Upasana

भूपाळ्या

।।१।।

उठि उठि बा श्रीधरा गुरुवरा उषःकाल होई।
अगणित गुरूवर ऋषिमुनि जमले, दर्शन झणि देई।।धृ।।

उत्कंठित आम्हि भवतहि सारे, जमली जणू वासरे।
धेनूमाउली गुरुराये गे! तुझीच हीं लेकुरे।
पान्हा सोडी झडकरि आता कृपादुग्ध देई।।१।।

गंगा यमुना गोदा कृष्णा सप्तनद्या येउनि।
तव स्नानार्थे अक्षय्य सजल कलश उभ्या घेउनी।
न्हाऊनी शीघ्रचि सदया! सकला तीर्थामृत देई।।२।।

मलयगिरी अन् हिमगिरी येती, चंदन घेत करी ।
गंधविलेपन करण्या तुजप्रति केशरकस्तूरी ।
निद्रा त्यागुनि, संध्या करुनि, पूजा ही घेई ॥३॥

स्वर्णकमलिनी हातीं घेउनी स्वर्गंगा येते ।
पारिजात, पुन्नाग, घेउनि वसुधा उभि तेथें ।
स्वर्गधरेला पावन करण्या अर्चन हे घेई ॥ ४ ॥

प्रभातसमिरण परिमललहरी घेउनि येथ उभा ।
धूपारति तुज करण्यां उत्सुक दाटलि देवसभा ।
वात्सल्याने अवलोकन करि सर्वाते आई ॥५॥

प्रात:संध्या दिशादिशांच्या प्रभांसहित येई ।
अरुणाकाशी हिरण्यज्योती दिव्य अशा घेई।
ओवाळणि तव करण्यां आतुर, तरि उठनी येई ।।६।।

हर्षभराने कामधेनु ही दूध, दही, लोणी।
कल्पतरूंची फळे रसाळे, अमृतही आणी।
सेवुनि शुभ तीं साऱ्या विश्वा मंगलता देई ॥७॥

लौकिक सारे भक्तहि जमले भावभरित हृदयें।
फराळ पूजा घेउनि आम्हां करी कृतार्थ दये।
प्रार्थित आतां ऐवय सदोदित तव चरणीं देई ।।८।।

।।२।।

निजध्यास निरंतरा श्रीधरा । उषःकाल झाला ।
दावी निजमुख ज्ञानभास्करा, जीवन द्या सकला ।।ध्रु।।

पहाटसमयी पूर्व दिशेप्रति रक्तकमल उमलले ।
किरणाश्वावरि आरुढ होउनी अरुणराज पातले ॥ १॥

स्वागत करण्या सिद्ध दशदिशी दिव्य तेज उजळती ।
ठायीं ठायीं गोठ्यामधुनी कपिला हंबरती ।॥२॥

प्रांगणि द्वारी सुशील नारी संमार्जन प्रोक्षिती ।
नयनमनोहर रंग विखरुनी रांगोळया रेखिती ॥३॥

वृक्षलतेवरि जागृत पक्षी कंकारव करिती ।
वैदिकवृंदे पवित्रवाणी वेदमंत्र पठती ॥४॥

साधक-वत्से प्रेमे न्हाउनि भावे आळविती ।
चरण देखतां चातक तोषुनि चरणमृत सेविती ॥५॥

।।३।।

माय तात श्रीधरा! गुरुवरा, अरुणोदय झाला।
कृपास्मितकरें दीनवत्सला! विश्वा या उजळा।।धृ।।

विषयवासना, विकल्प, संशय झाडुनि हा केर।
परस्व निंदा, परनिंदाष्म कंटका, फेकीयलें दूर।।१।।

प्रेमकस्तुरी, श्रद्धाकेसर, भक्ती गंगाजळी।
तुझी अंगणे, श्रीगुरुराया, भक्तांनी शिंपली।।२।।

गुरुनामाच्या उद्घोषाचा निनादतो चौघडा।
काम क्रोध घृत कार्पासाचा पेटविला काकडा।।३।।

मधुर मंजूळा लय तालासह शांतीची सनई।
स्वयें भक्ति जणुं मूर्त होऊनी भूपाळ्या गायी।।४।।

तरुशाखांवर द्विज शुक कोकिळ साथ तिथे करिती।
उषा येउनी ओवाळी तुज अरुणबिंब ज्योती।।५।।

ओंकाराचा शंखनाद ते योगीजन करिती।
सोहं सोहं झंकारते झांजा झणझणती।।६।।

विश्वासाचें केशर घालुनी गंगाजळ आणिलें।
शास्त्रवृत्ती दंतमंजना जवळी ठेवीयलें।।७।।

वैराग्याच्या दुधात घालुनी विवेक शर्करा।
नैवेद्या आणिलें गुरुवरा! मुखप्रक्षालन करा।।८।।

भक्तीच्या लोण्यात मिसळुनी श्रद्धा खडीसाखर।
पंचप्राणरूपि पंचखाद्य हे करणें स्वीकार।।९।।

रसवाळे गोघृत ही त्यासह पाक बदामाचा।
पंचोपप्राणांचा तांबुल घ्यावा प्रेमाचा।।१०।।

गुरुबोधाचा प्रसाद मंगल भक्तां भरवावा।
कृपादृष्टीने वर्षुनि जीवन विश्वासी सुखवा।।११।।

अहंकार कर्पूर जाळुनी गाऊ या आरती।
गुरूपदकमलपरागसुधेची होऊ द्या प्राप्ती।।१२।।

।।४।।

उठोनिया प्रातःकाळी स्मरा श्रीधर गुरुमाऊली।
दीनजनांची साउली, भवपार करील।।धृ।।

कृपासिंधु दयासागर, शांति प्रेमाचे आगर।
सदा स्मित अभयकर, भक्तजना तोषवी।।१।।

प्रेम भक्तीची ही मूर्ती, देई विवेकस्फूर्ती।
अविवेकाला देऊनि माती, मायाजाला नाशित।।२।।

काम क्रोध मत्सरासी, दर्प लोभ अहंकारासी।
ईर्षा तृष्णा वासनेसी, निर्मूल शीघ्र करित।।३।।

श्रद्धा उपासना भक्ती, विरक्तयोगें ज्ञानप्राप्ती।
निजपद मिळता होईल तृप्ती, सार्थक होईल जन्माचे।।४।।

चला चला हो वेगेसी, जाऊ श्रीधरचरणापाशी।
आत्मसमर्पण सद्गुरूचरणासी, केशव भावें करीतसे।।५।।

end-content-img