Memories

२८. श्रीसद्गुरूंच्या प्रथमदर्शनाचा अष्टसात्विक भावयुक्त अनुभव

केशव कृष्णाजी नाडगौडाकडोली  

श्रीधराय नमो नमः 

१९३० साल नुकतेच सुरु झाले होते. तत्पूर्वी राष्ट्रीय कीर्तनकार श्री. पटवर्धनबुवा यांची कीर्तनें बेळगांवच्या श्रीमारुती मंदिरांत चालू होती. अगदी लहानपणापासूनच मी त्यांची कीर्तनें श्रवण करीत आलो. राष्ट्रांत बलदंड तरुणपिढी कशी तयार करावी याची समर्थ संप्रदायाकडून जी शिकवण दिली जाते तीस अनुसरून कीर्तन माध्यमातून ते ध्येय प्रत्यक्ष स्वत:च्या आचरणाने पूज्य पटवर्धनबुवांनी आजन्म अव्याहतपणे आम्हापुढे ठेवून, तरुणांनी सूर्यनमस्कार घातलेच पाहिजेत हा प्रेमळ दंडक कीर्तनाद्वारे त्यांनी श्रोतृगणावर घातला. असो. एके दिवशी त्यांनी कीर्तनांत ‘लवकरच सज्जनगडाहून श्रीधरस्वामी येणार आहेत. त्यांना तुम्हाला जे काय विचारावयाचें तें विचारून घ्या’ असे सांगितले. लवकरच बेळगांवी श्रींचे शिष्यपरिवारासह आगमन झाले. मी मातापित्यासह मारुतीमंदिरात अतीव श्रद्धेने व अत्यंतिक उत्कंठेने वाट पहात बसलो होतो. श्रींचे दुरूनच दर्शन घडलें व कैक शेकडों वर्षांपासून जणु ज्यांची वाट पहात बसलो होतो ती मूर्ती नयनांत साठवली गेली. लहानपणापासूनच आमच्या आजोबांच्या सान्निध्यांत भागवत नित्य वाचनाचा व ऐकण्याचा परिपाठ, परमश्रेष्ठ पित्यांना श्रीगोंदवलेकर महाराजांचा साक्षात अनुग्रह त्यामुळे रामनामाचे गर्भादेव बाळकडू पाजलेले आणि इतरहि पांडवप्रताप, शिवलीलामृत आदि ग्रंथ रोज वंदनीय मातोश्री सोवळयांत म्हणत असता कानावर पडत असलेले. तसेच श्रीगुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने व इतर वेळी पारायणात्मक रीतीने वाचन असे सर्व चालू असताना, त्यांतच इंग्रजी शिक्षण होऊन पाश्चात्य वेषाची नोकरीपेशामुळे संवय जडलेली, तीस अनुसरुन त्या विचारांचा पण न कळत वैकल्पिक प्रादुर्भाव घडलेला म्हणजे या सर्व ग्रंथांतून वर्णन केल्याप्रमाणे परमात्म्याची मूर्ती मानवी आकारांत पहाणे शक्य नाहींच व अत एव या सर्व गोष्टी कपोलकल्पित आहेत. त्या प्रत्यक्ष मानवी आकारामध्ये दिसल्यासच खरे म्हणता येईल, येथपर्यंत विचारांची मजल गेलेली अशातच श्रींचे दर्शन घडले आणि काय आश्चर्य ! एकूण एक देहभान हरपून गेले. डोळयांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहूं लागल्या. चालता बोलता देव मी प्रत्यक्ष पाहिला. आतां आणिक दुसरे पहावयाचे कारणच उरले नाही. म्हणतात ना अनंत जन्मीचे पुण्य उदयास येते, तद्वत झालें, चालताबोलता परमेश्वर कुणी पाहिलाय काय ? प्रत्येक ग्रंथामधून वर्णने आहेत पण ती वाचून का कुणाला समाधान होणार? मग काय इथून तिथून सर्व कल्पनाच !! या विचार दृढतेला आकस्मिक एवढा जबरदस्त टोला श्री दर्शनाकरवी बसला की, त्याबरोबरच अशा धारणेच्या विचारांना अंतःकरणामध्ये इतःपर चुकूनसुद्धा थारा देणार नाही अशी प्रतिज्ञाच केली. कारण नजरेखालून गेलेल्या सर्व ग्रंथांतून, आजवर ऐकलेल्या कथाकीर्तनातून असणारा मूर्तिमंत चालता बोलता देवच मी आज या चक्षूंनी पाहिला व आणिक कोणतेहि पहावयाला शिल्लक उरले नाही, अशी स्थिती झाली. श्रींच्या प्रथम दर्शनाची ही किमया श्रीसद्गुरूंनी आपणहून घडवून आणली श्रींच्या वेणूग्रामातील पुढील वास्तव्यांत मजवर घडलेल्या प्रक्षेपणाचे अनेकविध नमुने व प्रसंग आहेत ते सांगू गेल्यास तो श्रीदर्शनाचा एक वेगळा ग्रंथच होईल.

सद्गुरूंनी खरोखरच He came, He saw, He conquered. अशी किमया आम्हा बेळगांवकरांवर केली व आमच्या हृदयमंदिरात आम्ही त्यांना कायमचेच बसविलें. आता कल्पांतापर्यंत व पुढेही त्यांचेच स्वानंदसाम्राज्य चालू आहे व राहील. मजसारख्या क्षुद्र व नगण्य अशा असंख्य जीवांचा ते उद्धार करीत राहातील यांत तिळमात्र शंका नाही.

इति शम्

– श्रीधर संदेश (पौष १९०७)

सन १९८५

home-last-sec-img