Memories

३१. इये अनुभवाचिये बोले !

भि. . बोकंद वार्डे  

श्रीराम समर्थ

आमचे श्वशूर ती. गणपतराव माळवे स्वामीजींचे अनुग्रहित शिष्य. त्यांनी एकदा त्यांच्या कोर्टाच्या केसेसबद्दल वैतागून स्वामीजींना पत्र लिहिले की, ‘मला काहीतरी मार्गदर्शन करा!’ त्यांना स्वामीजींनी लेखी उत्तर न देता मंत्राक्षता व तिळगुळ पाठवून दिला. खरे पाहिले तर त्यावेळी संक्रांतीच्या सणाची वेळ मुळीच नव्हती. योगायोग असा की, त्या पुढील पंधरवड्यांतच केसचा निकाल आमच्या सासऱ्यांच्या बाजूने लागला व त्या तिळगुळाचा संकेत कळला.

त्यांचाच दुसरा अनुभव म्हणजे त्यांनी श्रींचा अनुग्रह मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. सोनगांव येथील श्रींच्या मुक्कामातील ही गोष्ट. स्वामीजींचे प्रवचन संपले व सर्वंजण दर्शन घेत असतांना हेहि दर्शन घेण्यासाठी स्वामीचरणांवर मस्तक ठेवणार तत्पूर्वीच स्वामीजींनी त्यांना हटकले, ‘अरे! तुला अनुग्रह हवा ना! मग उद्या पहाटेच ५ वाजता तयार रहा ! हे त्यांचे महामंगल शब्द ऐकून सासरे आश्चर्याने स्तंभित झाले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अनुग्रह मिळाला. परंतू केवढे हे सामर्थ्य ? काय वर्णन करणार त्यांच्या या अलौकिक सामर्थ्याचे आपणासारखी साधी माणसे !

स्वामीजींचे तेथील वास्तव्य ४।५ दिवसांत आटोपल्यावर ते बैलगाडीत बसून निघाले. त्यांच्या मागे मागे भक्तवृंद चालत होता. त्यांत माझे सासरेहि होते. सासऱ्याना श्रींच्या वियोगाची जाणीव होऊन त्यांचे हृदय भरून आले, डोळे डबडबून त्यांना रडू कोसळले व ते स्वामीजींच्या लक्षात आले आणि त्यांनी बैलगाडी थांबविण्यास सांगितले. स्वामीजींनी कमंडलूतून पाणी हातात घेऊन ते सासऱ्यांच्या चेहयावर शिंपडले व उद्गारले, ‘बाळ ! तूं माझ्या या शरीराकडे बघायचे नाही रे! मला तूं तुझ्या अंत:करणांत बघ. मी सतत तुझ्या जवळच आहे. शरीरें ही बाह्यस्वरूपे आहेत. हे ऐकून ते शांत झाले व समजले की केवढा हा महान उपदेश, केवळ ४-५ मिनिटांत महान उपदेश !!

श्रीधर संदेश (फाल्गुन  १९०७)

सन १९८५

home-last-sec-img