Memories

२९. हा योगायोग नव्हे

श्री. वसंत शंकर वैद्य, श्रीरामपूर 

।।    

‘घार फिरे आकाशीं । लक्ष तिचे पिलांपाशी।’ या वचनाचा प्रत्यय मला शके १८९३ च्या गुरूपौणिमेच्या वेळी आला. मी, गु. बं तलवार व गु. बं. देव्हारे असे तिघेजण आषाढ शु।। १३ ला श्रीरामपूरहून रेल्वेने श्रीक्षेत्र वरदपुरास जाण्यासाठी निघालो. रेल्वेत खूपच गर्दी असल्याने मिरजपावेतोंचा प्रवास अक्षरशः खाली बसूनच करावा लागला. तेथून पुढे व्याडगी स्टेशन पावेतो पोहोचण्यास संध्याकाळ झाली. स्टेशनवरून टांग्याने आम्ही बसस्थानकावर आलो. पाऊस पडल्याने तेथील थांबण्याची जागा ओलीचिंब झाली होती. स्थानकावर येतांच सागरसाठी गाडीची चौकशी करतां ‘उद्या सकाळी ७ वाजता गाडी आहे’ असे स्थानकाधिकाऱ्याने सांगितले. ते ऐकतांच आम्ही सर्व खिन्न झालो. व्याडगी गावांत लॉज नव्हता व बसस्थानकावर सर्वत्र चिक-चिक झाली होती. संपूर्ण रात्र येथेच बसून काढावी लागणार या विवंचनेने मन सुन्न झाले. इतक्यांत गु. बंधु देव्हारे हे लघुशंकेस बाहेर गेले व परततांना रस्त्यातील पानपट्टीच्या दुकानापाशी उभ्या असलेल्या एका गृहस्थाने त्यांना स्वतःहून बोलावून घेतले व चौकशी करून विचारले ‘आपण कोठून आलात? इकडे कोठे जावयाचे ? त्यावर त्यांनी ‘आम्ही नगर जिल्हयातील श्रीरामपूरहन आलो असून श्रीक्षेत्र वरदपुरास श्रीधरस्वामी महाराजांच्याकडे गुरुपौणिमेनिमित्त जावयाचे आहे’ असे सांगितले. पहा ! पूर्वीचा कोणताहि परिचय नसतांना त्या गृहस्थाने सांगितले की, ‘काही काळजी करु नका ! तुमच्या रहाण्याची सोय मी आमच्या आडत दुकानीं करतो. तुम्ही तुमचे सामान घेऊन माझे बरोबर चला !’ आम्ही लगेच आमचे सामान घेऊन त्याच्याबरोबर तेथून अंदाजे दोन फर्लांग असलेल्या त्याच्या आडत दूकानी गेलो. ते दुकान म्हणजे ४।५ खोल्या असलेला बंगलाच होता. त्यातील मुख्य ऑफीसची खोली त्यांनी उघडून दिली तेथे फोन, पंखा, गाद्या, लोड इत्यादि सर्वकाही व्यवस्था होती. आम्ही आमचे सामान तेथे ठेवतों न ठेवतों तोच त्यांनी विचारले ‘तुम्हास भोजन करावयाचे असेल ना? त्यावर आम्ही होकार दिला. लगेच त्याने आपल्या दुकानचा हमाल खाणावळ दाखविण्यासाठी आमच्याबरोबर दिला. तेथील कानडी ब्राह्मणाच्या खाणावळीत भोजन आटोपून आम्ही परत आलो व आरामशीर झोपलो. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता उठून प्रातर्विधी उरकून बसस्थानकावर जाण्यासाठी तेथील दिवाणजींचा निरोप घेऊन निघालो. सकाळी वाजता व्याडगीहून वरदपूरसाठी प्रवास सुरु झाला. बस चालू असतांना मनांत भावचक्र सुरु झाले. पहा ! या परक्या ठिकाणी कोणाचीहि ओळख नसतांना श्रीसद्गुरूमाउलीनींच त्या गृहस्थाच्या अंतःकरणांत प्रेरणा देऊन आम्हा सर्वांची अत्यंत आपुलकीने सोय केली. ही सर्व माउलीचीच वात्सल्यपूर्ण कृपा !

सागरला आमची बस ११॥ वाजतां पोहोचली व गाडीतून उतरतो तोंच त्या बस शेजारीच वरदपूरला जाणारी बस उभी होती. लगेच आम्ही तिच्यांत बसलो व गाडी निघाली. आम्ही दुपारी १२ वाजता पोहोचलो. तेथे प्रथम नाशिकचे गु. बं. कुलकर्णी भेटले व त्यांनी ‘अर्ध्या तासाने श्रींचे गुरूपौणिमेवर प्रवचन त्यांच्या एकांतातील खोलीमधून ध्वनिक्षेपकावरून होणार आहे’ असे सांगितले. आम्ही ताबडतोब निवासावर जाऊन सामान ठेवले व श्रीधरतीर्थावर स्नान करुन श्रीधरतीर्थकूटीजवळ प्रवचन ऐकण्यासाठी बसलो. थोड्या वेळाने श्रींचे व्यासपौणिमेचे ‘गुरूतत्त्वावरील’ प्रवचन प्रथम १५ मिनिटे कानडींत व मग पंधरा मिनिटे मराठीत झाले. प्रवचनानंतर महाप्रसाद व मंत्राक्षता घेऊन आम्ही विश्रांती घेतली.

श्रीधर संदेश (पौष १९०७)

सन  १९८५

home-last-sec-img