Memories

१८. ब्रह्मसमंधास मुक्ती दिली

कू. गो. घाकणेर, पुणे

माझा नातु चि: किशोर यशवंत घाणेकर रा. अंधेरी हा सात वर्षांपूर्वी बाहेरच्या बाधेनें आजारी होता. त्या बाधेच्या संचारात तो स्वत:च्या छातीत बुक्क्या मारून घेत असे, त्यावेळी त्याला प्रतिबंध करण्यास कोणी आले तर त्यास तो लाथा मारावयाचा व लिलया चौघा तगड्या माणसांनासुद्धा संचार जोराचा असल्यास आवरता येत नसे. त्यावेळी तो केवळ १० वर्षांचा होता. माझ्या मुलाने त्याला उपचारार्थ सायन हॉस्पिटलमध्ये १५ दिवस व के. इ. एम्. हॉस्पिटलमध्ये १५ दिवस ठेवले होते. तेथील डॉक्टरांच्या मते, ‘त्याला काही होत नाही, तो हे मुद्दाम करतो’ असे ठरले. तेव्हा माझ्या मुलाने फोन करून आम्हास बोलावून घेतले व त्याप्रमाणे आम्ही के. इ. एम्. हॉस्पिटलमध्ये मुंबईस त्याला पहाण्यासाठी गेलो. त्याला पहातां त्याला बाहेरच्या बाधेचा त्रास होत असल्याबद्दल आमची खात्री झाली. सुमारे २७ वर्षापूर्वी माझी कनिष्ठ मुलगी बाहेर-बाधेने व्यथित होती. तिला संचार झाला की ती आरडा ओरडा करी व चौघांना आवरत नसे. त्यावेळी ‘भगवान श्रीधरस्वामींच्या शिवाय तिला कोणी बरे करू शकणार नाही’, असे सगळ्यानी आम्हास सांगितले पण त्यावेळी स्वामीजी कोठे आहेत ह्याचा ठावठिकाणा आम्हास न कळल्यामुळे आम्ही तिला स्वामीजींकडे नेऊ शकलो नाही. तिला दोन वर्ष खूप त्रास झाला. दोन वर्षांनंतर रत्नागिरीचे एक वृद्ध संन्यासी पुण्यास प्रथमच आले होते. त्यांनी तिच्या गळयात बांधण्यास गंडा दिला व ती बरी झाली. तशीच लक्षणे नातवाच्या बाबतीत दिसल्याने त्याला बाहेर-बाधेचाच त्रास आहे याबद्दल आमची खात्री झाली. त्यावेळी श्रींचे शिष्य गोडसेबुवा व पुण्याचे डॉ. भावे यानी माझ्या नातवास श्रींच्याकडे नेण्याचा सल्ला दिला व आम्ही वरदहळळीस जाण्याचे ठरविले. प्रवासांत नातवाच्या अंगांत संचार होईल की काय? अशी चिंता वाटत होती. पण स्वामीजींच्या कृपेने प्रवासांत काहीच त्रास झाला नाही.

तेथे पोहोचल्यावर श्रींचे सेवेकरी शिष्य जनार्दन यांच्याजवळ सर्व माहिती लिहून देऊन ती चिठ्ठी स्वामीजींकडे पाठवली तेंव्हा स्वामीजींनी पुढील अटींवर त्याला बरें करण्याचे ठरविले.
(१) मासिक पाळीत ३ दिवस घरांतील स्त्रियानीं विटाळ पाळला पाहिजे.
(२) श्रींनी मंतरून दिलेली तांब्याची तार ताईतांत घालून त्या ताईतास नातवाने रोज नमः शांताय’ हा मंत्र तेरा वेळा म्हणून अभिषेक केला पाहिजे.ह्या दोन्ही अटी पाळण्याचे आम्ही कबूल केले, वरदहळ्ळीस आमचा तीन दिवस मुक्काम होता.

त्यावेळी श्रीस्वामीजी हल्लीच्या समाधी मंदिराशेजारील ‘गुहाकुटी’त होते व श्रीधरतीर्थावरील कुटीपर्यंत जाण्यास परवानगी होती. तेथे नातवासह आम्ही काही वेळ बसत असू. त्यावेळी नातू ध्यानस्थ होऊन त्याला श्रींचे दर्शन घडत असे. त्यावेळी भोजनादि व्यवस्था श्रीदुर्गाम्बामंदिराजवळ होती. तेथे आल्यावरहि नातु काही काळ ध्यानस्थ होतांच त्याला श्रीस्वामीजींनी आपल्याला बोटास धरून दूर नेले व एका शिळेवर मंतरलेले पाणी प्रोक्षण करतांच त्या शिळेतून श्रीदत्तमूर्ती वर आल्याचे दिसले.सांगितलेल्या वरील अटी जेमतेम एक वर्षभर नातवाच्या आईने पाळल्या पण पुढे मासिकपाळीच्या काळी नातवाला विटाळ होऊ नये ही अट पाळणे जड जाऊ लागले म्हणून नातवाच्या आईनें नातवास गळयांतील ताईत तीन दिवस देवांत ठेवण्यास सांगितले, त्या तीन दिवसांत गळ्यांत ताईत नसतांना नातू बाहेर सायंकाळी गेला असतां झपाटला गेला व पूर्वीसारखा संचार पुन्हा होऊ लागला. त्यावळी स्वामीजी ब्रह्मीभूत झाले होते, म्हणून पुण्यास नातवाला आमच्याजवळ दोन महिने उपचारार्थ आणले. त्या अवधीत अनेकांकडून लहान मोठे उपचार झाले. परंतु नातवास कोणीहि पूर्ण बरे करूं शकले नाही. प्रत्येकजण त्याला ब्रह्मसमंध लागला असून तो पूर्णपणे काढून टाकण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्ही त्याचा त्रास थोड्याचप्रमाणात कमी करू शकू ! असे म्हणावयाचा. तेव्हा आतां काही उपचार होत नाही ह्या निराशेने त्याला अंधेरीस परत पाठविले. तेथे वारंवार संचार होऊ लागला व त्याच्या आईस खूप त्रास झाला. एके दिवशी आईच्या अंगावर सुरा घेऊन तो धावला तेव्हा तिने मुलाच्या वडिलांना ठाण्याहून फोनने बोलावून घेतले. तो घरी येईपर्यंत नातू शांत झाला होता. मालाडला मराठे आडनांवाच्या बाई ह्यावर उपचार करतात असे कळल्यावरून त्यांच्याकडे त्याला नेण्याचे ठरले. तेव्हा नातू आपल्या वडिलांना म्हणाला ‘मी स्वामीजींच्या फोटोपुढे बसू का ! ‘ तेव्हा माझ्या मुलाने सांगितले ‘बैस, पण पुन्हा त्रास का होऊ लागला तें विचार” तो स्वामीजींच्या फोटोपुढे बसून ध्यानस्थ झाला व त्याने पुन्हा त्रास का होत आहे तें श्रींना विचारले. त्यावर श्री म्हणाले, “मी सांगितलेले पथ्य तूं पाळीत नाहीस, म्हणून त्रास होत आहे बाळ ! आतां सर्व पथ्य पाळ म्हणजे त्रास होणार नाही, तसेंच दिवाळीच्या अगोदर एका गुरुवारी वरदहळ्ळीस जाऊन समाधीवर डोके ठेव. आजपासून मी सर्व बंदोबस्त केला आहे. आतां त्रास होणार नाही” त्या दिवसापासून त्याचा त्रास पूर्णपणे बंद झाला आहे. श्रींनी सांगितल्याप्रमाणे माझा नातू त्याचे आई, वडील व त्याचा भाऊ असे चौघे वरदहळळीस जाऊन समाधीवर डोके ठेऊन परत आले, तेव्हापासून आजपावेतो त्रास झाला नाही.स्वामीजी गेले असे आपण म्हणतो परंतु ब्रह्मीभूत झाल्यावरही श्रींनी माझ्या नातवाला पूर्ण बरे केले व त्याच्या अंगांत संचारणाऱ्या ब्रह्मसंधाला त्यानी मुक्ती दिली. हा केवढा चमत्कार !! ह्यावरून श्रींचा अणुरेणूंतहि संचार आहे व आपण मनोभावाने श्रींचे स्मरण केले तर ते आपल्यावर कृपा करतात. आम्ही उभयतां पतिपत्नी श्रींचे अनुगृहित असून श्रींनी आमच्या कुटुंबियांवर आतापावेतो अनंत उपकार केले आहेत व त्याची प्रचीति आम्हाला वारंवार येत असते.

प्रचीतीची एक दोन उदाहरणे पुढे देत आहे.

(१) माझ्या मुलीचा मुलगा ५ वर्षापूर्वी अमावस्येस दुपारी बारा वाजता आमच्या आवारांतील आंब्याच्या झाडावर चढला व झाडाच्या शेंड्यावर अंदाजे ५० फूट उंचीवर असलेल्या कैऱ्या काढू लागला. परंतु खाली पाहिल्याने त्याच्या डोळ्यापुढे अंधारी येऊन त्याचे हात सुटले व तो खाली जमिनीवर असलेल्या ड्रमवर कोसळला, लोखंडी ड्रमवर इतक्या उंचावरून पडला तरी त्याला काही झाले नाही. फ्रॅक्चर नाही, रक्त नाही, फक्त मुकामार लागला. तो शीरसलामत वाचला ही केवढी स्वामीजींची कृपा !!

(२) माझी मुलगी सौ. सुनंदा देवधर ही अप्पाबळवंत चौकातील मोरोबा दादांच्या वाड्यात रहात होती. ही सहावर्षापूर्वीची गोष्ट, वाडा जुना असल्याने पावसाळयांत त्या वाड्याचा तिसरा मजला, माझी मुलगी दुसऱ्या मजल्यावर रहात होती, त्यावर कोसळला. माझ्या मुलीच्या वृद्ध सासूबाई एका खोलीत झोपल्या होत्या. त्यांना रात्री एक वाजतां अचानक जाग येऊन, माती कोठे गळते हे पहाण्यासाठी त्यांनी दिवा लावला व त्या खोलीच्या कोपऱ्यात सरकल्या, इतक्यांत तिसऱ्या मजल्यावरील भाडेकरु कॉटसह खाली आला व मुलींच्या सासुबाई कशातरी बचावल्या. मुलगी, तिचे यजमान व मुलें शेजारच्या खोलीत झोपले होते. त्या खोलीत स्वामीजींचा फोटो होता. त्या खोलीला श्रींच्या कृपेनें कांही झाले नाही. नंतर दोन दिवसानी माझी मुलगी स्वामीजींचा फोटो काढून घेण्यासाठी गेली व फोटो काढून बाहेर येतांच त्या खोलींची पाटयीहि खाली आली.अशा त-हेच्या श्रीस्वामीजीच्या कृपेच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या थोड्याच !!

– श्रीधर संदेश (श्रावण १९०१)

home-last-sec-img