Memories

१२. मृदूनि कुसुमादपि

विनायक दि. कुलकर्णी

श्री सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराजांच्या वाणीत विलक्षण मधुरता किंवा कोमलता आहे त्याचा अनुभव प्रत्येक शिष्यभक्तांस नेहमीच येत असतो. त्यांच्या वाणीत असे काही शक्तिसामर्थ वशीकरणाची जादू भरलेली आहे की कानावरून आलेली त्यांची वाणी थेट हृदयाचा ठाव घेते त्याचे तरंग कित्येक दिवस उठत असतात आणि जेव्हा जेव्हा श्रींचे स्मरण होते तेव्हां तेव्हा कानावर आलेले शब्द स्पष्टपणे हृदयातून आपोआप निर्माण होतात असा भास प्रत्ययास येतो. याचे कारण असे की श्रीस्वामीजी स्वत:च्या सुखाचा यत्किंचितहि विचार करता भक्तांच्या सुखदुःखाशी समरस होतात. भक्तांची अपार दुःखें ऐकून पाहून त्यांचे हृदय फाटून जाते. बालपणापासून त्यांना लोककल्याणाची चिंता अहर्निश आहे. लोकांची दैन्ये फिटून ते सुखासनी विराजमान व्हावेत या करितां त्यांची अखंड तळमळ आहे. त्यासाठी प्रभुरामरायाला परोपरीने मोठ्या काकुळतीने ते सारखे आळवीत असतात.

त्यांच्या सानिध्यात असले म्हणजे तेथून हलू नये असे वाटते. श्री स्वामींजवळ गर्दी होऊन, श्रींना त्रास होऊ नये म्हणून सेवेकरी सारखे दूर जाण्यास विनंती करतात, पण कोण ऐकतो! शेवटी ढकलून देण्यापर्यंत पाळी येते पण श्रीस्वामींच्या लोकविलक्षण आकर्षणाने मोहित झालेल्या, देहभान विसरलेल्या भक्तास त्याची थोडीसुद्धा जाणीव होत नाही. इतर वेळी कोणी थोडा अंगास स्पर्श केला तर क्रुद्ध होणारे, अपमानित गोष्ट सहन करणारे, तेथे अनेक वेळा दूर जा म्हणून पदोपदी सांगूनही गुळास चिकटलेल्या मुंगळ्याप्रमाणे श्रींचे सभोवती अशारितीने एकत्र होतात की तेथील गर्दी कमी करणे म्हणजे सेवेकऱ्यांच्या शांततेची परीक्षाच आहे. इतरांचे दाखले देऊन कल्पित गोष्ट सांगण्यापेक्षा माझा अनुभव देऊन श्रीस्वामीजींच्या वाणीमोहनीची कथा पुरी करतो.

शके १८८१ चा दासनवमीचा उत्सव बेळगांवकरांना चिरस्मरणीय झालेला आहे. पण माझ्या जीवनात क्रांती झाली ती याच वेळी. दासनवमीनिमित्त श्रींची स्वारी बेळगांवी होती. भक्तांची खुप गर्दी होत होती. समर्थसंप्रदायाची किंवा परमार्थाची विशेष आवड नसणारा पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधळेपणाने अनुकरण करून शहाणपणा मिरविणाऱ्या माझ्या मनानेमारुती मंदीरात हल्ली गर्दी का होते?’ म्हणून चौकशी केली. तेव्हा कळले की कोणी थोर सत्पुरुष आलेले आहेत. मी मनात म्हटले असे पुष्कळ संत येतात आणि जातात. त्यासाठी कशाला आपला वेळ खर्च करावयाचा? त्यावेळी मला खूप काम होते असे नाही. पण स्वतःस शहाणे समजून धार्मिक कार्यात भाग घेणंच बरे. धार्मिक कार्यात भाग घेणे म्हणजे वेळ घालवणे हे आधुनिक वाङमयातून निर्माण झालेली वृत्ति त्यावेळी वैभवशिखरावर पोहोचली होती. त्या वृत्तीने सुरवातीचे उत्सवाचे दिवस दुर्लक्षच केले. पण माई वैद्यमाझ्या मावशी म्हणाल्याअरे विनायक ! एक दिवस तरी ये स्वामींच्या दर्शनाला.” मी म्हटलेमला दिवसभर काम असते. सवड होणार नाही.’

पण दुसऱ्याच्या मनात परमार्थवृत्तीच्या भावना निर्माण करण्याचे सतत कार्य करणाऱ्या माझ्या प्रेमळ मावशी या माझ्या उत्तराने आपल्या कार्यात नाउमेद झाल्या नाहीत. त्या पुढे म्हणाल्यादिवसा वेळ होत नसेल तर रात्री प्रवचनासाठी तरी ये !’ मनात म्हटले केवळ मावशीच्या समाधानासाठी एक दिवस तरी जावे. म्हणुन माघ कृ ३ला रात्री वाजता श्रींचे प्रवचन ऐकण्यास गेलो. मनांत परमार्थाची ओढ नाही, भक्ती नाही, संतसेवेची इच्छा नाही. केवळ मावशीना समाधान व्हावे म्हणून एकदा थोडावेळ जावे या उद्देशानेच घरून निघालो होतो. श्री. पै. यांच्या भव्य आवारात सुशोभित केलेल्या मंडपांत हजारो स्त्रीपुरुष अत्यंत शिस्तीत शांतपणे बसलेले दिसले. मी ही आत गेलो. मधुनच पळ काढण्यास बरे म्हणून पुढे जाता मागेच कोपऱ्यात बसलो. थोड्याच वेळात श्रींची स्वारी आली. मोटारीतून खाली उतरून प्रवेश करताच सर्व भक्त जागेवर उठून उभे राहिले नम्रपणे हात जोडून आपापल्या जागेवरून दोन्ही हात जोडून विनम्रपणाने श्रीस नमस्कार करीते झाले.

|| सदगुरु समर्थ रामदासस्वामी महाराज की जय

|| सदगुरु भगवान श्रीधरस्वामी महाराज की जय ।।

|| जय जय रघुवीर समर्थ ।।

वगैरे गगनभेदी जयघोषाने सारे वातावरण दुमदुमुन गेले. श्री आपल्या स्थानावर विराजमान झाले. आपल्या प्रसन्न मुद्रेने साऱ्या भक्ताकडे एक दृष्टी टाकली आपले अभयकर वर करून भक्तांना खाली बसण्यास खुणविले, स्वतः काही क्षण ध्यानस्थ झाले नंतरश्री समर्थावतारया विषयावर बोलण्यास सुरवात केली.

आजपर्यंत म्हणजे या प्रवचनाच्या दिवसापर्यंत मी श्रींना बघितले नव्हते. मावशी मधुन मधुन श्रींबद्दल सांगत. पण मी कधी त्याचा विचार केला नाही. पण आज मात्र समोर विराजमान झालेली भव्यरूप अतिसुंदर अतिप्रसन्नचित्त काया पाहून देहभान विसरले. श्रींच्या वाणीतून एक एक शब्द येऊन अंत:करणाचा ठाव घेत होता. प्रवचनांतील वाक्यरचना साधी सुटसुटीत पण अर्थपूर्ण होती. सर्वत्र समान पडणाऱ्या वर्षावाप्रमाणे श्रींचे प्रवचन सर्वांसाठीच होते पण त्यांच्या प्रभावी वाणीने माझ्यात कांही तरी बदल होत आहे असा भास मला होत होता. प्रवचन इतके एकाग्रतेने ऐकले की २।। तास केव्हां निघून गेले कळलेच नाही. प्रवचन संपले. जयजयकारांत श्रींची स्वारी डोळ्यासमोरून नाहीशी झाली पण अंतःचक्षुसमोर ती मात्र कायमचीच राहिली. ते प्रवचनातील शब्द हृदयांतून सारखे कानावर येत होते. या भानांतच रात्र काढली सकाळी अनुग्रह मिळेल काय म्हणून श्रींना विनंति केली. श्रींनी आनंदाने होकार दिला माघ कृ. मंगळवारी सकाळी १० वाजता श्री मारुती मंदिरांत अनुग्रह मिळाला.

श्रींच्या प्रेमळपणाचा, वात्सल्याचा अनंत अलौकिक गुणांचे अनुभव अनेकांना नेहमीच येतात. तथापि पर्वतप्राय कथनांतून तिळमात्र स्वानुभव वर्णिलेला आहे. अर्थातशितावरून भाताची परिक्षाह्या न्यायाने श्री स्वामींच्या दर्शनांतून निर्माण झालेला एक क्षणहि आपल्या विचारांत अमुलाग्र फरक करू शकतो, जीवन तेजस्वी बनवतो आपल्या ठायी आत्मोद्धाराचे बीजारोपण केल्याविना रहात नाही हा सिद्धांत मांडण्यासाठीच स्वानुभवाचा अल्प स्वल्प प्रसंग मांडण्यास आज प्रवृत्त झालो.

दर्शनाने, अनुग्रहाने जीवनांत क्रांती घडवून सत्यमार्ग प्रकाशित करून आपल्या चरणाजवळ कायम आश्रय देऊन कृपाशीर्वाद देत असणाऱ्या माझ्या प्रेमळ गुरुमाऊलीस सहस्त्र प्रणाम करून गुणगौरव गाथेंचे हे पुष्प श्रींच्या चरणी अर्पण करतो.

श्रीगुरुदेवांचा जयजयकार असो 

home-last-sec-img