Memories

४९. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती

स्वानंद नागेश धायगुडे, कऱ्हाड

|| ॐ नमो भगवते श्रीधराय ।।

शके १८८० ज्येष्ठ वद्य द्वादशी (२३ मे १९५८) या दिवशी श्रीधर स्वामीजी कऱ्हाड नगरीत श्री लक्ष्मणराव देशपांडे यांच्याकडे मुक्कामास आले होते. कऱ्हाडला सोमवार पेठेत ‘श्री समर्थ श्रीधराश्रम’ आहे. माझ्या सासऱ्यांचे साडू वे. शा. सं. सोनोपंत उमराणी वरील दिवशी पहाटे माझ्याकडे येऊन म्हणाले, ‘आज तुमच्या मुलांच्या मौंजी आहेत व श्रीधरस्वामींचा मुक्काम आज येथेच आहे. आज आपण स्वामीजींना तुमच्या मुलांच्या मौजीबंधनाचे आमंत्रण देण्यास जाऊ’ ( मुंजीची आमंत्रणपत्रिका पूर्वीच सज्जनगडावर पाठवली होती.) नंतर मी व वे. शा. सं. सोनोपंत गुरुजी स्वामीजींना आमंत्रण देण्यास गेलों. सोनोपंतांचे पूर्वीपासून सज्जनगडावर स्वामींशी गुरुशिष्याचे नाते होते. आमंत्रणानुसार स्वामीजींनी आमच्याकडे मौजीबंधनास येण्यास होकार दिला.

कऱ्हाडच्या सोमवार पेठेतील ‘नूतन मराठी शाळा’ हे कार्यस्थळ ठरले होते. सकाळी ठीक ९ वाजतां परमपूज्य श्रीधरस्वामी मंडपांत आले. प्रथम मंज मुलगे चि. नागेश व चि. विश्वास वय वर्षे अनुक्रमे १० व ७ यांना आशीर्वाद देऊन त्यांच्याकडून मनाचे श्लोक, भगवद्गीतेतील अध्याय इत्यादि म्हणवून घेतले. ते ऐंकून वाणी शुद्ध व पाठांतर चांगले असल्याचे स्वामींनी सांगितले व संतोष पावले. नंतर मी सपत्नीक श्रींची पाद्यपूजा केली. पाद्यपूजा चालू असतांना स्वामीजींचे ध्यान लागले व ते माझ्या पत्नीस म्हणाले, ‘मुली, अलिकडे तुला काहीतरी त्रास होत असला पाहिजे’ तिने उत्तर दिले की, “माझ्या स्वप्नांत मी देवीच्या देवळात पूजेस गेले असता माझा कुंकवाचा करंडा कोणीतरी उडवत आहे व मला भीती वाटते असे दिसते. मी दचकून जागी होते. असे गेली दोन वर्षे आहे.” स्वामीजींनी मलाहि खोदून खोदून विचारले. तेव्हा मी सांगितले की, आदल्याच दिवशी पाणी भरत असतांना भिंतीवरून २०-२५ किलो वजनाचा दगड माझ्या डोक्यांत पडत असलेला माझ्या शिपायाने पाहिला व त्याने धांवत येऊन दगड आडविला. नाहीतर त्याच वेळी माझा कपाळमोक्ष झाला असता. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या. पाद्यपूजेनंतर स्वामींनी ध्यान लावले व दहा मिनीटांनी त्यांनी आम्हा उभयतांस देवघरांत जाऊन कुलदेवतेचे ध्यान करण्यास सांगितले. तसेच कुलदेवतेची ओटी भरून नैवेद्य दाखवावयास सांगून एक घागरभर पाणी मंत्रवून ते आजच्या जेवणाच्या पंक्तीत वाढावे असे सांगितले. असे करण्याचे कारण त्यांनी सांगितले की, “ज्यावेळी आपण एखादे शुभकार्य करतो त्यावेळी देवदेवतांनाहि आपण आवाहन करतो. अशावेळी इतर योनीतील अतृप्त आत्मेसुद्धा न बोलावता तेथे येत असतात. तुमची पीडा आता दूर झालेली आहे.” त्यानंतर खरोखरच मला व माझ्या पत्नीला कांहींहि त्रास झालेला नाही. माझे दोन मुलगे व एक कन्या यांनाहि श्रीसद्गुरूंचा आशीर्वाद मिळाल्यामुळे ती सर्व गुणी व बुद्धीमान झाली आहेत. तसेच कोणत्याच प्रकारची अडचण नाही. असा मी सुखी आहे. श्रीसद्गुरुमाउलींच्या कृपाप्रसादाने व प्रचीतीमुळे आमचे हात तेथे जुळतील यांत नवल ते काय !!

– श्रीधर संदेश (कार्तिक १९०८)

सन १९८६

home-last-sec-img