Memories

२५. श्रींचे दिव्य व्यक्तिमत्त्व

पृथ्वीराज धुंडिराज भालेराव, पुणे

श्रींचे अंत:करण अपार कारुण्याने व अथांग प्रीतीने थबथबलेले असावयाचे. सर्वत्र आत्मौपम्य दृष्टीने श्रींचे डोळेहि सदैव डबडबलेले असायचे. अंत:करणाने दृष्टिक्षेप व डोळयांनी दृष्टीक्षेप करीत आसमंतातील अखिल प्राणी व पदार्थांना श्री पुनीत करावयाचे व उजळून टाकावयाचे ! आपल्या अलोट पुण्याईची पाणपोई घालून आर्त, अर्थार्थी व जिज्ञासू अशा तृषितांना तृप्त करावयाचे. ज्ञानी तृप्तानाहि तृप्तीचा नवा आस्वाद, एक आगळी प्रचीति, एक अतींद्रिय जाण करून द्यायचे ! अशा प्रकारे लोकोपयोगी व लोकोत्तर कृत्य करीत ही जीवनगंगा अतिविस्तीर्ण पात्रानिशी, प्रशांत व प्रगल्भपणे वाहू लागली. ‘फेडीत पपा ताप । पोखीत तिरीचें पादप ।।  जैसे का गंगेचें आप । वाहतसे ।।’ ही ज्ञानेश्वर ताल ओवीच, जणु साकार होऊन वाहात असतांना त्या वेळी दिसून आली.

श्रींचे वाङमाधुर्य तर काय वर्णावें? वैखरीच्या मौनातील नुसता हुंकारदेखील स्वर मार्दवतेमुळे ऐकतच राहावा असा, तर मग हित-मित व मधुरमंजुळ अशा प्रत्यक्ष बोलण्याचे काय विचारावें महाराज ! ‘साच आणि मवाळ। मितुळे आणि रसाळ । की जै कल्लोळ । पीयूषाचे ।’ येथेहि पुन्हा तीच ज्ञानदेवी बोलकी झाली, अगदी मृदुमधुरपणे मुखरत झाली. तात्पर्य ‘अभय सत्त्वसंशुद्धीः’ अशी सुरवात करून ज्या २७ गुणाचे वर्णन ‘दैवी संपत्’ म्हणून भगवंतांनी गीतेत केले, त्याची जणु ओतीव मूर्तीच त्या वेळी श्रीधर स्वामींच्या रूपाने जगाला पहावयास मिळाली. ‘षड्विधः भग:।’ या न्यायाने व श्रीसमर्थांनीहि त्यांना तसेच संबोधिल्यामुळे ‘भगवान’ ही यथार्थ अभिधा त्यांच्याकडे चालून आली. ‘रामो विग्रहवान् धर्मः। या धर्तीवर ‘श्रीधरो मूर्तिमान् ब्रह्म’ अशी व्याख्या श्रींच्या सगुण स्वरूपास तंतोतंत लागू पडली ! ‘संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम, चालते बोलते परब्रह्म ।’ या श्री एकनाथांच्या वचनाचीहि प्रचीति त्यावेळी श्रींच्या सान्निध्यात असणाऱ्याना प्रकर्षाने व्हावी, यात सुतराम आश्चर्य नव्हे ! श्रींनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाकरवी मानवी संस्कृतीच्या इतिहासांत आदर्शाचा जो एक जबरदस्त ठसा उमटविला, तो अमिट आहे, सखोल आहे! धर्मपुरुषाच्या कनकांगावरील तो एक वज्रलिप्त असा मनोहर अलंकारच आहे!!

आपल्या वेधक दृष्टीने, बोधक वाणीने, मनोहर दिनचर्येने, उज्ज्वल चारित्र्याने, प्रशांत व धीरोदात्त व्यक्तिमत्त्वाने, हृदयंगम हास्याने इत्यादि अलौकिक गुणांकरवी पुढयांत नत असणाऱ्या प्रत्येक जणाच्या अंतकरणांचा ठाव घेऊन व त्याला आकर्षित करून आपल्या चरणी, आपल्या स्वरूपीं नितांत विश्रांत करण्याची किमया एक श्रीस्वामीच करू जाणे! याचे कारणहि उघड आहे. निखिल विश्व ब्रह्मांडाला पोटी सामावून घेणारी त्यांची स्वरूपनिष्ठा ‘महतो महीयान्’ अशी असल्याने प्रत्येक सन्निटकस्थ व्यक्तीस त्यांच्याबद्दल अपार जिव्हाळा वाटावयाचा. आश्चर्य म्हणजे आई – मुलगा, पिता – पुत्र, बंधु – मित्र यांच्याबद्दल असणा-या प्रेमापेक्षा त्या विशुद्ध प्रेमांत कितीतरी पट अधिक स्निग्धता, अधिक उत्कटता, अधिक उत्कंठा, अधिक तीव्रता व मुख्य म्हणजे अधिक आत्मीयता वाटावयाची, सर्वाचें आत्मस्वरूपच ना तें? त्यामुळे आत्मप्रातीची प्रचीतीच श्रींच्या दर्शनाकरवी ज्याला त्याला त्याच्या नकळत आल्यास नवल ते काय? याच गूढ कारणास्तव सर्वांना ते आपल्या परमविश्रामाचे एकमेव केंद्रस्थान वाटायचे! जे कोणी श्रद्धावान व प्रज्ञावान जन श्रींच्या निकटसान्निध्यांत यायचे, त्यांना श्रीनीं आपल्या सहज मधुर वागणुकीने आपल्या सगुणरूपाचाहि चटकाच लावावा, असे व्हायचे. गंमत अशी की, प्रत्येकाला वाटे, श्रींचे प्रेम आपल्यावरच अधिक आहे. या बाबत वस्तुस्थिती अशी की श्री गुरु समदृष्टीनेच सर्वांच्यावर कृपामृताचा वर्षाव करीत, पण पौर्णिमेच्या मध्यरात्रीचा सुधास्रावी चंद्रमा आपल्याच माथ्यावर आहे’ असा प्रत्येकाला नाही भास होत? तसेच येथे समजावेंखरोखरी ‘तो सकळ जनासी व्हावा | जथे तेथें नित्य नवा।। ‘नाना उत्तम गुण। सत्पात्र तेंचि मनुष्य जगमित्र।। ” ‘नेमस्त अर्थ सांगो जाणे। बोले ऐसे वर्तो जाणे ।। ‘तो परोपकार करिताचि गेला पाहिजे तो ज्याला त्याला ।। ‘किंवा बहुत जन वास पाहे। वेळेस तात्काळ उभा राहे उणे कोणाचे न साहे। तसा पुरुषासी’ ।। असे ग्रंथराज दासबोधांतर्गत ‘धगधगीत पुण्यराशी अशा महापुरुषांचे वर्णन या संदर्भात स्वयमेवच उचंबळून आठवते.

एकंदरीत काय, तर निरतिशय विनयशील असूनहि ज्वलंत ध्येयनिष्ठेमुळे ताठ मान नि उन्नत मस्तक असलेले, कलापूर्ण पण निष्कलंक सुधाकराप्रमाणे सुशांत असूनहि निरभ्र पण निर्दाह दिवाकरसमान अतीव तेजस्वी, निरागस बालवृत्तीचे असूनहि उदात्त तत्त्वनिष्ठेमुळे गहन गंभीर भासणारे, सुमननव नवनीतसमान स्वभाव असूनहि ब्रह्मनिष्ठ असणारे, प्रेम व कणवाचे ओतीव शिल्प असूनहि कलिकाळ व अधर्माशी सिंहासारखी झुंज देणारे, सकृद्दर्शनी मवाळ असूनहि उदंड ब्राह्मशक्तीने संपन्न असणारे, श्रीस्वामीजी व त्यांचे पवित्रतम दर्शन ही ममुक्षुजनांची इतकेच नव्हे तर साधुसंतांचीहि पर्वणी होती! कित्येक महात्म्यांनी अनुभवून व प्रत्यक्ष बोलूनहि दाखविलें ! कधी आत्मानंदाच्या निरंकुश मस्तीत असलेले तर कधी धीरगंभीरपणे उपनिषदांवर प्रवचन देत असताना ‘समुद्र इव गांभीर्ये, धैर्येच हिमवानिन’ या श्रीराम वर्णनावर हुकूम प्रतीत होणारे, कधी टणाटण उड्या मारीत, दुडदुड़ धांवत जाऊन बाजूच्यांना थपडा देत, गालगुच्चे घेत, बोबडे बोल उच्चारित निरामय शिशुक्रीडा व थट्टाविनोद करीत असणारे, तर कधी ब्रह्मसंख्या व करतलाभिक्षा करीत असताना अतीव गंभीर अशा आत्मध्यानांत रमून, प्रणवनाद घुमवत ऊर्ध्वदृष्टी बाळगून असणारे अशा नानाविध रूपांनी नटलेलं सगुण – निर्गुण त्यांचे चरित्रांश व रूप-गुण, प्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी पाहिले, अनुभवले, ते ते खरोखरच धन्य होत! अमृताचा एक जरी थेंब कुणाच्या वाट्याला आला तरी तो नि:संशय अमर झाला. अमर म्हणजे देव म्हणजे दिव्य अर्थात प्रकाशमान गुणांनी मंडित ज्याचे व्यक्तिमत्व असा तो! अशी सरळ सोपी व समीकरणात्मक व्याख्या बरं!!

सारतः असे कों, गंगौघ उत्तरोत्तर विशालच होत जावा तद्वत् श्रींचे आत्मतेज व बहिर्गत निष्कलंक धवल किर्तीहि पुढे पुढे वाढत गेली. अनुयायांचे शिष्य – प्रशिष्यांचे, भक्तांचे समुदाय सहस्रावधी संख्येने फोफावू लागले. अर्थात शिष्यर्वेपुल्य व चौफेर प्रसिद्धी हे काही साधूत्वाचे नेहमीच नेमके गमक असते असे नाही. त्याचप्रमाणे बाह्य व लौकिक कार्यांच्या यशापयशावरून महात्माच्या थोरपणाचे, त्याच्या प्रतापाचे मूल्यमापन केले जात नसून त्याने केवढे मोठे ध्येय उराशी कवटाळले आहे व त्याला अनुलक्षून त्याची धडपड किती उत्कट आहे, मनस्वी आहे, तीव्र आहे, सातत्याची आहे. साध्याप्रतची त्याची झेप केवढी उत्तुंग आहे. सर्व जग जरी विरोधी व प्रतिकूल होऊन उठले तरी सुद्धा सत्याचा अभिमान घेऊन आत्मबळाने प्रतिकार व संघर्ष करीत राहाणे, यावरच त्याची भव्यता, दिव्यता आधारलेली असते. या दृष्टीने पाहू जाता, अखिल जगतालाच ब्रम्हाभिमुख करण्याची श्रींची मनिषा व जिद्द अन् तदर्थ त्यांनी अहर्निश केलेली धडपड नि घेतलेले परिश्रम ‘प्राणाचीहि पर्वा न करता केलेले खडतर प्रयास’ हे सर्व तर श्रीस्वामींजीच्या महान साधुत्वाची जिवंत साक्षच म्हटली पाहिजे.

स्वतः सतत सर्व प्रकारचे हलाहल जिरवीत असतांनाहि जन्मभर एक निर्भेळ व परिष्कृत आनंदवादाचाच स-आचरण पुरस्कार करीत राहाणे, हा तर श्रींचा लक्षणी विशेष म्हणून मानता येईल. ‘सदा स्वरुपासंधाने । हेच साधुचे लक्षण।’ हा श्रीसमर्थनिर्मित निकष तर त्यांना एकशे एक टक्के विशुद्ध उतरवीत होतो, हे काय निराळे सांगायला हवे? अंगी अदभूत सामर्थ्य असूनहि समर्पित जीवनाचा एक अपूर्व आदर्श त्यानीं सुजनांसमोर उभा केला, तो तर त्यांच्या सत्पुरुषत्वाची ग्वाहीच देत आहे. असो!

संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर एक तप उलटल्यावर म्हणजे शके १८७६ (इ. स. १९५४) च्या विजयादशमीस प्राचीन ऋषीमुनींनी वास्तव्य केलेल्या व ज्या ठिकाणी वेदकालीन वातावरणाचीच स्वाभाविक निर्मिती आहे अशा वरदपूर येथील निसर्गरम्य श्रीधराश्रमात श्रींनी तिथल्या पर्वतश्रेणीतील अत्युच्च शिखरावर स्वहस्तें धर्मध्वजाची स्थापना केली, जणू श्रींच्या कार्याच्या विजयाचेच तें निशाण नीलगगनांत उंच मानेने फडकू लागले. अन् पुनश्च आसेतुहिमाचल परिभ्रमण सुरूं झाले. अनेकांना अनुग्रह, गुरुदेपश, विविध उपासना, साधना देऊ केल्या, तर कित्येकांना सदुपदेश धर्मतत्त्वज्ञानाचा बोध करून दिला. दृष्टी, स्पर्श, अभिमंत्रण इत्यादि द्वारा काहींना देवदेवताच्या निरनिराळ्या सेवेला लावून, काहींना सान्निध्यांत ठेवून घेऊन, अशा विविध त-हेने कित्येक जणांची, कुटंबाचा, घराण्यांचा श्रींनी अक्षरशः उध्दार केलेला आहे. 

दुरितांचे तिमिर जावे म्हणून कणाकणांनी ते झिजत गेले, क्षणाक्षणाला ते झटत राहिले. दुःख, शोक, चिंता, भय, उद्विग्नता यांनी पोळलेले, त्रिविध तापानी होरपळलेले, आत्मघातासाठी उद्युक्त झालेले, अशा कित्येकांच्या नानाविध पीडा, बाधा, विघ्ने, संकटे आदीचे निवारण करून त्यांना दुर्लभ अशा दिव्य जीवनाचे उदंड दान दिले. दुराचार, कुविचार, अनीती, पापवृत्ती, दौर्बल्य, हिनता, दीनता इत्यादि अरिष्टांपासून कित्येकांना सोडवून त्यांना निर्दुष्ट उत्कृष्ट भूमिकेवर आणून सोडले. दुःशील, भ्रष्ट पतित अशांनाहि स्वरूपस्नेहाने हृदयाशी लावून, त्यांचे घोर अपराध, प्रमाद क्षमून त्यांना पावन केले. असंख्य जणांना सन्मार्गाला लावले. याखेरीज अनेक धर्मोद्योग, धर्मजागृती,  धर्मस्थापना, साधुसंतांचा आदरसत्कार, सज्जनांचा गौरव चांगले म्हणून जे जे काही त्यांचा पाठपुरावा, झाले तर परमार्थाचे राज्य बळकट करणे, अशा बहुविध बहुमुखी कार्यात श्रींनी आपली सारी शक्ती व आयुष्यही वेचले.

आपल्या परीने व आपल्या परिसरांत श्रींनी जगदुध्दारच केला ‘जेथे सारासार विचार । तेथे होय जगदुध्दार ।’ असे श्रीसमर्थांनी सिध्दांत वचनच स्पष्टपणे नाही कां सांगितले ? यात भर म्हणून श्रींनी अपरंपार तप ओतले. अक्षरशः शुंडाधारेने तप ओतले | अगदी अखेरच्या श्वासापर्यत बाणेदार वृत्तीने, असिधाग्रताने व काटेकोरपणे निखळ वैदिक तप आचरणे, ही कल्पना सिध्द पुरुषांना, योगिजनांनाही जिथे दु:सह वाटते, तिथे इतरांचा काय पाड ? म्हणून त्या तपाला आजच्या काळात तोड नाही ! त्या प्रचंड तपाने उदभूत दैवी शुभ-स्पंदांचा एक अपर हिमालयच जणू या भूतलावर तयार झाला आहे. दिव्यचक्षूना व ज्ञानदृष्टीला तो दिसू शकतो, अशा या उत्तंग, उदात्त, उन्नत हिमनगातून जगदुध्दारक अशी उज्जवल गंगा उद्भवली आहे. इच्यातील प्रत्येक शुक्लबिंदु हा सत्यनिष्ठेने संप्रतिष्ठित्त, चैतन्यशक्तीने अभिमंत्रित व आनंद भाजतेने प्रवाहित आहे ! वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, नव्हे जागतिक उन्नतीचीहि ऊर्जा या तपोगंगेतून यापुढेहि नेहमीसाठी अव्याहत खळाळत राहणार आहे! मात्र त्यासाठी हिच्यात खोलवर अवगाहन करुन निष्कल्मष व्हायला नको काय! नितांत उपयुक्ते, परम मंगलकर अशी एखादी वस्तू असली तरी तिचा उपयोग करुन घेऊन कल्याण साधणे हे शेवटी ज्यांच्या हातीच नसते काय ?

एकंदरीत महान ब्रम्हवेत्ता, ऋषितुल्य तपस्वी, अथांग योगी, समदृष्टी पंडित, परतत्त्वस्पर्शी, प्रतिभावान, पारदर्शी वेदविद, क्रांतदर्शी विद्वान प्रगाढ अध्यात्मवादी विरक्त महासाधु, आदर्श संन्यासी, निग्रहानुग्रहसक्त सद्गुरू असे श्रींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू – उपपैलू सूक्ष्मपणे पाहू जाता त्याला ना पार, असे यथार्थ जाणवून मन, बुध्दी, चित्त थक्क होऊन जातात भारावून जातात.

‘वासनतृप्त सखोल योगी । भव्य सुप्रसन्न वीतरागी । सौम्य सात्त्विक शुध्दमार्गी। निष्कपट निर्व्यसनी’ ।।
सारसर्वस्व एकादशगुणसमुच्चयाचा आदर्शच जगापुढे श्रींनी स्वकतृत्वाने नव्याने पुनश्च उभा केला. चालता बोलता श्रीदासबोधच ते बनून राहिले होते. ग्रंथराजातील सद्गुरू संत, सत्वगुण, सद्विद्या वैराग्य, सिद्ध, शुद्धज्ञान, महंत निस्पृह, भक्त, चातुर्य, उत्तम पुरुष, सदैव इत्यादि लक्षणे वर्णनपर आणि तसे कितीतरी समासचे समास वाचीत असतांना आपण श्रींचेच वर्णन अनुभवित आहोत असे वाटू लागते. तसेच गीतेतील स्थितप्रज्ञदर्शन काय नि योगी, ज्ञानी, भक्त इत्यादीबद्दलचे विवेचन काय, श्रींच्या गुणविशेषांना हमखास लागू पडते.

श्रींच्या दैदिप्यमान व्यक्तिमत्वाचे साकल्याने पण संक्षेपाने, रोचक पण बोधक असे कथन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न त्यांच्याच प्रेरणेने झाला. त्यामुळे जनमानसांत  श्रींची प्रतिमा बिंदुमात्र का असेना, पण जशीच्या तशी प्रतिबिंबित व्हावी हा या मागील प्रामाणिक हेतु !!

श्रींच्या चरणकमलांप्रती कोटी कोटी अभिवंदन असोत !! 

इति शम् ।

– ‘श्रीधर महात्म्य’ या पुस्तिकेंतुन संकलित

श्रीधर संदेश (मार्गशीर्ष १९०७)

सन १९८५

home-last-sec-img