Memories

३३. अशी आहे माझी श्रीगुरुमाऊली

श्रीराम समर्थ ।।  

‘जे करामती दाखविती ! तेही गुरु म्हणिजेती।’ परंतु असे गुरु अडक्याला तीन जरी मिळाले तरी करूं नयेत !’ असे श्रीसमर्थांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आमची ही श्रीगुरुमाउली हे करामती करणारे नव्हतेच तर ते निर्गुण निराकार परब्रह्म सगुण साकार होऊन आमच्या उध्दारासाठी भूतलावर प्रगट झालेलं प्रत्यक्ष परब्रह्मच होतं. मग चमत्कार कुठचा ! पण पुराणातील गुरूप्रमाणे शिष्याची सत्वपरीक्षा घेऊन त्यात जे पार पडतील व जर पार पडतील त्यावर अनुग्रह करणारेहि नव्हते, तर ‘सर्वाभूतो आत्माराम !’ मग तो मनुष्य असो अगर मूकप्राणी. मला तर कनवाळू श्रीगुरुमाउलीच भेटली. त्यातीलच एक अनुभव !

श्रीगुरुमाउलींचा वरदपुरास मौनयुक्त एकांत चालु होता. सन १९६९ च्या गुरुपौणिमेस श्रींचे सर्वांना दर्शन होणार नाही म्हणून मी व माझे वडील वरदपूरास गेलो नाही पण पौणिमेंनतर आमच्या घरून वडील बंधुचे एक पत्र व मंत्राक्षताही आल्या. त्यात त्याने लिहीले होते की ‘श्रींनी सर्वांना मंत्राक्षता-प्रसाद दिला !’ माझे गांव बेळगांव जवळचे एक खेड आहे. वरदपुराहुन श्रींचे एक शिष्य परत आल्यानंतर मिळालेल्या मंत्राक्षता पोष्टाने मिळेपर्यंत वद्य द्वादशी उजाडली. आलेले पत्र वाचून ‘आपण गेलो नाहीं ही फार मोठी चूक केली’ म्हणून हळहळ वाटली. तसेच तळमळहि वाटली, श्रीगुरुमाउलींच्या दर्शनाची. झालं. रजा काढली व आम्ही पिता-पुत्री वरदपुरास गेलो. तेथे गेल्यावर समजले की श्रीगुरुमाउलीनी एकांत कुटीतून ध्वनिक्षेपकावरून प्रवचन केले होते व मंत्राक्षता आपल्या एका संन्यासी शिष्याकरवी दिल्या. आम्ही श्रीवरदआंबच्या मंदिरात सामान ठेवले. त्याच वेळी होन्नावरहुनहि दोन सद्गृहस्थ आले होते. आम्ही चौघेजण श्रीगुरुमाउलींच्या दर्शनासाठी वर चढून गेलो ते त्या सदगृहस्थाच्या सांगण्यावरून.धर्मस्तंभाच्या खालच्या बाजूल खोदलेल्या गुहेत श्रीगुरुमाउली आहे म्हणून त्या ठिकाणी बाहेरूनच नमस्कार केला. तोपावेतो संध्याकाळ झाली होती. वयोवृध्द श्रीगुरुभगिनी गंगाक्कानी आपल्या जवळील कंदील दिला. तो घेऊन चांगल्या रस्त्याने जावे म्हणून तीर्थकुटी मागे येऊ लागले त्याच वेळी श्रीगुरुमाउली श्रीधरतीर्थावर स्नानासाठी आल्याचे अनुभविले. माउली बहुतेक स्नान आटोपून अंग पुसीत उभी होती. तट्टीमुळे दर्शन प्रत्यक्ष झाले नाही. पण संशय आला व मी ओरडले, ‘काका थांबा ! श्रीगुरुमाउली येथेच आहे.’ आम्ही दोघेहि तेथेच नतमस्तक झालो अर्थात तट्टीच्या बाहेरूनच. आम्ही कदाचित आत जाऊ म्हणून अष्टमहासिध्दीला वाटल्याने तिने दरवाजाला कर्माची कडी घातली आणि फार दिवसांनी भेटीस आलेल्या वासराला पाहुन धेनू लपून बसली ब्रह्मकपाटांत. आम्ही पूर्वकर्माच्या फे-यात गुरफटलेले पामर फक्त हात जोडून निघालो कर्मकचाटयात. 

रात्री जेवणे झाली. आम्ही वरदअंबेच्या भोवती बांधलेल्या चंद्रशाळेत (पड गाळेत) झोपलो. ती आषाढी अमावस्या. बाहेर धो धो पाऊस पडत होता. थंडीही भयंकर होती व तेथे ओलही अतिशय आली होती. उघड्याबरच झोपावयाचे. अंथरुण म्हणाल तर प्रत्येकी एक एक चादर व सतरंजी फक्त. माझे वडील वृध्द. तेव्हा मनात आलं ‘देवा ! हे काकांना बाधू देऊ नकोस’ आणि त्याच वेळी वडिलांच्या मनातहि तेच आले (हे त्यांनी मला नंतर सांगितले) की ही थंडी आम्हाला न बाधो’ झाले. आम्ही दोघेही देवाची प्रार्थना करीत झोपलो. झोप कसची लागते त्या गारठयांत ! फक्त पडलो होतो. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीगुरु शिष्य जनार्दन कानडीतून म्हणाला ‘बेळगावचे मराठी बोलणारे कोणी आले आहेत त्यांना भरपूर अंथरुण पांघरुण देण्यास श्रीगुरुमाउलीनी सांगितले आहे. मराठी बोलणारे कोण आहेत !’ म्हणून ओरडा झाला. वास्तवीक ते शिष्य (जनार्दन) कोठे तरी गेले होते. ते रात्री परत आले व लगेच श्रीमाउलीने त्यांना पाठवलं की त्यांच्या रुपांत माउली स्वतः आली हे कोण जाणे. झोपतांना आमच्या मनात जे आले ते जवळ जवळ तेथून एक मैलभर अंतरावर श्रीगरुमाउलीना समजले व लगेच आमच्या अंथरुण-पांघरुणाची पूर्ण व्यवस्था करवली. याचा अर्थ श्रीमाउलीनी आमची चौकशी-खुशाली कळवून घेण्यासाठी ध्यान लाविले व त्याच वेळी आमच्या मनात अंथरुणाची काळजी, या नश्वर शरीराची काळजी वाटली असावी हे केवळ आमचे दुर्भाग्यच. श्रीगुरुमाउली तर ‘हंबरून देत वत्सा धेनु पान्हा’ या प्रमाणे आमच्या मनात जे होते ते भरपूर देते.

अशी होती माझी माउली नव्हे अशी आहे माझी माउली की जी आताहि मज अनाथाला रात्रंदिवस पावलोपावली सांभाळते. मुलाने जरी आईची आठवणहि काढली नाही तरी माउली मुलास क्षणभरहि विसरत नाही तशी. काय लिहूं व किती लिहूं ? आणखी एक गोड अमृताचा पेला!

मी म्हणजे एका सनातन कर्मठ कुटुंबात नास्तिक, पाखंडी, जंगली जनावरं जन्मलेली की आपल्या वाङनखानी प्रत्येकाला ओरखडे काढून रक्तबंबाळ करणारी. जन्मतःच आजार हा पूर्वजन्मीचा सोबती म्हणून आणलेला. एकदा एक ज्योतिषी घरी आले होते. त्यांच्या सांगण्यावरून वडिलांनी मला श्रीरामप्रभूचा एक फोटो आणून दिला. त्याची रविवारी पूजा करणे हीच काय ती जमेची बाजू.

अशा या पतिताच्या उद्धाराकरतां श्रीगुरुमाउली १९६९ साली बेळगांवी आली होती. सहजपणे लांबूनच त्या विभूतीवर नजर पडली आणि काय सांगू ‘परिस जर लोखंडास चुकून लागला’ तर जे होईल तेंच घडले. अनंत जन्मीचे भाग्य उदयाला आले आणि त्या परब्रह्माचा वरदहस्त पाठींवरून फिरला, मस्तक पूण्यपावन चरणकमलांवर स्थिर होताच पूर्व दुष्कर्म लोपले. श्रीसद्गुरुमाउलींची पूर्ण कृपा झाली आणि आजहि त्यांची माझ्यावर पूर्ण कृपा आहे हे लिहिण्याचे कारणहि असेंच घडले.

आजार हा माझा जन्मजात सोबती, कधी कमी कधी जास्त. अशीच दि. ३० जानेवारी १९८६ ला पोटदुखी पराकोटीला गेली. रजा काढून घरी राहावे लागले. संध्याकाळ झाली म्हणून तशीच उठले. पाय धुऊन श्रींना आरती केली आणि अष्टक म्हणत तेथेच बसले. वेदना असहय होत होत्या. श्रींच्याकडे ऐहिक सुखासाठी काही मागावयाचे नाही’ हा निश्चय ढळला. रजोगुणाने जोर केला व श्रींच्या पुढे लावलेल्या उदबत्तीचा अंगारा घेऊन हात नकळत पोटावर फिरला तसेच मुखाने श्रीगुरुमंत्र उच्चारला गेला. आणि काय आश्चर्य! माझा हात हा साधा हात राहिला नाही. तो एक जादूची कांडी होऊन वेदना पार नाहीशा झाल्या. अशी आहे माझी श्रीगुरुमाउली. मी जरी कशीहि होते, कशीहि असले तरी माझी आई माझा कधींच राग धरत नाही. म्हणून म्हणते – मी श्रीगुरुमाउलीची लाडकी भक्त आहे आणि प्रार्थना करते की, ‘हे प्रभो! मला आता हेच दे!’

‘दीनदयाळा, पतितपावना, गुरुनाथा देवा । 

अनन्यभावे वंदन करिते, चरणी ठाव द्यावा ।।

मी भक्त आहे की शिष्या आहे की फक्त अनुग्रहिता किंवा कोणीच नव्हे हे माझे मलाच माहित नाही. मला फक्त एकच माहित आहे की, भगवान सद्गुरु स्वामी ही माझी गुरुमाउली आहे. 

सद्गुरु भगवान श्रीधरस्वामी महाराज की जय !!

जय जय रघुवीर समर्थ !

– श्रीधर संदेश (चैत्र १९०८)

सन १९८६

home-last-sec-img