Memories

४२. श्रींची रत्नागिरीस भेट

श्रीराम समर्थ ।।  

वंदनीय, पूजनीय श्रीस्वामीजी ५ दिवस म्हणजे चार रात्री रत्नागिरीस वास्तव्यास होते. स्वामीजींचे रत्नागिरीस रविवारी आगमन झाले तों पावेतो स्वामीजी कोण? याची कल्पनाही तेथील लोकांना नव्हती. परंतु पांच दिवसांत असे अनुभव येत गेले की, श्रीसद्गुरु श्रीधर स्वामीजी म्हणजे साक्षात् दत्ताचा अवतारच नव्हे तर त्याहि पलीकडे, हे सारे विश्व जो चालवितो तोच. कारण स्वामीजींचे शब्द आहेत कीया विश्वाच्या भोवती माझी वलये आहेत.’ 

स्वामीजी आले ही बातमी रत्नगिरीत प्रथम कोणालाही माहित नव्हती पण श्रींच्या आगमनानंतर तासा-दोन तासांत आमच्या घरी हजारों माणसांची रीघ लागली. आमचे घर दुमजली असून त्यांत २०० माणसें झोपु शकतील एवढे मोठे आहे. पण पांच दिवसांत या घरात हजारो माणसें होती। घराभोवती अंदाजे २० गुंठे आवार आहे या जागेतहि बोट शिरायला वाव नव्हता. कैक लोकांचे आर्थिक, कौटुंबिक, पिशाच्च विषयी प्रश्न तसेंच पूर्व जन्माजित कांही पाप असेल तर त्याचेहि निराकरण होत होते.

आमच्याकडे स्वामीजींचे जों पावेतो वास्तव्य होतें तो पावेतो ‘आम्हाला गुरुपदेश द्या’ अशी मागणी आम्ही केली नाही. बुधवारी रात्री श्रींच्या समागमांतील एका शिष्याने स्वामीजींना विचारले की ‘आपण चार दिवस येथे राहिलो. पण ही मंडळी उपदेश मागत नाहीत व आपणहि देत नाही.’ तेव्हा श्री सद्गुरुनी ‘उद्या गुरुवारद्वादशी, उद्या त्यांना उपदेश देणार!’ गुरुवारी सकाळी आम्हा पांच भावंडांना व आई-वडिलांना श्रीनी गुरुमंत्र दिला गोकर्णाचे वे. मू. खरे शास्री यांनी शंका विचारली की, या लहान मुलांना गुरु व उपदेश हे कसे समजावे?’ कारण मी त्यावेळी नऊ वर्षाचा व धाकटी बहीण पांच वर्षांची होती. स्वामीजी खरे शास्त्र्यांना म्हणाले की, त्या सर्वांच्या डोळयात दृष्टी लावून पहा!’ त्यावर खरे शास्त्र्यांनी ‘आपण म्हणता ते खरे आहे! असे सांगितले. धाकटी बहीण सध्या डोंबिवलीला असते. त्या वयात तिला काही समजत नव्हते पण उपदेश घेण्याच्या वेळचे सर्व काही तिला ताजेच घडले असे दिसते. आम्हा सर्व भावंडात श्रींची जास्त सेवा, जप, ध्यान, धारणा तीच करते. तिच्या वयाच्या मानाने ती तेथेहि श्रीसदगुरुंच्या आशीर्वादाने लोकांना गोष्टी शिकवते.

आमची लायकी नसतांना सद्गुरु आमच्याकडे आले. रत्नागिरीतील एक धनाढय गृहस्थ स्वामीजींना घेऊन येण्यासाठी गडावर पूर्वी गेले होते पण ‘स्थान पवित्र नाही.’ यामुळे आगमन झाले नाही.

आमच्या पूर्वापार परंपरेनुसार रत्नागिरी शहरात येणारे कीर्तनकार प्रवचनकार बुवा त्यांच्या मुक्कामांत निदान एकदा तरी आमच्या घरी प्रसादाला येत असत. कल्याणबुवा कानीटकर हेहि आले होते. बुवा जरा गैरवर्तनी असले तरी दासबोधावर तें उत्तम प्रवचन करीत. ते आमच्याकडे २-३ महिने राहिले होते. आमच्या नैमित्तिक पूजा, अध्यात्म गुरुचरित्र इत्यादीमुळे भारावून, तसेच माझ्या आजीला चाळीस वर्षे असणारा दमा घालविण्यासाठी कल्याण बुवांनी गडावर जावून स्वामीजींनाच येथे आणावयाचे ठरविले. चार दिवस ते श्रींना आग्रह करीत होते. शेवटी आपण रत्नागिरीस न आल्यास मी माझे डोके फोडून घेइन’ असें त्याने सांगितल्यावर स्वामीजींनी खरे शास्त्र्यांना ‘रत्नागिरीतील मराठे यांचे घर आपणांस उतरण्यास योग्य आहे का ते पहां’ असे सांगितले. हे सर्व त्यावेळी सज्जनगडावर होते. तेथूनच खरे शास्त्री यांनी ‘घर उतरायला योग्य’ असल्याचे सांगताच निघण्याची तयारी झाली.

स्वामीजी रत्नगिरीस आल्यावर श्रींच्या एका शिष्याने विचारले की ‘आपण येथे पांच दिवस रहावयाचे कारण काय?’ त्यांवर श्री म्हणाले की ‘या घरात आठ पिढया श्री दत्तोपासना आहे. तसेंच या घरात पू. अक्कलकोट स्वामी व पू. वासुदेवानंद सरस्वती अशी दोन तेजें वास करीत असतात. त्यामुळे मला येणे भागच होते.’ आम्हाला उपदेश देण्याच्या वेळी श्री खरेशास्त्री यांना स्वामी म्हणाले, ‘शास्त्रीबुवा समोर पहा!’ आणि ते पाहून त्यांना घाम फुटला व ते म्हणाले ‘दोन तेजःपुंज व्यक्ती दिसतात, त्यांचे तेज मला सहन होत नाही. त्या व्यक्ती म्हणतात की या घराण्याचे आम्ही आजपर्यंत रक्षण केले असून हे काम आतां श्रीधरस्वामींनी आपल्याकडे घ्यावे.

येथे आल्यावर पहिले दोन दिवस स्वामीजींना मुळीच वेळ मिळाला नाही. माझे आजीचा दम्याचा विकार वाढल्याने ती जाते की काय? अशी अवस्था झाली. ही गोष्ट स्वामीजींना आम्ही मुळीच सांगितली नाही. इतकेच नव्हे तर हे असे का हाते असेंहि आमच्या घरांतील कोणीहि स्वामीजींना विचारले नाही. पण आमच्या मनांत जे येई त्याची उकल स्वामीजी स्वतःच करीत असत. अचानक स्वामीजी म्हणाले की, ‘या घरांत जास्त आजारी, मरणोन्मुख कोणी आहे का?’ त्यावर ‘होय’ म्हणताच स्वामीजी म्हणाले ‘त्या रुग्णाला माझ्या पादुकांजवळ बसवा.’ तसे करतांच माझी ६० वर्षाची आजी हर्षवायु व्हावा तशी इतकी आनंदी झाली की, गेल्या चाळीस वर्षात ती कधीहि इतकी समाधानी व हसरी दिसली नव्हती. तिचा रोग पूर्णपणे गेला होता व तिला पूर्वीप्रमाणे शक्तींहि वाटू लागली. दुसऱ्या दिवशी स्वामीजींनी तिच्यावरची सर्व पिशाच्चे काढली. ३० वर्षापूर्वी आईच्या माहेरचा गोठा जळून त्यांत एक गाय मेली होती. ही गोष्ट स्वामीजी सांगेपर्यंत आम्हाला माहित नाहती. ती गाय स्वामीजींकडे मुवती मागावयास आली होती व स्वामीजींनी तिला मुक्ति दिली.

आजी ला स्वामीजी म्हणाले ‘तुझे पूर्वजन्माजित संचित पाप थोडे शिल्लक आहे. तेव्हा या जन्मात तें भोगणार नसलीस तर पूढच्या जन्मी तुला ते त्रास देईल, यासाठी १% दम्याचा त्रास भोगण्यास ठेवतो व ९९% पूर्ण बरा करतो. तुला आपले व्यवहार, जेवणखाण, कामें सर्व व्यवस्थितपणे करता येतील, त्या प्रमाणे तिचा दम्याचा त्रास पूर्ण बरा झाला. ती पुढे २० वर्षे जगली व अचानक निवर्तली.

स्वामीजी आमच्या येथून गुरुवारी निघाले, माझ्या आईने ‘भिक्षा करून जा’ असे म्हटले. त्यावर स्वामीजी ‘अरे! तो परशुराम माझ्या भिक्षेची तयारी करून वाट पहात बसला आहे. गेलो नाही तर अनर्थ होईल! असे म्हणून गोरस प्राशन करून निघाले. माझे वडील श्रींच्या समागमें गेले वाटेत एके ठिकाणी स्वामीजींनी गाडी थांबवण्यासाठी सांगितले. गाडी थांबताच एक प्रेतयात्रा तेथून निघून गेली. गाडी पुढे जात असतां तिच्या पुढे एक ट्रक धूळ उडवीत जात होता. बराच वेळ त्रास सोसल्यावर स्वामीजींनी ट्रकलाबंदची आज्ञा केली आणि खरोखरच तो बंद पडून रस्त्याच्या कडेला थांबला.

परशुरामाची घाटी उतरतांना श्रींनी आपल्या पायांतील पादुका, आसपास बरेच लोक असूनहि माझे वडील माधव भार्गव मराठे यांच्या हातांत सांभाळण्यासाठी दिल्या. पुढे काही महिन्यानी याच पादुका श्रींनी आम्हाला दिल्या. (पादुका कशा मिळाल्या ते पुढीलअंकी)

श्रीधर संदेश (ज्येष्ठ १९०८)

सन १९८६

home-last-sec-img