Memories

१. प्रसाद

निवेदक: गोविंदबुवा गोडसे (रामदासी)

॥ श्रीराम समर्थ ॥
आदिनारायण विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकम्।
श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् ।।
नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे ।
स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ।।

नंतर स्वामीजी महाबळेश्वरमार्गे धोमला मुक्कामास आले. धोमला नृसिंहाचे जागृत स्थान असून श्रीनवनाथांचेहि स्थान आहे. गिरगांवातील श्री. रहाळकर यांनी या नवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून प्रतिवर्षी येथे येऊन नवनाथांचा उत्सव ते करीत असत. येथे श्रींच्या दर्शनास वाईतील प्रतिष्ठित मुख्य मुख्य नागरीक येऊन त्यांनी श्रींना वाईला (विराटनगरीस) येण्याचे आमंत्रण दिले व दि १३ मेस एकादशीस स्वामीजी वाईहून आलेल्या पालखीतून निघाले. वाटेत भूगांवला कृष्णतीरावरील वामनपंडिताच्या समाधीस स्नान अभिषेक करून स्वामीजी मेणवलीस नाना फडणविसांच्या वाड्यांत आले. योगायोगाने तेथे पुण्याच्या बेलबागेतील नानांचे वंशजहि त्यावेळी पुण्याहून अचानक आले होते. स्वामीजींनी सर्व वाडा फिरून पाहिला व स्वामीजी वाईच्या वेशीपाशी आले.

श्रींच्या स्वागतार्ह तेथे आठ दहा हजार स्त्री पुरुष उपस्थित होते. त्यांत प्रामुख्याने वे. मू. दत्तभट महाबळेश्वरकर, गणपतराव वैद्य, गोपाळराव सोहोनी, शिवदे वकील, गोखले डॉक्टर इत्यादि प्रतिष्ठित मंडळी होती. दीड दोन हजार सुवासिनी पंचारती घेऊन आल्या होत्या. त्यांनी श्रींना ओवाळिले. चौघडा-सनई, बँड, लेजीम ताफा, भजनी मंडळी, रा. स्व. संघातील प्रमुख स्वयंसेवक बंधु, शेतकरी, धनगर, गवळी आदि समाज प्रामुख्याने होता. धोम ते वाई या ४-६ मैलाचे रस्त्यावर त्यावेळी घनदाट झाडी होती. श्रींच्या पालखीपूढे अकरा घोडेस्वार भगवे फेटे बांधून ध्वज सांवरीत ऐटीत चालले होते. ते मोठे मनोहर व विलोभनीय दृश्य होते. धोमहून जातांना उजव्या बाजूस कृष्णाबाई वहाते तर डाव्या बाजूस पांडवगड उभा आहे. संपूर्ण भारतांत पांडवगड हा किल्ला फक्त येथेच आहे. इथेच अज्ञातवासांत पांडव एक वर्ष राहिले हाते अशी आख्यायिका आहे.

मिरवणूक सुरू झाली अन एक विघ्न निर्माण झाले. गांवात नुकतेच बदलून आलेले जंगल खात्याचे एक अधिकारी श्री. केसकर या नांवाचे नास्तिक तर्कट गृहस्थ रहात होते. ते साधूसतांची निर्भत्सना करीत. त्यांची पत्नी मात्र श्रीसमर्थ व श्रीधरस्वामी यांची एकनिष्ठ भक्त होती. तिने श्रींच्या स्वागताची तयारी केली व ती पंचारतीचे तबक घेऊन मिरवणुकीत सहभागी होण्यास निघाली. पण पतिराजांनी विरोध करून नकार दिला व ‘मीच पहातो इथे गावांत मिरवणुक कशी काय निघते ते’ ! असे म्हणून राव मोठया तोऱ्यांत निघाले ते खूप वल्गना करीतच. रस्त्यावर आता प्रसंग बाका होता. काही गुंडहि ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने त्यांत सामील झाले अन् खरेच विपरीत घडले.

अकस्मात धावपळ सुरू झाली. संपूर्ण वाई गांवात अग्या मधमाशांचे मोहोळ उठल्याची वार्ता पसरली. अन स्त्रिया मुले जीव मुठीत धरून घरच्या रस्त्याला धावू लागली. पालखीचे भोई गडबडले. स्वामीजी स्वतः पायउतार होऊन झपाझप पावले टाकीत विष्णुमंदिराकडे निघाले. चौकशी करता कळले की, विष्णुमंदिरातील एका जागी श्रींच्या प्रवचनासाठी ध्वनीक्षेपक लावतांना त्यांची तार इलेक्ट्रिशियनने उंच फेकली. ती मंदिराच्या वरच्या बाजूस असलेल्या मोठ्या मोहोळावर आदळून क्षणार्धात तेथील सर्व मोहोळ उठली व लाखोंनी मधमाशा आसमंतात घोंगाऊं लागल्या. मिरवणूक विस्कळीत झाली. स्वामीजी स्वतः तेथे जाऊन खांबावर चढून त्यांनी वायरमनला घोंगडी पांघरवून खाली घेतले व त्या सहस्रावधी माशांना म्हणाले, “बाळांनो! तुमच्या जीवनात चुकून व्यत्यय आला याबद्दल या मुलांच्या वतीने मी क्षमा मागतो. तुम्ही आता तुमच्या घरटयांत, मोहोळांत परत जा. तुम्ही सर्व दूर दूर फिरून आमच्यासाठी मध गोळा करता केव्हढे हे जगावर उपकार ! अन तो मध तुम्ही तर कणभरही सेवन न करता साऱ्या रुग्णांना, गरजूना देता. धन्य आहे तुमची!!” अन काय चमत्कार सांगावा, त्या साऱ्या माशा काही क्षणातच आपापल्या मोहोळात स्थिरावल्या. परत आता सगळीकडे सर्व शांत, मंगल झाले. लोकांनी श्रींना पुन्हा अत्याग्रहाने पालखीत आणून बसविले तो एक निराळेच प्रकरण उदभवले.

ते नास्तिक महाशय करीत मिरवणुक उधळल्याचा आसुरी आनंद लुटीत बडेजाव मिरवीत रस्त्यावर आले; तो ते आयतेच माशांचे भक्ष्य बनले. त्या अनेकजणी या वीरावर तुटून पडल्या व त्याला ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. श्रींना हे कळतांच तेथे जाऊन आपला अमृत हस्त स्पर्श त्याला करतांच त्याचा दाह शांत झाला. स्वामीजींनी त्याला तीर्थाने स्नान घातले आणि त्याच्या सर्वांगाला खोबरेल तेल लावून जवळ घेतले. ते सावध होतांच त्याने श्रींची सर्वांसमक्ष क्षमा मागून तो स्वतः श्रींची पालखी वाहून नेण्यास प्रवृत्त झाला. मिरवणुक थाटात पार पडली.

हे केसकर सद्गृहस्थ आता निवृत्त होऊन पुण्याच्या सदाशिव पेठेत श्रीधरांचे स्मरण करीत सार्थकी जीवन व्यतीत आहेत.

– श्रीधर संदेश (मार्गशीर्ष १९०८)
सन १९८६