Memories

४. भाग्य उजळले तुझे चरण पाहिले

श्री. रघोत्तमराव देशपांडे

. . १९५९ सालची गोष्ट. त्यावेळी जगदगुरु श्री शंकराचार्य भाग्यनगरीत आले होते. त्या संताच्या दर्शनास गेले असता अजून एक महाराज आल्याची वार्ता कानी पडली. लोक त्या महाराजांविषयी सांगत होते. लोकांकडून एेकण्यात आले की ते महाराज लोकांची अनेक दुःखे नाहिसे होण्यासाठी, उपाय सांगतात.

सांसारीक अडचणी या प्रत्येकाला असतातच; तसेच आम्हाला पण त्या होत्याच, आमची शेती पंधरा वर्षे भांडणात होती; कीतीही प्रयत्न केला तरी विरोधक आमच्यापेक्षा वरचढ होते. दुसरें, म्हणजे आमच्या घरी भानामतीचा त्रास होत होता वारंवार, कोणाला ना कोणाला जीवावरचे दुखणे येई. आर्थिक परिस्थिती पण फार बिकट होती. म्हणून माझ्या थोरल्या बंधूनी आम्हास, श्रीधर स्वामींच्या दर्शनास जाण्यास प्रेरित केले त्याप्रमाणे आम्ही स्वामीजींच्या दर्शनास सोमाजीगुडा येथे गेलो. स्वामीनी माझ्या पाठीवरुन हात फिरवून मला धैर्य दिले, उपासना करण्यास सांगितले.

दुसरें स्वामीनी आमचेकडे यावे अशी आमची फार इच्छा होती. परंतु पाद्यपूजेला किमान खर्च येतो असे कळाले. आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्या कारणाने आम्ही गप्पच बसलो. परतु माझ्या बंधूना मात्र स्वामी येणार याची जणू खात्रीच होती. त्यानी एक छोटीशी चिठी माझ्या हस्ते स्वामींकडे पाठविली; आश्चर्य म्हणजे स्वामींनी वेळांत वेळ काढत माझ्याकडे पाद्यपूजेस येण्याचे आमंत्रण स्वीकारले, ठरल्याप्रमाणे आलेही. त्याच वेळेस आमचे भाग्य उजळले अनुग्रह झाला. आम्हाला होणास भानामतींचा त्रास कायमचा बंद झाला. थोड्याच दिवसांत आमची शेती पण सुटली; सांसारिक गाडी रुळावर आली. ही त्या गुरूमाऊलीची कृपाच होय.

त्यानंतर बरेच वर्षानी घडलेली अत्यंत महत्वाची गोष्ट कथन करतो. . . १९७५५ च्या आणीबाणीत, मला सेवानिवृत्त केले गेले. मुले लहान मुलगी लग्नाची होती. ती देखील भावाच्या स्वाधीन. काय करावे ? सर्वत्र अंधारच अंधार वाटत होता. पोटांत अन्न जात नव्हते, रात्री झोप येत नव्हती. म्हणतात ना कीघर फिरले की घराचे वासे पण फिरतात.’ तसेच झाले. हया सर्वांचा कळस म्हणजे पत्नीचे जीवावरील दुखणे. पाणी देखील पचत नव्हते. औषधोपचार केला. पण
काही उपयोगच होत नव्हता.

तशातच श्री सच्चिदानद स्वामी येथे आले. त्यानी गुरुमाऊलीची उपासना वाढविण्यास सांगितली. त्याप्रमाणे आम्ही करीत होतो. परंतू मनांत अजून एक इच्छा बऱ्याच दिवसांपासून घर करून होती, ती म्हणजे श्री गुरुमाऊलीच्या दर्शनास वरदपूरास जाणे. परंतू हे व्हावे कसे ? एकीकडे पत्नी आजारी दुसरीकडे माझ्या दुसऱ्या मुलास अचानक फिटस येऊ लागल्या. पैशाची अडचण. काय करावे ? शेवटी आम्ही अगदी हिमतच केली. आजारी पत्नीस मुलास घेऊन स्वामींच्या दर्शनास जाऊन आलो. तर काय आश्चर्य ! तिथ पत्नीस काहीच त्रास झाला नाही. ती पूर्णपणे बरी झाली. मुलांच्या फिट्स देखील कांही अंशांत कमी झाल्या. सगळयाचा कळस म्हणजे मला परत नोकरीवर रुजू होण्याचा हुकुम आला. हयाप्रमाणे आमच्या घरांत गुरु कृपेनें हर्षोदय झाला. ही त्या गुरुमाऊलीची असामान्य कृपा होय.

home-last-sec-img