Memories

१७. ब्रह्मीभूत परमहंस श्रीधरस्वामीजींचे पुण्यस्मरण

श्रीमत् स्वामी सत्यदेवानंद सरस्वती, पावस

कोणत्याहि क्षेत्रांतील एखादी कर्तृत्ववान व्यक्ती दिवंगत झाली म्हणजे ‘अमक्याच्या निर्याणामुळे झालेली पोकळी भरुन निघणे कठिण आहे’ असे मागे राहिलेले लोक म्हणतात. परंतु त्याच क्षेत्रात वास्तविक इतर पुष्कळ माणसे ती जागा सहज भरून काढण्याएवढी कर्तबगार असल्याने, ते शब्द म्हणजे केवळ औपचारीकच बोल ठरतात. तथापि अध्यात्मविद्येत पारंगत व ईश्वरनिष्ठ अशा मांदियाळीतील एखादा महापुरुष समाधिस्थ झाल्यामुळे मात्र समाजाची होणारी हानी खरोखरीच सहज भरून निघणारी नसते.

श्रीमत् परमहंस श्रीधरस्वामी महाराज हे कर्नाटकप्रांती वरदहळ्ळी येथील त्यांच्या आश्रमात चैत्र व।।२ शके १८९५ गुरुवार, दि.१९ एप्रील १९७३ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराम महासमाधीत प्रविष्ठ झाले. उत्तरायण, दिवस, शुक्लपक्ष नुकताच संपलेला आणि ज्या रामहन्मंताची त्यांनी जीवनभर सगुणभक्ति केली त्या त्यांच्या परमप्रिय दैवतांच्या जयंतीचा गुलाल अजून अंतरिक्षांत भरून आहे अशा निर्मल शास्त्रपूत कालांत हया परम पवित्र महात्म्याने आपल्या नेहमीच्या ध्यान-धारणेच्या जागी बसून पद्मासन घालून भ्रूमध्यात त्राटक करून, महान योगी पुरुषाला शोभेल अशा रितीने देह विसर्जन केला. स्वामीजींच्या पूर्वसूचनेप्रमाणे तेथे लावून ठेवलेल्या दोन समया त्याक्षणी शांत तेवत होत्या !!

वाणीतून व लेखणीतून व्यक्त झालेले उदात्त विचार, संतवचने, अंगी बाणणे ही महादुर्घट गोष्ट आहे त्यासाठी शरीर झिजवून दीर्घकाल तपस्या करावी लागते. जनसमुदायाचा हव्यास, कीर्तीची अभिलाषा यासारखे मोह झुगारुन देऊन, एकांतवास पत्करून, खडतर नामस्मरण किंवा स्वरुपानूसंधान करावे लागते हे परमकल्याणकारी सत्य श्रीधरस्वामीजींना वयाच्या ऐन विशीतच चांगले उमजले होते; आणि म्हणूनच ब्रम्हचारी आणि संन्यास ह्या दोन्ही आश्रमात ललामभूत असे त्यांचे आचरण होऊन, श्रीसमर्थ रामदासांच्या प्रत्यक्ष दर्शनानुग्रहाचे भाग्य लाभून स्वामीजी कृतार्थ झाले ! ‘बोले तैसा चाले’ अशा कोटीतील ह्या भगवद्विभूतीने आपले सर्व आयुष्य परहितार्थ वेचले. प्रगाढ पांडित्य, अगाध शास्त्र व्यासंग, प्रखर वैराग्य, दया क्षमा, शांती, इत्यादि संतलक्षणे, औदार्य. आश्रमोक्त विहित कर्माचे निरलस अनुष्ठान, परचित-प्रबोधन-सामर्थ्य, सिद्धावस्थेनंतर तपस्येची आवड, वैदिक धर्माच्या सुप्रतिष्ठेची विलक्षण तळमळ, इतक्या गोष्ठी सहसा एकत्र पहावयास मिळत नाहीत. परंतु पूज्य स्वामीमहाराजांच्या दैनंदिन जीवनात हे सर्व पैलू प्रगट दिसत असत.

‘ज्यांच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक संकटात प्रत्येक दृष्टीक्षेपात शुद्ध परमार्थी माणसाने काही बोध घ्यावा’ अशा थोर योग्यतेचे स्वामीजी हे देवदुर्लभ सत्पुरुष होते हे प्रस्तुत लेखकाला त्यांचा सज्जनगडावर जो पाऊण महिना एकांतवास कालांत सहवास घडला त्यावरून वाचकास मुद्दाम सांगावेसे वांटते.

श्री परमहंस श्रीधरस्वामी महाराजांची मातृभाषा मराठी होती तरीहि संस्कृत, कानडी, हिंदी व इंग्रजी या चारहि भाषातील त्यांचे प्रभुत्व अपूर्व होते. सावळा वर्ण, कडकडीत सोवळे-ओवळे आणि सहजसुलभ कानडी बोलणे, यामुळे प्रथमदर्शनी ते कर्नाटकी महासाधू आहेत असेच वाटें.

home-last-sec-img