Memories

४६. श्रीसद्गुरूकृपा

।। श्री श्रीधराय नमः ।।  

श्रीसद्गरु माउलींची प्रथम भेट आम्हा उभयतांना हैदराबाद येथे १९६० साली झाली. त्यावेळेस आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती माझे वय अठरा वर्षाचे होते. आमच्या वाड्यातील काही मंडळी स्वामीजींच्या दर्शनास निघाली होती आम्हाला पणआपण दर्शनास येता का? असे त्यांनी विचारले. आपण दर्शनास जावे असे फार वाटू लागले, परंतु ते कसे जमणार?, कारण त्यावेळी मी सासुरवाशीण. मी माझ्या स्वेच्छेने कोठेहि जाणे शक्य नव्हते. घरांत काय म्हणतील याची भीती. तरीहि काही असो, आपण स्वामीजींच्या दर्शनास जावे, असा निश्चय केला. घरांतील वडीलधाऱ्यांची परवानगी मागितली पण काहीच उत्तर मिळाले नाही. मी माझ्या पतींना घेऊन श्रींच्या दर्शनास गेले. त्यांनाहि श्रींच्या दर्शनाची तीव्र इच्छा होतीच. त्यावेळी आमच्याजवळ पांच रुपयेसूद्धा श्रींच्यापुढे ठेवण्यासाठी नव्हते कारण माझ्या पतिराजांना नोकरी नव्हती. दोन हात तिसरे मस्तक हेच श्रींच्या चरणी आम्ही ठेवू शकत होतो. त्यामुळे फक्त श्रींचे दर्शन घेवून यावे या भावनेनेच आम्ही गेलो.

श्रीस्वामी आपले पूर्वाश्रमीचे भाचे श्री दत्ता बुवा (श्री दत्तोपंत कमलापुरकर) यांच्या घरी उतरले होते. श्रीनारायण महाराजांच्या मठाजवळ हुसेनी आलम येथे. दत्ताबुवा आमच्या खूपच परिचयाचे होते. त्यांनी आम्हालाअनुग्रह घ्याअसे म्हटले. अनुग्रह देण्याचा कार्यक्रम चालूच होता. अनुग्रह घेण्यासाठी बरीच मंडळी जमली होती. आम्ही दत्ताबुवांना म्हणालो की, अनुग्रह घेण्यासाठी आमच्याकडे कांहीच पूजासामग्री नाही. तेव्हा ते म्हणालेस्वामींना काही लागत नाही. एक दोन फळे एखादा दुसरा रुपाया ठेवला तरी चालेल. अनुग्रह देण्याची वेळ संपत आली होती. तेव्हाअजून एक जोडपे आले आहे. त्यांना पाठवू का? असे दत्ताबुवांनी विचारल्यावर श्री स्वामीजींचा होकार आला. त्यावेळी आम्हाला केवढा आनंद झाला त्याचे वर्णन करणे शक्य नाही. आमच्या मनी ध्यानी नसतांनाहि आम्हाला पूर्वसकृत म्हणूनच अनुग्रह मिळाला, अनुग्रहानंतर आमची परिस्थिती हळूहळू सूधारू लागली. पतिराजांना नोकरी लागली. १९६२ सालापासून आमचा संसार सुरळीत चालू लागला. आज आम्ही श्रीसद्गरुकृपेने वैभवशाली आनंदी आहो. संतती, संपत्ति, घरदार सर्व काही आहे. कशाला कमी नाही. मुले भाविक आहेत. नित्य उपासना व्यवस्थितपणे चालू आहे. दर गुरुवारी संध्याकाळी भजन – पूजन   आरती  होते.  श्रीसद्गुरुकृपेने  कुळधर्म,  कुळाचारहि  व्यवस्थितपणे चालत आहेत  सर्वकाही असेच अखंड चालावे हीच श्रीसदगुरुचरणी प्रार्थना करून ‘हेचि दान दे गा देवा  तुझा विसर  व्हावा ‘ हेच मागणे श्रीचरणी करते.

श्रीधर संदेश (कार्तिक १९०८)

सन १९८६

home-last-sec-img