Literature

हा खरा शूर

नेणपणें जालें तें जालें । जालें तें होऊन गेलें । (यापुढे तरी) जाणतेपणे वर्तले । पाहिजे नेमस्त ॥ (दा. १८-२-१ ) जाणत्याची संगती धरावी। जाणत्याची सेवा करावी। जाणत्याची सद्बुद्धि घ्यावी हळूहळू |||| (एकदम झाले नाही तर) कारण,

सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् । 

अन्तःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यं पश्यन्ति यतयः क्षोणदोषाः ॥ (मुण्डक उ. ३-१-५)

क्षीणदोष म्हणजे कामक्रोधादि विकारशून्य, भेदशून्य असणारे संन्यासी ज्याला आत्मरूपाने बघतात, त्या स्वप्रकाश, मायाअविद्यारहित, अत्यंत पवित्र असणाऱ्या आत्म्याची प्राप्ति सत्यस्थितीच्या पालनानें, अखंड चिदानंदरूप राहाण्याच्या तपाने यथार्थ आत्मज्ञानानें, नित्य बाळगलेल्या अस्खलित ब्रह्मचर्याने मात्र होते. या साधनाशिवाय आत्मनिष्ठा बाणणेच शक्य नाही. आतापर्यंतच्या निरूपणाने हा अर्थवाद नसून कोरीव सत्य आहे, हे कोणालाहि पटल्याशिवाय राहाणार नाही. याच अर्थाचे भगवद गीतेचे काही श्लोक पाहू.

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः । छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ भ.गी. ५-२५ 

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ भ.गी. ५-२६

कामक्रोधादि कल्मषशून्य म्हणजे पापशून्य, भेदशून्य, मनस्वी  म्हणजे ज्यांनी मन जिंकले आहे, इंद्रिये कह्यांत ठेवली आहे त्या आणि ज्यांचे चित्त रागद्वेषशून्य झाले आहे व ज्यांची सर्वत्र आत्मदृष्टि झाली असल्यामुळे जे सर्व भूतांच्याच हिताकरितां झटत असतात, ते परम पवित्र संन्यासी तें निष्प्रपंच ब्रह्म प्राप्त करू घेतात. आणि अशा या आत्मज्ञानी संन्यासांना सर्वत्र एक आनंद ब्रह्मच ब्रह्म उरलेले असते. मागच्या श्रुतीला हे श्लोक पोषक आहेत. य आत्मव्यतिरेकेण द्वितीयं नैव पश्यति ब्रह्मीभूतः सः एवंहि दक्षपक्ष उदाहृतः ॥ (दक्ष स्मृ. ७-११) आपल्या वेगळे जो कांहींच बघत नाही, तोच खरा एक ब्रह्मरूप, दक्षप्रजापतीनी आपले मत दिले आहे.

पृथ्वी तस्य प्रभावाद्वहति दिननिशं यौवने यो हि शान्तः।

ऐन तारुण्यांतच शरीरांत चांगला जोम असतानाच, जो मन इंद्रियांना जिंकून आत्मसाक्षात्काराने शान्त झालेला असतो, त्याच्याच पुण्यप्रभावानें पृथ्वी सर्व जीवांना धारण करते. इंद्रियांची शक्ति असतानाच त्यांना जिंकावयाचे असते. इंद्रियांची शक्ति खालावल्यानंतर अथवा नष्ट झाल्यानंतर जिंकायला त्यांच्यात उरतेंच काय ?इंद्रियाणां जये शूरो धर्मं चरति पंडितः । हित प्रियोक्तिभिर्वक्ता दाता सम्मानदानतः ॥असे एक सुभाषित आहे. भर तारुण्यांत इंद्रियांना जिंकणाराच खरा शूर; मोक्षधर्माचें कांटेकोर आचरण करणाराच पंडित ; सत्य आणि हिताचें प्रिय होईल अशा हातोटीनें सांगणाराच वक्ता; आणि गौरवून दान देणाराच खरा दाता; असा या सुभाषिताचा अर्थ आहे. शूर कोण याबद्दल दक्षस्मृतीत एक श्लोक आहे. बलेन परराष्ट्राणि गृह्णन् शूरस्तु नोच्यते । जितो येनेन्द्रियद्रियग्रामः स शूरः कथ्यते बुधैः ॥ ७-१८॥ स्वसैन्य व देहबलाने परराष्ट्रे पादाक्रांत केली म्हणून त्याला ज्ञाते शूर असें म्हणत नाहीत. अगदी तारुण्यांत ज्याने इंद्रियांना आणि मनाला जिंकलें त्यालाच एक शूर म्हणून ज्ञाते म्हणतात, हे लक्षात ठेवावें. श्रीशंकराचार्यानींहि प्रश्नोत्तरमालिकेत कोण शूर म्हणून प्रारंभी केलेल्या प्रश्नाला,कः शूरो यो ललनालोचनबाणैर्न व्यथितः|||| जो (वस्तुतः घाणेरड्या) ललनांच्या लोचनबाणांनी व्यथित होत नाहीं, तोच शूर असें उत्तर दिलें आहे.

प्रापणात् सर्वभोगानां परित्यागो विशिष्यते ॥ (म. स्मृ.. २-१५) सर्व भोगाच्या प्राप्तीपेक्षांहि त्यांचा त्याग श्रेष्ठ आहे.

यच्च कामसुखं लोके यच्च दिव्यं महत्सुखम् । तृष्णाक्षयसुखस्यैते कलां नार्हन्ति षोडशीम् ॥

या जगांतलें जें कामसुख आहे आणि जे स्वर्गात मिळते, तें सर्व एकवटले तरीहि कामाच्या त्यागानें अथवा कामवासनेच्या त्यागाने जे सुख मिळतें त्यांच्या षोडश कलांपैकी केवळ एक कलाभर एक-षोडशांश सुद्धा ते होणार नाही. महानारायणोपनिषदात हारुणि नांवाच्या एका मुलाने प्रजापतीकडे जाऊन श्रेष्ठ साधन कोणते असा प्रश्न केला असता, प्रथम प्रथम अकरा साधनें सांगून या संतति आदिकांपेक्षा या सर्वांचा न्यास इत्याहुः’–त्यागच श्रेष्ठ आहे, असे सांगितले आहे. सर्वांपेक्षां ‘शमवानेव राजते’–त्यागीच जगांत शोभतो, असें उपनिषदांनी आपले मत प्रकटपणे सांगित आहे; आणि तें सत्य आहे म्हणूनच राजेमहाराजे विरक्तांच्या चरणी लोटांगण घेत येतात. अष्टावक्र मुनींनी जनकास उपदेश करतांना,

न सुखं देवराजस्य न सुखं चक्रवर्तिनः । सर्व यत्सुखं वीतरागस्य मुनेरेकान्तशीलिनः ॥

विरक्तांना एकान्तांत जे सुख मिळतें, तें भूलोकाच्या चक्रवर्तीलाहि मिळत नाहीं आणि देवलोकाच्या चक्रवर्तीला म्हणजे इंद्रालाहि मिळत नाही, असे सांगितले आहे.

संन्यासाला चतुर्थाश्रम हें नाव आहे. याज्ञवल्क्य ऋषिनी ब्रह्मनिष्ठ असतांना देखील गृहस्थाश्रमाचा त्याग करून संन्यास घेतला, गृहाद्वनी भूत्वा प्रव्रजेत् असें एक विधिवाक्यच आहे. यावरून संन्यासाचे महत्व स्पष्ट होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी मैत्रेयी संन्यासिनी झाल्याचा उल्लेख आहे, उत्तर हिंदुस्थानांत

या आधारावरून विवाहित आणि कुमारिकाहि संन्यास घेतात. गार्गी नावाची एक बालसंन्यासिनी याज्ञवल्क्यांच्या वेळी होती. शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखो नरः ॥ (भ.गी. ५-२३) आयुष्याच्या भर अंत्यक्षणापर्यंत म्हणजे आमरणान्त कामक्रोधांचे दुःसह दुर्निर्वार्य वेग जो, आपल्यावर त्याचा थोडाहि परिणाम न होऊं देता, धैर्याने सहन करतो, ज्याने घातलेली विवेकाची सीमारेषा कामक्रोधांच्या पुरालाहि ओलांडवत नाहीं, जो आत्मबोधानें नित्यनिर्विकार आणि शांत असतो, तोच एक या जगांत योग्य आणि खरा सुखी म्हणून समजावें, असें जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, तें निःस्पृहांनी कधीं न विसरतां अखंड हृदयाशी बाळगूनच असावे.

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् (भ.गी. १६-२१)

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः । आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ (भ.गी. १६-२२)

काम, क्रोध आणि लोभ हीं नरकाला नेणारी तीन द्वारें आहेत. यांनी आत्मप्राप्ति होत नसल्यामुळे दुसऱ्या शब्दांत आत्मनाशांचीच हीं द्वारे अथवा साधनें आहेत. सर्व दृष्टीनेंहि यांचा समूळ त्यागच इष्ट आहे. या तीन आत्मनाशक तमोद्वारांपासून जो आपली कायमची सुटका करून घेतो, तोच आपले हित साधण्याविषयी उद्युक्त झाला असे समजावें. याच्याच हातून खरा परमार्थं घडतो, आणि हाच केवळ परमगतिरूप मोक्षास प्राप्त होतो. बरें अर्जुना ! म्हणून श्रीकृष्णांनी सांगितलेले निःस्पृहांनी तर कधींच विसरूं नये.

home-last-sec-img