Memories

३७. बोलविता धनी वेगळाची

केशव मुळे  

शके १८६६ मध्ये श्रीसद्गुरुमाउलींचा चातुर्मास हुशंगाबाद येथे नर्मदाकिनारी कोरीघाटाजवळील एका घरात सुरू होणार होता. गुरुपौर्णिमेस श्रीगुरुमाउलींच्या दिव्य चरणांची प्रत्यक्ष पूजा करावयास मिळावी या हेतूने आम्ही नाशिकहून ७ जण हुशंगाबाद येथे गेलो होतो. आषाढ शु १४ स आमच्या बरोबरच्या काही मंडळींनी श्रींच्याकडून अनुग्रह घेतला व गुरुपौणिमेस दुपारी आम्ही सर्वांनी श्रीगुरुमाउलींच्या परमपावन दिव्यचरणांची षोडशोपचारानें पूजा केली. संध्याकाळी श्रीगुरुमाउली सायंस्नानासाठी नर्मदेच्या घाटावर आली. श्रींच्या समागमे स्नानास आलेल्या मंडळींत मीहि होतो. स्नान उरकून घाटाच्या पायऱ्या चढू लागतों तोच एक महाराष्ट्रीय योगाभ्यासी तेथें आला व त्याने माझा योगाभ्यास चालू आहे. मला निरनिराळे आवाज ऐकू येतात व निरनिराळे रंगहि दृष्टीसमोर दिसतात. तेंव्हा मी आता काय करूं? असा प्रश्न श्रीगुरुमाउलीस केला. श्रींचे मौन चालूच होते. त्यामुळे त्यांनी त्या गृहस्थास माझ्याकडे बोट दाखवून मला ‘त्याचे समाधान कर’ असें खुणेने सुचविलें. खरे पाहिले तर मला या गोष्टीचा सुतरामहि अनुभव नव्हता व आजहि नाही. मी आवाक् झालो. श्रीगुरुमाउलीने पुन्हा मला सूचना दिली व मी त्या गृहस्थाचे समाधान केल्याचे मला आठवते. मी त्याला काय सांगितले हे मला स्मरतंही नाही. त्या गृहस्थाचे समाधान होतांच त्याने श्रीसद्गुरुमाउलींना साष्टांग नमस्कार घातला व मलाहि नमस्कार करून तो निघून गेला. मी त्या मनुष्यास उत्तरे देत असतां श्रीगुरुमाउली माझ्या समोर उभी होती. त्या शास्त्राचे ज्ञान मुळीच नसतां मी त्या मनुष्याचे कसे समाधान करूं शकलो याचे आजहि मला आश्चर्य वाटते. श्रीगुरुचरित्रातील गर्विष्ठ पंडिताचा गर्वहरण करण्यासाठी रस्त्यावरच्या अंत्यजाचा व श्रीसमर्थांनी काशीच्या पंडिताचे अशाच प्रकारे गर्वहरण केले. त्याचप्रमाणे माझाहि उपयोग श्रीसदगुरुमाउलीने करून घेतला असेंच मला तरी वाटते. श्रीसद्गुरुमाउलींची लीला अगाध आहे. !!

– श्रीधर संदेश (चैत्र १९०८)

सन १९८६

home-last-sec-img