Memories

११. गुरुमाउलीच्या सहवासात

श्री रघुवीर घाणेकर

गतवर्षीच्या गुरुमाउलींच्या दर्शनाच्या स्मृति अजून मनाला सुखावत होत्या, त्या नुसत्या स्मरणानं देहभाव विसरून त्या प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूपात मन विरून जात होतं. ते गोड गोड अमृताचे बोल कानात कुजबुजु लागले की अंगातून चैतन्याचा प्रवाह सुरू व्हावा आणि एकच एक आनंदस्वरूप अंतःचक्षुसमोर उभं रहावं आणि त्यात देह विलीन व्हावा ही ओढ लागे.

श्रीबदरीनाथाच्या सहवासांत माउलींनी आमच्यासाठी घोर तपश्चर्या केली, देह झिजविला. पण आम्हाला स्फूर्ती देण्यासाठी, अभय देण्यासाठी काशीक्षेत्री विश्वरुपी विश्वनाथाचं रूप घेऊन महाशिवरात्रीला त्या पवित्र दिवशी प्रत्यक्ष निर्गुण निराकाराच सगुण स्वरूप आम्हाला पहावयाला मिळालं.

माऊलींच्या चरणी मन केव्हाच गेलं होतं. पण देह अजून मार्ग आक्रमत होता. मत् प्रिय बंधु गोडसेदादाच्या मार्गदर्शनानं मी पत्नीसह चाललो होतो. महाशिवरात्रीस दुपारी वाजता गाडी वाराणसीला पोहोचली. आम्ही श्री श्रीधरस्फूर्तिनिवासबाहेर आलो. मंदीरामध्ये नमः शिवाय जय नमः शिवायचा गोड गोड घोष चालला होता. भजन म्हणणारे सर्व रंगुन जणू भान विसरले होते. त्यात गुरुमाउली सायंकाळी प्रगट होणार होती. त्या आनंदात सर्वांची मने अगदी भाराउन गेली होती, आनंदीत झाली होती.

माउलींच्या आसनांची व्यवस्था चालू होती. मखमलीच्या आवरणांनी त्यांचं आसन तयार होत होतं. सभोवताली झेंडूच्या फुलांच्या माळा लावून अधिकच शोभा आली होती. निळ्या आणि तांबड्या मखमली शालीवर व्याघ्रजिन घातले होते. सर्वजण उत्साहात आनंदात होते. ती सर्व शोभा पाहताच नकळत मस्तक आसनापुढे टेकून माऊलीचे दर्शन घेतलं गंगामाईच्या दर्शनास गेलो. स्नान, संध्या, पूजा आटोपून पुन्हा स्फूर्तिनिवासात आलो.

एकच क्षण गेला आणि माउलींच्या खडावांचा आवाज कानी पडला. सर्व शांत शांत होतं. आवाज जवळ जवळ येऊ लागला तो तो मन भारावून जात होतं. आनंदाची ज्योत शरीरात प्रज्वलित होत होती आणि आनंदाश्रूंनी डोळ्यातून वाट काढली. ‘जय जय रघुवीर समर्थआणि माउलींच्या जयजयकारांनी आश्रम भरून गेला. आनंद भरून वाहू लागला. माउलींच्या चरणांचे दर्शन झाले. अमृतवृष्टी होऊ लागली. तेजानं वातावरण भरून गेलं, माउली आसनस्थ झाली. उपस्थितांनी दर्शन घेतले. गेले वर्षभर दूर झालेली माउलींची मूर्ती आज साक्षात पहावयाला मिळाली. कृतकृत्य झालो.

माउलींच्या तेजाने न्हाऊन निघालो. आनंदसागरात यथेच्छ डुंबलो. माउली कुरवाळतच होती, जवळ घेतच होती, गालावरून हात फिरवीत होती, पुन्हा पुन्हा छातीशी धरून समजावत होती, काय वर्णन करावं ! सर्वांना अनुभव आहे. सर्वांनी हा आनंद, हे सुख लुटावं हीच इच्छा.

दुसरे दिवशी म्हणजेच शनिवार माघ वद्य १४ गुरुनाथ प्रयाग ला जायला निघाले. आश्रमवासीयांना त्यांना सोडवेना. माउलीचा वियोग कसा सहन व्हावा ! पण राष्ट्रार्थ प्राणपणाला लावलेल्या माउलींना कार्यासाठी बाहेर पडणे आवश्यकच होतं.

दुपारी प्रयागला स्नान, त्रिवेणी संगमावर झालं, भिक्षा झाली. संगमावर मुक्तहस्ताने माउलींनी दानधर्म केला. शेवटी स्वतःचे वस्त्र काढून दिले. प्रयागला दर्शनाला रीघ लागली होती. रविवारी माघ वद्य १५ ला ३।। वाजता गाडी चित्रकुटाकडे वळली रात्रीचा मुक्काम तेथे झालाआम्ही सायंकाळचे गाडीने चित्रकुटाला गेलो. प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या चित्रकूटचे दर्शन आम्हाला माउलींमुळे झाले. मंदाकिनीत स्नान करून माउलींनी भिक्षा घेतली. आम्ही एकूण सात जणच होतो. चित्रकुटाहून सोमवारी फाल्गुन शुद्ध १स दुपारी निघून सतना स्टेशनला सायंकाळी ७।। ला आलो. माउलींच्या अगदी निकट सहवासात त्याच स्वरूपाशी एकरूप झालो होतो. रात्रीचा प्रवास त्यांचे बरोबर झाला. मंगळवार फाल्गुन शुद्ध इटारसीला पू. गुरुमाउली, श्री. गोडसे, सौ. सावित्रीअक्का दोन शिष्य असे नर्मदास्नानास उतरले.

पू. गुरुमाउलीचा निरोप घेण्याची पाळी आता माझ्यावरच आली. कसं सोडावं समजेना. चरणावर मस्तक ठेवलं आणि अश्रूंनी स्नान घातलं. रहावेना, पुन्हा पुन्हा माउली छातीशी घट्ट घेई, पण वियोग सहन झाला नाही. अखेर माउली दृष्टीआड झाली. बंधु गोडसे यांनी खूप समजूत घातली पण आई लेकराचा वियोग क्षणिक का होईना पण त्यानं मन हुरहुरलं. विषण्ण वाटुं लागलं. पण माउली आनंदस्वरूप, त्यांनी आशिर्वाद दिला. मन आनंदाने भरून गेलं.

हे लिहीत असतानाच पू. गुरुमाउली डोळ्यासमोर उभी आहे. हसत आहे. कुरवाळीत आहे आणिमी आहे मी आहेम्हणून बजावीत आहे. त्यांच्या कृपाछायेत आपण निश्चिन्त असावं, सेवा उपासना घडावी हीच चरणकमली प्रार्थना.

स्थळ: नाशिक
काळ: फाल्गुन शुद्ध /१८८७

home-last-sec-img