Memories

१४. श्री स्वामींच्या सुखद सहवासांत

श्रीमत् . . स्वामी सत्यदेवानंद सरस्वती (आळंदी)

वैशाख मासांतीलश्रीधरसंदेशच्या अंकांत संपादक महोदयांनी प्रसिद्ध केले आहे कीसंदेशांतून अन्य लेखकांचे साहित्यहि मुद्रित केले जाईल. ते वाचून अतिशय आनंद वाटला. श्रीमत् परमहंस परिव्राजक श्रीधरस्वामीमहाराजांच्या काही अमृतमधूर आठवणी बरेच दिवस हृदयांत दाटल्या आहेत; त्यांपैकी काहीं स्मृतींचे अमृत श्रीमहाराजाच्या भक्तांसाठी, नीरस भाषेच्या वेड्यावाकड्या करवंटीतून पुढे ठेवीत आहे.

सुमारे सात वर्षांपूर्वी श्रींचा मुक्काम सज्जनगडावर होता. ‘आर्यसंस्कृतिग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी काही अधिक मजकूर स्वामीजी लिहीत होते चांगले अक्षर मुख्यत्वे शुद्ध लेखन करणारी व्यक्ति प्रेस कॉपीकरण्यासाठी त्यांना हवी होती. श्रीसमर्थांनी तें सौभाग्य माझ्यासाठी राखले होते. पुण्याचे डॉ. . शं. भावे हे प्रस्तुत लेखकाचे पूर्वाश्रमांतील आप्त! ते सहज मला म्हणालेतुम्ही स्वामींचे लेखन करण्यासाठी गडावर जाता का? ”महत्सेवा द्वारमाहुर्विमुक्ते: ‘ हे श्रीमत् भागवतांतील वचन स्मरून आनंदोल्हासाने मी म्हटलेउद्यांच जातो!”

श्रीधर कुटीच्या मागील माडीत श्रींची स्वानंदतृप्त सावळी मूर्ति लिहीत बसली होती. भोवती बरेचसे ग्रंथ इतस्तत: विखुरले होते. स्वामींच्या समीप गोकर्णक्षेत्रभूषण गणेशशास्त्री खरे वेदमूर्ति बसले होते. स्वामींनी दोन चार ओळी लिहाव्यात, डोळ्यावरचा चष्मा काढून ठेवावा, ऋग्वेदांतील एखाद्या ऋचेसंबंधी शास्त्रीबोवांशी चर्चा करावी, मधून मधून खळखळून हसावे, दिनकरबुवा किंवा गोडसेबुवांना बोलावून श्रीसमर्थांच्या सेवेसंबंधी मृदुमधुर शब्दांत सूचना द्याव्यात, कानडी आणि मराठी दोन्ही भाषांत सारख्याच सहजतेने संभाषण करावे, पुनः लेखनास सुरवात करावीअसा आनंद सोहळा तेथें चालला होता! श्रावणातल्या पारिजातासारखी त्या वास्तूंत प्रसन्नता बहरली होती. कारण श्रीज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे · “देखे अखंडित प्रसन्नता। आथी जेथ चित्ता। तेथ रिघणे नाहीं समस्ता। संसारदुःखा।।ह्या ओवीचा नराकृति आविष्कार स्वामी महाराजांच्या रूपाने त्या स्थळी नांदत होता ना!

हेंच श्रीमहाराजांचे लेखकास झालेले प्रथम दर्शन! ‘अयं हि परमो लाभ उत्तमश्लोकदर्शनम्अशा तृप्ती ने त्या सत्कीर्त नारायणस्वरूपास साष्टांग दण्डवत प्रणाम केला अन् म्हणालोआपलें लेखन करण्यासाठी पुण्याहून डॉ. भाव्यांच्या सूचनेवरून आलो आहे

श्रीनी वात्सल्यपूर्ण दृष्टीने मजकडे पाहून विचारलेश्रीसमर्थाचें दर्शन घेऊन आलास काय?” मी होकार भरला आणि मला साहजिक असे वाटले की स्वामीजी पुढे म्हणतीलमग बैस लिहावयास ! ” पण लाभाविण प्रीति करणाऱ्या माउलीच्या कळवळ्याचा लगेच प्रत्यय आला. स्वामी उद्गारलेअरे गड चढून येऊन तूं दमला असशील. हे बघ आधी काही तरी खाऊन ये, अरे गोडसे, याला खाली घेऊन जा.” त्या वत्सलरसात भिजलेल्या शब्दांनीच अमृतवृष्टि झाल्यासारखे वाटले पोटांतला वडवानल अर्धाअधिक शांत झाला. पाकगृहांत गंगाक्कांनी दिलेला लापशीचा बाङगा ओठी लावतांना श्रीतुकोबारायांच्या शब्दांत मन रंगलें होते

– ‘बहु अवघड आहे संतभेटी परि या जगजेठी करुणा केली

सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत, पुनः दुपारी तीन वाजल्यापासून श्रींच्या सायंस्नानापावेतों नंतर श्रींचा (आणि अर्थात् आम्हा सर्वाचाहि) फराळ झाल्यानंतर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत असा जवळ जवळ दीड महिना सतत संतसहवास झाला. ‘किं मयाऽऽचरितं भद्रं किं तप्तं परमं तपःअसें स्वामीसंगतीत नित्यच वाटत असे. अशा त्या शुद्धपुण्यप्रापक महापुरुषसंश्रयांत अनुभविलेले चार दोन प्रसंग बोलावयास द्विजिव्हा आतां अधीर झाली आहे. घटना अगदी मामुली आहेत. प्रसंगांची कोंदणे साधी आहेत पण त्यांत श्रींच्या साधुत्वाची हिरे माणकें झळकत आहेत. श्रीभक्तांच्या अन्तश्चक्षूस त्या सौम्योज्ज्वल तेजाने खात्रीने आनंद होईल.

स्वतः श्रीस्वामीमहाराजांचे हस्ताक्षर त्यांच्या चालण्याप्रमाणेच ठाशीव, डोलदार आहे (लेखन शुद्ध आहे हे काय वेगळे सांगावयास हवे ? ) तें सुंदर अक्षर पाहून मी हरखलों. आणि लिखाणाची मुद्रणप्रत करावयास मोठ्या उत्साहाने आरंभ केला. दोन पाने लिहून झाली. तिसऱ्या पानावरील मजकूर पाहून मात्र हबकलोच! का तें सांगतो. श्रीमहाराजांच्या हस्तलिखितानें तो फुलस्केप कागद सरळ ओळींनी व्यापला होताच ; पण समासाच्या सर्व भूमीवरहि त्या मजकुराने धाडशी आक्रमण केले होते. शिवाय काकपदचिन्हें, स्वस्तिकें, गोल ठिपके इत्यादि कलावंतांनींहि त्या पृष्ठावर आपापली बिऱ्हाडें थाटून दोन परिच्छेदांतील पोकळी हि त्या शब्दांना श्वासोच्छ्वासासाठी मोकळी ठेवली नव्हती !! अशी ती रणधुमाळी पाहिली अन् त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा विचार तर सोडूनच द्या; पण अभिमन्यूच्या धैर्याने आंत प्रवेश करावयासहि मनबुद्धि तयार होईनात ! कसा बसा उसन्या धीराने चिकाटीने त्या पानावरील मजकूर मनाशी जुळवून उतरवून काढला. ‘सेवाधर्मो परम गहनो योगिनामप्यगम्यःह्या ओळीतील अर्थ सेवेच्या आरंभीच पुरा अनुभविला. तिकडे स्वामीजींच्या लिखाणाचा झपाटा चाललाच होता

अरे बापरे ! तोच बारीक अक्षरांतला भरगच्च मजकूरसर्वस्व समर्पूनहि, आपल्याजवळ अधिकव्यासपण नाही म्हणून हिरमुसलेला तोसमास‘– ती मुद्रणप्रत करणारास खिजविणारी मोठी वाटोळी टिबेंकागदाच्या तळापासून माथ्यापर्यत उलटा प्रवास करणाऱ्या त्या रेघोट्यांच्या नद्याछे, छे ! हे लिखाण उतरविणे आपणास कसें जमणार ! मी हतबुद्ध झालो. प्रत्येक बिकट प्रसगी श्रींचा धावा करणेहि (म्हणजे त्यांचेकडे धांव घेणेंहि ) प्रशस्त वाटेना. असे काही दिवस गेले आणि एक दिवस सगळा संकोच टाकून मी तोंड उघडलेचमहाराज, माझी एक अडचण आहे. “सांग नाहे श्रींचे ऋजु शब्द कून बरच धीर आला.

हे पहा, हा मजकूर उतरवितांना माझा फार तारांबळ उडते. कोठे कोणते वाक्य जुळवून घ्यायचें तें चिडबिडाटाने लवकर उलगडत माही; त्यामुळे कॉपी करण्यास फार वेळ लागतो. तेवढ्यांत आपलेंहि नवें लिखाण बरेच येऊन साचते…”

ले ले ले ले, एवधा ललकुंदी का आलाय दादा ? ” असे अतिप्रेमाने बोबड्या शब्दांत बोलून श्रीमहाराज मुक्तकण्ठाने हसले म्हणाले, “मग तुझें काय म्हणणे आहे ?”

महाराज, कागदाच्या सरळ ओळी लिहून संपल्या की मी लगेच दुसरा कागद ठेवीन. म्हणजे समासांत किंवा दाटीवाटीने लिहिण्याची वेळच येणार नाही. आपल्याकडे कोरे कागद पुष्कळ आहेत…”

हे बोलण्यांत मी अमर्याद धारीष्ट केले होते त्याची जाणीव होऊन मला वाटलें स्वामीजी आता माझ्यावर कडाडणार ! पण श्रींनी हास्यमुद्रेने शांतपणे दिलेले उत्तर ऐकून सर्दच झालो.

अरे, आम्ही मधुकरी मागून राहिलेले लोक ! त्यांतल्या त्यांत पुरवून पुरवून वागायला नको का? ऐसपैस वागणे कसे जमेल ? “

ह्या अनपेक्षित पण परमार्थगर्भ उत्तरांतून काय बोध घ्यायचा हे मी प्रत्येक वाचकावरच सोपवितो. मी मात्र त्या दिवसापासून दोन गोष्टींचा निश्चय केला !

या संदर्भात पुन्हां तक्रार करायची नाही हा एक दुसरा म्हणजे सध्या आपण खऱ्या अर्थानेजितमन्युसंन्याशाच्या सेवेत आहोत !

एका दुपारी, स्वामीजी विश्रांतीत असतील अशी आम्हा सर्वांची कल्पना. चि शरद पिंगळ, चि. पांडे, चि. मारुती प्रस्तुत लेखक ( जवळ जवळ समवयस्कर असल्याने ) कुटीतल्या पुढच्या लहान मज्जांत ( श्रीहनुमान मंदिरासमोर ) गप्पा मारीत भुईमुगाच्या शेंगा खात बसलो होतो. आमचें लक्ष अर्थातच पाठीमागे नव्हतें स्वामी हळुच केव्हां मागे येऊन उभे राहिले हे कोणालाच कळले नाही. वारा प्यायलेल्या वासरासारख्या आमच्या गप्पा मोकाट सुटल्या होत्या. स्वामीजी उभे आहेत याची चाहूल लागताच आम्ही चपापलो ! श्रीमहाराज ज्या दृष्टीने आमच्याकडे पहात होते त्या दृष्टीत मे कश्चित् नाऽहं कस्यचित्ह्या संन्यासप्रतिज्ञेतला वैराग्याचा करडेपणा नव्हता. तर निःसंकोचपणे कांहीतरी खात असलेल्या लेकरांकडे पाहणाया मातेचे कौतुक, मातेची तृप्ति त्या नेत्रांत होती. ती दृष्टी मी धीच विसरणार नाही.!

एकादा एका निकटच्या शिष्याचा अत्यंत मन:क्षोभ झालामला हे जिणे नकोसे झाले आहे, परमार्थ नको, सेवा नको, स्वामीजी ह्याक्षणी मला दारू प्यावीशी वाटते, गोमांस खावेसे वाटतेअशी काहीतरी असंबद्ध मुक्ताफळे त्या शिष्याच्या तोंडून बाहेर पडत होती. स्वामीजी शांतपणे त्याची समजूत घालत होते. त्याची वाचा अगदीच अनावर झाल्यावरहि रागावता स्वामींनी. त्याला हाताला धरून जवळ ओढलें आणि कुशीत घेऊन त्यास बराच वेळ थोपटून शांत केले ह्या सर्व प्रसंगावर मी काय भाष्य करू ?

एका माध्यान्ही, श्रींच्या भिक्षेच्या वेळी मी श्रीधर कुटीतील पुढच्या जिन्याजवळच्या लहानश्या अंधाया खोलीत ध्यान करीत बसलो होतो. श्रीमहाराज तीर्थ देण्यासाठी हिंडत असता तेथे आले. मलाध्यानस्थ बसलेले त्यांनी पाहिले. चाहूल लागून मी डोळे उघडताच ते म्हणालेतुझ्या पाठीमागे मला देवी दिसते आईची तुझ्यावर कृपा आहे.”

देवीची मजवर कृपा आहे हे कळलेला आणि ते कृपाळ होऊन सांगणारा महात्मा भेटावयासमाझे किती जन्माचे सकृत आज फलोन्मुखहोत आहे असे वाटून मी धन्य झालो.

अशा महदानंदांत, तो परमकल्याणकारी, अतिपूत संतसमागम लौकिकदृष्टया सुमारे दीड महिन्याने संपला स्वामीजी संचारासाठी गडावरून निघाले. स्वामीमहाराजांच्या चरणी मस्तक ठेवून मी पुण्याकडे परतताना, माझे १९५८ सालापासूनचे स्नेही स्वामिसेवकाग्रणी श्री. गोडसेबुवा मला भरल्या आवाजांत म्हणालेतुम्ही अत्यंत भाग्यवान् आहांत ! तुम्ही स्वामींचा मंत्र घतलेले शिष्य नाहीत. पण काय सांगू? बारा बारा वर्षापूर्वीपासून स्वामींचा अनुग्रह झालेल्या असंख्य शिष्यानांहिं स्वामींचा असा प्रदीर्घ, सतत निवांतपणीचा सहवासमिळालेला नाहीतुम्ही धन्य आहांतमी तें सारें ऐकत होतो आणि माझ्या नेत्रांतले प्रेमाश्रु माझे मनोगत सांगू पहात होते !

गेली सहा वर्षे स्वामी महाराजांचे अखंड मौन जवळ जवळ सतत एकांतवासहे पाहून तर स्वामीजींच्या त्या वेळच्या पवित्र विनोदप्रिय, गोष्टीवेल्हाळ सहवासाची अधिकच तीव्रतेने स्मृति होते अन् डोळे नकळत पाझरू लागतात

।। तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ।।

home-last-sec-img