संभवत नाही. आतापर्यन्त दोरीच सर्पासारखी भासत होती.
दृश्यमानस्य सर्वस्य जगत: तत्वमिर्यते ।
ब्रह्मशब्देन तत ब्रह्म स्वप्रकाशारूपात्मकं ।।
ह्या दृश्य जगाचे मूळ तत्व , स्तवसरूप, शुद्धरूप, यथार्थरूप ह्मणजेच परब्रह्म होय. “ब्रह्म शब्देन तत ब्रह्म प्रकाशत्मकरूपमं” ते परब्रह्म ह्मणजे स्वप्रकाशरूपच आहे. ह्मणजे स्व – स्वरूपच सत्य आहे. सर्पभासामध्ये दोरीचे सत्य आहे. सर्पाचा भास हा सत्य नाही. त्याप्रमाणे ह्या चराचर विश्वात सत्य काय आहे, कोणत्या स्वरूपाचे आहे ? तर , “सत्यमेकं परंब्रह्म” सत्य एकच परब्रह्म आहे. सर्व सत्य परब्रह्म नचान्य द्वितीयामति: ।।
मूळ स्वरुपच सगळ्या शांतीसुखसमाधानाला कारणीभुत आहे. सत्य – ज्ञान – अनंत – परब्रह्म : परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती दोन प्रकारानी होते. (१) सोपाधिक (२)निरुपाधिक , (१)सगुण साकार , (२)सगुण निराकार अश्याप्रकारे उत्पत्तीनाशयुक्त असलेल्या कार्याला एकच कारणरुप असावयास हवे. मग ते उत्पत्तीनाशरहितच असणार. मग ते सत्यस्वरूपच. सत्यधर्म स्वरुपिणे :

हा सत्यधर्म आहे. “सत्यान्नापरो धर्म:” सत्याच्या अस्तित्वामुळेच आपण जगत आहोत. सत्य अस्तित्वात नसेल तर मिथ्या आरोपीत जगाला काहीच अर्थ नाही.
“निर्विष्ठान विभ्रांति: केवला – न हि तिष्ठति”
विभ्रांति, भ्रम, अज्ञान, खोटे ह्या सर्व गोष्टीना स्वतः पूर्ण आनंदरूप असे कारण निश्चित असले पाहिजे. कारणाच्या अस्तित्वाशिवाय कार्य दिसू शकत नाही.
सत्याचे अधिष्ठान असल्याशिवाय भासमान खोटे भासू शकत नाही. अशामुळे “स्थाणु-पुरुष न्यायाने मूळ स्व-स्वरुप एकच सत्य बाकीचे सोपाधिक सर्व मिथ्या”
को ह्यवानात कः प्राण्यात, यदेष आकाश आनंदो न स्यात.
“आसमंतात काशतमिति आकाश:”
सर्व जगात ओतप्रोत भरून असणाऱ्या आनंद स्वरुपाचा प्रकाश नसेल तर जगातील कोणताही प्राणी जीवंत असणे शक्य नाही. “धारणात धर्म इत्याहु: धर्मो धारायती प्रजा:”
जगाचे धारण पोषण कशाने होते तर धर्मानेच होते. त्या धर्माचे स्वरुप काय ? आनंदस्वरूप असणे हाच त्याचा धर्म आहे.
“सुखन्नविनाधर्मात तस्मात धर्म परो भवेत” धर्माशिवाय सुख नाही ह्मणजे धर्म सुखरुपच आहे. धर्माचे नित्य, शाश्वत असल्यामुळे त्यामध्ये दुःखाचा उदभव होण्याचे कारणच नाही. दुःखच नाही; दुःखाचे साधनही नाहीत. केवळ एक आनंदचा ठसा सर्वत्र उमटला आहे. ते केवळ आनंदस्वरुपच असल्यामुळे तिथे कोणत्याही दुसऱ्या गोष्टीचा समावेश होत नाही. ह्मणूनच आनंद धर्मस्वरुप झाला आहे.
“अहं ब्रह्मास्मि इत्यनुसाधनं कुर्यात” मीच परब्रह्म स्वरुप आहे, आनंदस्वरुप आहे असे अनुसंधान करावे असे ह्मटले आहे.
“सच्चीदानंदात्मानं भावयेत” सच्चीदानंद अशा आत्म्याचे ध्यान करावे. त्याच्या ध्यानात असावे ह्मणजे आत्मानुसंधाचे ध्येय साधते.
सत्यधर्म स्वरुपिणे :
यज्ञाचार दमाहिंसा
दान स्वाध्याय कर्म च ।
आयंतु परमोधर्म:
यद्योगेनात्म दर्शन: ।।
धर्माची लक्षणे खालील प्रकारांनी दिलेली आहेत.
यज्ञ, आचार, दम, अहिंसा, दान, स्वाध्याय अशाप्रकारे धर्माची लक्षणे सांगितली आहेत.
“अयंतु परमोधर्म:” हाच सर्वश्रेष्ठ धर्म. हा धर्म कोणता ? “यत योगेन आत्मदर्शनं” आत्मज्ञानाचे परीज्ञान करुन घेणे, आत्मसाक्षात्कार करुन घेणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय. “सकळ धर्मामध्ये धर्म । स्वरूपी राहणे हा स्वधर्म” ह्या सर्व धर्मांमध्ये स्वरूपी राहणे हाच मुख्य धर्म होय. धर्माचे प्रकार (१) लौकिक (२)पारलौकिक
स्वरूप हीतासाठी, जीवनासाठी जीवनासाठी कारणीभूत असलेले दान-धर्मादी व्यवहार लौकिक धर्मात मोडतात. ते लौकिक जीवन जगण्यासाठी आवश्यक
आहेत. मुख्यधर्म ह्मणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करुन घेणे हा अलौकिक धर्म होय.
अहं गुरूरीवा भामि । अहं शिष्य इवस्थित: ।।
ते परतत्व ‘अहं गुरुरिवा भामि’ स्वतः गुरुरूपाने विलसते आणि स्वतःच शिष्यरूपाने विलसते. हे उपनिषद वाक्य तेजोबिंदु उपनिषदातले आहे. हा उपदेश श्री शंकराने षण्मुखला केलेला आहे. श्री शंकर ह्मणजे गुरुरुप परब्रह्मस्वरुपच.
नमःशिवाय गुरवे सच्चीदानंद मूर्तये
निष्प्रपंचाय शांताय निरालंबाय तेजसे ।।
हे शंकराचे ध्यान आहे.
गुरु ह्मणजे मीच व शिष्य ह्मणजे मीच ह्या अवस्थेला परब्रह्म असे ह्मणता येईल. मीच गुरु मीच शिष्य असे सिद्ध झाल्यामुळे गुरु हे शिष्याचे शुद्ध स्वरूप होय.
असे असल्यामुळे “स्वरुपिणे” माझे स्वरूपच असलेल्या श्रीगुरुना नमन असो. ह्मणजे तेथे गुरुशिष्याचे ऐक्य होते. अशाप्रकारे सत्यधर्मरुपी निजरूप परब्रम्हासि “नमः” ह्या पदाचा सबंध जुळतो.
सत्यधर्म स्वरुपिणे
स्वानंदामृतरूपाय तृप्ताय श्रीधराय नमो नमः
स्वानंदामृतरूपाय असे गुरु कसे आहेत ? आनंदरूपाने आहेत. स्व-स्वरूपाचा आनंद ह्मणजे, संसारातील वस्तूंपासून मिळणार आनंद नव्हे. किंवा दुसर्या कोणत्याही प्रकारचा आनंद नव्हे.कोणत्याही जगातील वस्तूपासून मिळणारा आनंद असेल तर तो विषासमानच असतो. “विषय एवं घोरं विषं”
विषय ह्मणजे घोर असे विष असे का बरे सांगितले ? सामान्य विष ह्मणजे मारुन टाकणे, जीव घेणे असा अर्थ होतो ना ? त्यालाही एक कारण आहे. ते कोणते ? अरे ! ते विष जर पोटात गेले तर एकच देह प्राणास मुकेल. एकच जन्म वाया जाईल. पण विषयरूपी विष तसे नाही. ते परत जन्ममरणाच्या कारणाला कारणीभूत होते. ह्मणून त्याला विशेषतः घोर विष असे ह्मटले आहे.
“मुक्तिमिच्छतिचेतात, विषयान विषव्यत्त्यज”
मुक्ती पाहिजे असेल तर तुला विषयाचा विषाप्रमाणे त्याग केला पाहिजे असे अष्टवक्र गीतेत सांगितले आहे.
शंन्कोतीहैव य: रसोढू प्राकशरीर विमोक्षणात ।
कामा क्रोधोभदवं वेग संयुक्ता: स सुखीनर: ।।
देह पडेपर्यंत अथवा देहातील चैतन्य निघुन जाईपर्यंत, जे कामक्रोधदि विकारांना बळी पडत नाहीत ते सर्वश्रेष्ठ होत. “संयुक्त:” ह्मणजे तो त्या परब्रह्माशी एकरुप झाला आहे. तो युक्त होय. “स सुखी नर:” वर सांगितल्याप्रमाणे तोच एक सुखी होतो, तो परब्रह्म स्वरुप होतो.
विषयापासुन प्राप्त होणारे सुख
“परिणामे विषमिव, तत्सुख राजसं स्मृतं”
रजोगुणापासून किंवा कर्मामुळे उत्पन्न होणारे सर्वही सुख कर्मजन्य सुखच दुःखरूप असते.
“यदल्प तन्मर्त्य” हे थोडे काळ टिकणारे आहे, म्हणुन हे नाशिवंत आहे. उत्पत्ती – नाशयुक्त असणारी सर्व कार्य अल्पकाळ टिकणारी असतात. ह्यामध्ये पडणारे सुखाचे प्रतिबिंब, चंचल अशा पाण्यात पडलेल्या क्षणिक प्रतिबिंबाप्रमाणे असते. ढगांचा गडगडाट होऊन आकाशात चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशाप्रमाणे हे विषयसुख अल्प स्वरुपाचे आहे. क्षणिक प्राप्त होणाऱ्या विषयसुखालाही स्वरूपाचा आधार असतो. स्वरूपाची प्राप्ती करून घेणे हे अत्यावश्यकच असे असल्यामुळे –
“शब्द-स्पर्शादयोह्यर्था: अनर्था इवते स्थिता: ।
ऐषा सप्तास्तु भूतात्मा नः स्मरेति परं पदं ।।
शब्द-स्पर्शादि अर्थ ह्मणजे अनर्थच होत. ह्या विषयपंचकाच्या आनंदात रममाण झाल्यामुळे खऱ्या सुखाला विन्मुख होतात. ह्मणूनच विषयामध्ये आनंद झाल्याचा भास होतो. हा सुखाचा आनंदाचा भास क्षणिक स्वरूपाचा आहे असा अनुभव आल्यांनंतर निःसंग होण्यासाठी अंतरी वैराग्य उत्पन्न होते. आणि वैराग्य उत्पन्न झाल्यावर ह्या नशवर संसारात सुख नाही ह्याचा निश्चय बाणतो, कारण त्याला कळुन चुकते की हे नश्र्वर सुख शेवटी दुःखच उत्पन्न करते जे व्यमोहाला कारणीभूत ठरते.
“अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः”
त्या आत्मस्वरूपाचे परीज्ञान, परब्रह्म स्वरूपाचे परीज्ञान आवृत्त असल्यामुळे, त्याला आवरण नाही. आपण सूर्यप्रकाशात डोळे झाकुन चालत गेलो तर,
आपले डोळे झाकलेले असल्यामुळे, सूर्यामध्ये अंधःकार उत्पन्न होणे संभवत नाही. किंवा प्रकाश काही अंधार होणार नाही.आपले आत्मस्वरुप नित्य शुद्धबुद्ध आहे. त्याचेवर कशाचेही आवरण नाही हे जाणुन घेतले पाहिजे. हे ज्ञान आपल्याला नसल्यामुळे आपण जीवभावास प्राप्त झालो आहोत. विषयासक्तीमध्ये अडकल्यामुळे जन्म-मरणाच्या संसृती चक्रात सापडलो आहोत. विषयांच्या वासनेमुळे जन्ममरणाची परंपरा चालु राहते. ह्याउलट आत्मस्वरूपाच्या अनुभवासाठी देहसंग असण्याची आवश्यकता नाही.
मामुपेत्य पुनर्जन्म
दुःखालयम शाश्व्तम ।
नान्पुवंति महात्मन:
संसिद्धी परमागता: ।।
“दुःखालयं आशाश्वतं” दुःखाचे माहेरघर ह्मणजे दुःखाअंती दुःखच देणारी अशी दुःख परंपराच होय. श्री भगवान गोपालकृष्ण ह्मणतात ! मला शरण येऊन माझ्यात एकरूप झाल्यानंतर जन्ममरणांची परंपरा नाहीच.
“न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते, न स पुनरावर्तते, पुनर्नभिजायते, पुनर्नभिजायते” असे उपनिषदांचे सांगणे आहे. अशाप्रकारे विषयासक्तीमुळे मनुष्य जन्ममरणाला प्राप्त होतो. परमात्म्याच्या स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी जन्माची आणि मरणाची कशाचीच आवश्यकता नाही. खोटेच असणारे सुख प्राप्त व्हावे या आशेने मनुष्य जन्माला येतो. सत्यसुखाची प्राप्ती झाल्यानंतर जन्म येण्याचे कारणच काय ? बिलकुल नाही. कोणतीच वासना नसल्यामुळे जन्ममरणाची परंपरा संभवत नाही, अश्याप्रकारे –
इहैवतैर्जित: स्वर्ग:
ऐषा साम्ये स्थित मनः ।
निर्दोष हि परब्रह्म
तस्मात ब्राह्मणि ते स्थिता: ।।
अशाप्रकारे परब्रह्मस्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर देह असला तरी, चैतन्य असले तरी, ज्ञानी पुरुष ह्या संसारावर विजय संपादन केलेलेच असतात.
आनंदस्वरूपाशी ऐक्य पावून आनंदस्वरूपच झालेले असतात. तात्पर्य असे !
“सत्यधर्म स्वरुपिणे ।
स्वानंन्दामृत तृप्ताय ।।”
स्वानन्दातच तृप्त असणारे हे काय बरे असते?
परब्रह्मच ! ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच
आनंदाद्येव खलविमानि भूतानि जायंते
आनंदेव जातानि जीवन्ति
आनंद प्रयंत्यभि संविशंतीति ।।
(त्रैतिरीय उपनिषद – भृगूवल्ली)

आनंदामुळेच ह्या जगाची उत्पत्ती ह्मणून जग आनंदस्वरूप असून तें आनंदावरच जगते. आनंदामुळे ह्या सर्व जगाचे कार्य शेवटी आनंदातच लय पावते. ह्मणून हे सर्व आनंदस्वरूपच. अशाप्रकारे त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी असावी. कार्यामध्येहि आनन्दस्वरूपाचाच अनुभव घेऊन केवळ एक आनंदस्वरूपच होऊन राहावे.
“आनंद ब्रम्हेति व्यजानात”
आनंदस्वरूपच हे ब्रह्म स्वरूप आहे. असे हे तत्व प्रथम भृगुऋषींनी जाणले. आपण आनंदावरच जगतो. त्याच्या अस्तित्वामुळेच जीवन आहे. त्या आनंदाला दुसरी कोणतीच उपमा नाही. आनंद ह्मणजे अद्वितीयच. आनंद या शब्दाचा अर्थ जाणणारा, अनुभवातच राहु लागणारा असा होतो. “आनंद” ह्या शब्दाचा अर्थ जाणल्यानंतर, मी तो आनंदच आहे या भावनेत राहू लागल्यावर त्याला त्या अद्वितीय स्वरूपाच्या स्थितीची प्राप्ती होते. “आनंद” ह्या शब्दात एवढी अमोघ शक्ति आहे.
“स्वानंन्दामृत तृप्ताय”
त्या परब्रम्हाला स्वानंद तृप्ति हेच कारण आहे. दुसरे काहीही नाही. श्रीसद्गुरू व ब्रह्मनिष्ठ यांना हाच सिद्धांत लागू आहे.
“आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते”
“श्रीधराय नमो नमः”
“मोक्षश्रीयं धरति धारयति”
जो मोक्षश्री धारण करून दुसर्यांनाही मोक्षगामी होण्याचा अनुग्रह करतो तो श्रीधर.
हेच गुरुतत्व. हेच परब्रह्म.
ह्या श्लोकात “नमः” तीनदा आलेले आहे.
जीव आणि जगत ह्याचे भान श्रीसद्गुरूकृपेने जाऊन त्या परब्रह्मस्वरूपाशी एकरूप होणे हाच त्याचा अर्थ.
ह्या मंत्राच्या जपाने सर्वांनाहि मोक्षाची प्राप्ति होवो.

home-last-sec-img