Memories

३८. आमची गुरुमाऊली

एक शिष्या 

माझी मुलगी व जावई श्रीस्वामीजींचे अनुग्रहित असल्याने त्यांच्या बरोबर आमचेहि श्रीस्वामीजींच्या मुक्कामी वरचेवर जाणे होई. श्रीस्वामीजींच्या भेटीचा योग म्हणजे आम्हाला महान पर्वणीच व ठरल्यापासून तो श्रीस्वामीजींचे दर्शन होईतो पर्यंत वृत्ती स्वामीमय होई.

एकदा आम्ही वरदपूरला गेलो असतां स्वामीजी एकांतात व मौनांत होते. पण आम्ही आल्याचे त्यांनी जणं अंतर्ज्ञानानेच जाणले, कुटीवर गेल्यावर आम्हां सर्वास क्षेमकुशल विचारून आम्हा सर्वांना आशीर्वाद दिला व एक-दोन दिवस राहण्यास सांगितले. त्यांच्या मुखातील ‘बाळ!’ हा शब्द अजुन कानी घुमतो. त्यांचे धीर, गंभीर व सुमधुर बोल ऐकुन जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटे,

श्रीस्वामींनी म्हणावयाचे ‘बाळ! कशाला काळजी करतेस? तुझ्या सर्वमुलींची लग्ने होऊन चांगले जावई मिळतील. तू शांत व निवांत रहा’ मन मोहरून जायचे. दुसऱ्या दिवशी मंत्राक्षता व तीर्थ घेऊन परवानगी घेतली. इतक्यात बस सुटायची वेळ झाली  म्हणून आम्ही तसेच निघालो परंतु स्वामीजी असल्याने त्यांनी अंतर्ज्ञानी गंगाक्काकडून उपमा व गरमागरम चहा पाठवला. केवढे हे प्रेम! गंगाक्कानी सांगितले की, ‘इथन उपाशी जायचे नाहि’ आमची बसही चुकली नाही. तिथून निघतांना खरोखरच पाय निघायचा नाही, डोळे भरून यायचे व मन गलबलुन जायचे जणु ती माऊलीच आमची. 

त्यानंतर १५ दिवसानींच पून्हा स्वामीजींच्या भेटीचा योग आला. त्यावेळी माझ्या मुलाची अमेरिकेत जाण्याची निवड झाली होती. पैसे वगैरे सर्व भरुन झाले होते. परंतु आम्हास एकटाच मुलगा असल्याने त्याला परदेशी पाठवण्याचा धीर होत नव्हता. पण बालहट्ट  कसा मोडायचा? शेवटी असे ठरले की, स्वामीजी जसे म्हणतील तसे करावयाचे. मुलाने हि ते कबूल केले. 

त्यानंतर आमचे जावई, मुलगी व आम्ही वरदपूरला आलो. श्रोस्वामीजींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. जावयांनी स्वामीजींना मुलाची हकीगत सांगितली. चर्चा झाली. स्वामीजींनी चटकन सांगितले की, ‘त्याला यावेळी पाठवू नका. आता पाठवणे बरे नाही. पुढे योग येईल, झाले. परत आल्यावर मुलाच्या कानावर ही गोष्ट घातली. त्याने ती ताबडतोब मान्य केली व आजतागायत तो स्वामीजींचा निस्सिम एकनिष्ठ भक्त आहे व साऱ्यागोष्टी श्रीस्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे भक्तीभावाने करतो. अशी ही आमची श्रीसद्गुरु माऊली आमचा संभाळ करते.

श्रीधर संदेश (वैशाख १९०८, सन १९८६)

home-last-sec-img