Memories

३०. समर्थांचा नवा अवतार

आचार्य प्र. के. अत्रे

आम्ही भोंदुगिरीचे नि बुवाबाजीचें ज्याप्रमाणे कट्टर दुष्मन आहोत, त्याप्रमाणे साधूंचे नि संतांचे दासानुदास आहोत. आम्ही बुद्धिवादी तर आहोतच आहोत पण त्याचबरोबर आम्ही भाविक व श्रद्धाळू आहोत. अडाणीपणाला उर्मटपणाची जोड देणे म्हणजे काही बुद्धिवाद नव्हे. ज्ञान हे बुद्धिगम्य असले तरी श्रद्धा असल्यांवाचून तें प्राप्त होत नाही, असे गीतेनेच सांगितले आहे. बुद्धी ही श्रद्धेशी विसंगत नाही. विश्वाची सर्वच रहस्ये आपल्याला उमगली असा मोठमोठया विद्वानांनी आणि शास्त्रज्ञांनी सुद्धा अहंकार धरूं नये. ज्ञानाने आणि विज्ञानाने या जगांत कितीहि प्रगती केली तरी त्यामुळे मानवाला मनःशांती लाभत नाही, असे मौल्यवान विचार डॉ. प्र. न. जोशी यांनी परवाच ‘वसंत व्याख्यान मालेत’ सांगितले. ते सांगतांना ते म्हणाले, “विज्ञानाने मानवाला अनेक भौतिक सुखसाधने प्राप्त करुन दिली. पण तरीहि मानव सुखी झाल्याचे आढळत नाही. विज्ञानाने मानवापुढील अनेक समस्या सोडविल्या. मानवावरील अनेक दुःखाचे आणि आपत्तींचे निराकरण केले. पण त्याबरोबर अनेक नवे प्रश्न उपस्थित केले. एकाकाळी विज्ञानाने मानव सुखी होईल असें विज्ञानवेत्त्यांना वाटत होते पण ती अपेक्षा फोल ठरली आहे. विज्ञानाने अनेक सुखे उपलब्ध करून दिली असली तरी मानसिक शांतीसाठी मानवी मनावर योग्य संस्कार करण्याचे सामर्थ्य विज्ञानात नाही. त्यासाठी मानवाला चराचरांत आंतरिक ऐक्य पाहण्यास शिकविणा-या साधुसंतांच्या विचाराकडे म्हणजे धर्मविचाराकडे वळणे जरूरीचे वाटू लागले आहे”. 

धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे की ईश्वरीपूजेचे अन् जपजाप्याचे स्तोम नव्हे. ‘ईशावास्यमिदं सर्व’ हे जरी खरे असले तरी ईश्वराचा साक्षात्कार हा प्रत्यक्ष कोणालाही होत नाही. तो सत्पुरुषामधूनच होतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. गाडगे बाबा म्हणत, “तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी।’ साधूंची आणि सत्पुरुषांची व्याख्या तुकोबांनी अनेक अभंगांत करून ठेवली आहे. ‘भूतांची दया हे भांडवल संता। आपुली ममता नाहीं देहीं ।। तुका म्हणे सुख परांबिया सुख ।’ हे संतांचे खरे लक्षण आहे तथापी ‘संतचिन्हे लेउनि अंगी । भूषण मिरविती जगी।’ असला ढोंगी भोंदूपणा फार चालत असल्याने बुवाबाजीचे उदंड पीक जगांत’ माजले आहे. म्हणूनच राष्ट्रपति राधाकृष्णन् एकदां व्याख्यानांत म्हणाले, “एक संत झाला वर शंभर भोंदू असतात. ‘For one saint there are hundred frauds’ ते आपण साधु वा संत असल्याचा बहाणा करतात. पण त्यांच्यापासून सर्वानी दूर रहाण्याची आवश्यकता आहे. भगवी वस्त्रे घालून साधुत्व येत नाही. त्यागांत साधुत्व आहे. तथापि अज्ञ जनांना खरे नाणे आणि खोटे नाणे यांतला फरक समजत नाही म्हणून बुवांची पोळी पिकते. आमच्यामते सत्पुरुषांची एकच कसोटी आहे. ती ही की, जो स्वत:च्या अंगी ईश्वराचा संचार झाल्याचे ढोंग करून स्वतःचे समाजांत देव्हारे माजवीत नाही आणि ‘परद्रव्य परनारीची अभिलाषा’ न धरता जगाच्या कल्याणासाठी ‘देह कष्टविती उपकारे’ तोच खरा संत. ‘तुका म्हणे सांग किती। तोचि भगवंताची मूर्ति ह्या कसोटीला उतरणारे अनेक साधूसंत आजपर्यंत जसे महाराष्ट्रांत होऊन गेले आहेत तसे आजच्या काळीहि महाराष्ट्रांत विद्यमान आहेत. अशा चार दोन संतांचा नि आमचा प्रत्यक्ष परिचय होता नि आहे.’ म्हणून त्यांच्याच आशीर्वादाने नि कृपाप्रसादाने आम्ही चार वेडीवाकडी मराठी अक्षरे समाजपुरुषाच्या चरणावर आतापर्यंत वाहूं शकलो आहोत. अशा विद्यमान महापुरुषांमध्ये आम्ही समर्थशिष्य श्रीधरस्वामींचा समावेश करतो. तशी त्यांची नि आमची काही ओळख नाही. त्यांचे पूर्वचरित्रहि आम्हाला माहित नाही. पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहांत ते बाल्यकाळांत रहात होते नि आमच्या आवडत्या भावे स्कुलमध्ये ते काही काळ शिकत होते. एवढीच त्रोटक हकीगत कोणी तरी आम्हाला त्यांच्याबद्दल सांगितली. त्यानंतर त्यांना समर्थांचा साक्षात्कार होऊन त्यांनी “ध्यान, धारणा नि तपस्या या साधनांचा जवळ जवळ तीन तपे अंगिकार करून महान योगसामर्थ्य प्राप्त करून घेतलेले आहे. आजच्या युगांतले ते एक समर्थांचा नवा अवतारच आहेत असेच मानले जाते. कित्येक वर्षे त्यांचे वास्तव्य सज्जनगडावर होते. त्यानंतर त्यांनी कर्नाटकांतील शिमोगा जिल्हयातील सागर तालुक्यामधल्या श्री वरदपूर या ठिकाणी स्थलांतर केले आणि तीन फेब्रुवारी १९६३ रोजी मौनयुक्त एकांत स्वीकारला. त्या एकांतातून जरी ते आतां बाहेर आले असले तरी त्यांचे मौनव्रत अद्याप चालूच आहे.

अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे आणि समर्थांच्या कृपेने श्रीधरस्वामींच्या अंगी अलौकिक योगसामर्थ्य आलेले आहे, असा अनेक भक्तांना अनुभव आलेला आहे. दोन वर्षापूर्वी श्रीवरदपूर येथे मौनयुक्त एकांत स्वीकारण्यापूर्वी श्रीधरस्वामीमहाराज ज्या ठिकाणी बसले होते त्यापासून जवळच काही खेडवळ लोक त्यांच्या दर्शनार्थ बसले असता एका ‘यक्षाने’ एका खेडुताच्या अंगात संचार केला नि तो श्रींना बाहेर येण्यास पाचारण करूं लागला, श्रींची स्वारी बाहेर आली तेव्हा त्या यक्षाने कानडी भाषेत श्रींना जें निवेदन केले त्याचा सारांश बेळगांवचे श्रीधरस्वामींचे वयोवृद्ध भक्त डॉ. जठार यांनी आम्हास परवांच सांगितला, तो असा, ‘श्रीसमर्थकाली धर्मरक्षणाकरितां ज्याप्रमाणे श्रीछत्रपति शिवाजीमहाराज यांचा उदय झाला, तसाच महाराष्ट्रात एका व्यक्तीचा उदय होऊन समस्त महाराष्ट्राच्या सहाय्याने ती भारतावरील परराष्ट्रांचे हल्ले परतवून लावील. सारांश नांवाप्रमाणे महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त होईल. १९६५ च्या वैशाख, ज्येष्ठामध्ये चीन पाकिस्तान संघर्ष सुरु होईल अन् अखेर भारत हा एकसंध नि अखंड देश होईल’ हे भविष्य खरे ठरण्याची वेळ आतां कांही दूर नाही’. ते असो.

दि. १७ मे रोजी दुपारी आम्ही पुण्याहून महाबळेश्वरकडे जात असतांना कात्रज घाटापलिकडच्या शिंदेवाडीला श्रीधरस्वामींची मोटार समोरून येतांना आम्हाला अकस्मात दिसली. तेव्हा उभयतांच्या मोटारी थांबल्या. आम्ही आमच्या मोटारीतून उतरून श्रीधरस्वामींच्या चरणावर भक्तिभावाने मस्तक ठेवले. त्यांनी आमच्या कपाळावर आणि मस्तकावर आपला वरदहस्त दीर्घकाळपर्यंत ठेवून आम्हाला योगपूर्वक आशीर्वाद दिला. श्रीधरस्वामींच्या तोंडावरचे कारुण्य व वात्सल्य पाहून आम्ही अक्षरशः विरघळून गेलो. त्यांच्या मौनामध्ये त्यांची सर्व भावना आम्हाला समजली. अशा सत्पुरुषाचा आम्हाला नि आमच्या कार्याला अशा नाटयपूर्ण योगायोगाने आशीर्वाद मिळाला, हे आम्ही आमचे महाभाग्य समजतो. त्या भाग्यांत आमच्या दैनिक ‘मराठ्याचे’ सर्व वाचक भागिदार आहेत अशीच आमची भावना आहे.

महाराष्ट्राचे ‘आनंदवन भुवन’ व्हावे अशी ज्याला रात्रंदिवस चिंता लागून राहिलेली आहे असा एक महान योगीपुरुष सांप्रत श्रीधरस्वामींच्या रूपाने महाराष्ट्रांत वावरतो आहे, हे महाराष्ट्राचे केवढे थोर भाग्य आहे! त्यांच्या आशीर्वादाने भारताची नि महाराष्ट्राची सर्व इप्सिते साध्य होवोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. 

(आचार्य प्र. के. अत्रे यांच्या दैनिक मराठा दि. २३ मे १९६५ च्या अग्रलेखातूने संकलित)

– श्रीधर संदेश (माघ १९०७)

सन १९८५

home-last-sec-img