Upasana

संकीर्ण

पाळणा

बाळा जो जो रे श्रीधरा ! त्रैमूर्ती अवतारा । बाळा ॥धृ॥

धर्मग्लानीनें, अति पीडा, होऊनीयां अवनीसी ।
प्राथितसे, देवा, ती दीना, धावा सोडविण्यासी ॥१॥

करितां तीव्र तपा, जननिपिता, पुत्रप्राप्तीसाठी।
गाणगापुर क्षेत्री, प्रभु पावे, वर दे, येईन पोटी ॥२॥

जाती दिवस सती कमलेला, पुण्यवती मातेला।
डोहाळे होती, बोलत ती धर्मोद्धारा करि मी ॥३॥

चिंचोळी ग्रामीं, सद्भाग्ये, मार्गशीर्ष शुभ मासी ।
दत्तजयंतीला शुभवारीं, येती प्रभु जन्मासी ।।४।।

दत्तात्रेयांच्या जन्माची, शुभ वेळा संध्येची ।
बालक शुभ झालें, आनंदे, राज्यच आपुलें केलें ॥५॥

नारायण-कमला, जननि-पिता, सौख्य समाधिस मिळती।
प्रेमें जन सारे, बाळाचें दर्शन घ्याया येती ॥६॥

कीर्तन जयघोषें सर्वत्र, वातावरण पवित्र।
वेदांचे धोष, बाळासी, गाती शुभ सामासी ॥७॥

सज्जनगिरीवरती, आनंदें, कळस गुरूंचा डोले।
शिष्योत्तम आले, धर्माचे पालक जन्मा आले ॥८॥

श्रीधर नाव तया ठेवीयलें, पेढे सर्वा दिधलें।
त्या मम गुरूराजा, वंदन हे काव्यमिषे या केले ॥९॥

धावा

धांव, पाव सद्गुरो ! श्रीधरा ! बाहतो मी तुजला ।
चिंताज्वाला पोळिति, जीव मम कासाविस झाला ।।धृ।।

षड्रिपुजाली गुरफटलो मी, नाहीं मज त्राण ।
सोडवि मजला यातुन ऐसा तूंच जगी जाण ॥१॥

वमित वासना नागिण गरळा, गुदमरुनी गेलो।
ईष्र्या, तृष्णा, असुया त्रासें भांबावुनि गेलो ।।२।।

अहंकाराचा विषार झाला, ओळख मज नाही ।
स्वार्थाने जाहलो आंधळा, धर्म सुचत नाही ।।३।।

काय करूं रे ? मार्ग मिळेना ! सुचत न कांही मला।
गुरो! माउली !! सत्वर येई, सोडि केशवाला ।।४।।

पुष्पांजलि

पुष्पांजलि हीं तुम्हां अर्पितो श्रीधरगुरु सदया।
अखंड लागो छंद मना या तव पदी रत व्हावया ।। १ ।।

सुमनांची ही भरुनि अंजुली अर्पित सुमनांनी।
गोड करा ही, अल्पसि सेवा, करितो विनवणी ।। २ ।।

भाविक प्रेमळ भक्त मंडळी रमता तव पायीं ।
पुन्हा न जन्मा येति कधी ते करिसी नवलाई ।। ३ ।।

अनंत अपराधी परी मी दास तुझा आहे ।
कृपादृष्टिनें सद्गुरुराया लक्षीं लवलाहे ।। ४ ।।

भक्त-काम-कल्पद्रुमा मागणे नसें अन्य कांहीं ।
सदा देउनी दृढतरभक्ति ठेवि तव पायीं ।। ५ ।।

end-content-img