Upasana

श्रीराम पाठ

॥ १ ॥

दिनजनावन जीवांचे जीवन । जेणे समाधान संसारीया ॥ १ ॥
जगासी आधार जो कां सर्वेश्वर । निरसी संसार भक्तिभावे ॥ २ ॥
योगयाग क्रिया राम प्राप्त होण्या । सुलभ धावंण्या नामें येई ॥ ३ ॥
तें नाम सुलभ वाचेसी श्रीराम । येणे पूर्ण काम प्राणी पावे ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ २ ॥

साही शास्त्रें तैसी पुराणें तीं सारी । वेद पहा चारी गाती रामा ॥ १ ॥
मंथोनी नवनीता घेऊं या अनंता । करुं सार्थकता जन्माचिया ॥ २ ॥
रामनामें आत्मा जीव शिव सम । भाव मोह भ्रम तेथें नाही ॥ ३ ॥
वेदींचा भावार्थ जीव तरणार्थ । रामनाम स्वार्थ प्राण्यालागी ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ ३ ॥

वानरें तरली शिळा उद्धरली। शबरी मुक्त झाली रामनामें ॥ १ ॥
जया रामनामें पाषाण तरले । उच्चारुं वहिलें वेगीं मुखीं ॥ २ ॥
झणिं येथ येतां अंतकाळ जीवा । कोण तया व्हावा जिवलग ॥ ३ ॥
वेगीं करुं तेणे वेग नामोच्चारीं । राम हा संसारी आम्हां त्राता ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ ४ ॥

नाशिवंत जगीं सर्व जाइजणें । सुख करू नेणें कोणी आम्हां ॥ १ ॥
जया तया जगीं स्वसुख आवडे । उगी बांधवडे जीव मोही ॥ २ ॥
एक राम सखा पावेल निर्वाणीं । अन्य आम्हां कोणी रक्षिता न ॥ ३ ॥
राम सखा करुं म्हणोनिया वेगीं । राम जीवालागी साहाकारी ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ ५ ॥

योग याग व्रत क्रिया नेम धर्म । वांयाची हा श्रम नामाविण ॥ १ ॥
नामें सर्वां सिध्दी पूर्णताहि कर्मा । धरावें या वर्मा मुक्त होण्या ॥ २ ॥
शिव रामनामीं रत सदोदीत । आणिकाची मात कोण जगीं ॥ ३ ॥
शिवाचा हा स्वार्थ नामीं परमार्थ । शीण असे व्यर्थ अन्योपायीं ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ ६ ॥

गेली वेळ न ये घटी पळ तास । काळ क्रूर त्यास दया नसे ॥ १ ॥
क्षणोक्षणीं ऐसें आयुष्य आटतें । काय स्वहितातें साधियेलें ॥ २ ॥
विजेपरि दोन दिसांचे हें भान । जात मावळून देखतांची ॥ ३ ॥
अंतकाळी काय पश्यात्ताप होतां । व्यर्थ सार्थकता तेणें नोहे ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ ७ ॥

देहीं या आमुची दो दीस वसती । पुढील कांही ती येथें नोहे ॥ १ ॥
अनंत तो काळ जावयाचा पुढें । हीत कांही गाढें करावें कीं ॥ २ ॥
पुढें तरी सुख दुःख नोहे कदा । साधावें त्या पदा अत्यादरें ॥ ३ ॥
आपणासी वैर कदा करूं नयें । अंती सर्व जायें निघोनियां ॥ ४ ॥
निघोनियां जाये घ्यावें त्याचें काये । वेगी धरूं सोये शाश्वताची ॥ ५ ॥
मागिल्या कीं जन्मी चुकलोसे हीत । म्हणोनिया प्राप्त गर्भवास ॥ ६ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ७ ॥

॥ ८ ॥

अनेक ते देह मागें जन्मोजन्मीं । तैसे जन्मोजन्मीं पुत्रदारा ॥ १ ॥
पशुयोनीं मिळे भोगीं सुख जैसें । समजा हें तैसें नरयोनी ॥ २ ॥
जन्मोजन्मीं आम्हीं विषय भोगीले । जन्मासी लागलें येणें पुन्हां ॥ ३ ॥
तृप्ति नोहे कदा विषयींच्या स्वार्थे । जाता परमार्थे निज तृप्ति ॥ ४ ॥
होईजेत कष्टी तेंचि का धरावे । वेगीं उद्धरावें आपणासी ॥ ५ ॥
कल्पकोटी गेले देवासीं नेणतां । यातना भोगितां जन्मोजन्म ॥ ६ ॥
आता तरी चुको पुढे गर्भवास । करूं वेगी वास रामापायी ॥ ७ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ८ ॥

॥ ९ ॥

विकारासी थार रोगांचे बिडार । अन्नाचें विकार शरीर हें ॥ १ ॥
आठवितां देह देहाचें स्वरूप । मनासी अमूप वीट येतो ॥ २ ॥
इंद्रियासी सुख व्हावया हरिख । मिथ्याची कीं लेख देहाचा या ॥ ३ ॥
म्हणोनियां आतां तोडूं मोहपाश । जन्मोजन्मीं नाश येणें झाला ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ १० ॥

मृगजलीं आशा ठेवीत कुरंग । आम्हां भवभंग तेवीं नोहे ॥ १ ॥
वंधेचिया सुता करितां मित्रतो । पावेल आकांता म्हणोनियां ॥ २ ॥
विषयाच्या संगे कोण सुखी झाला । विचारोनी बोलां बोलां वेगी ॥ ३ ॥
मनातीत होतां होये सार्थकता । मनासवे जातां अधोगती ॥ ४ ॥
म्हणोनिया सांडूं व्यर्थ याची आस । बहू झाला सोस जन्मोजन्मीं ॥ ५ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ६ ॥

॥ ११ ॥

राम हा समर्थ देवां सोडविता । तयासी मित्रता करूं वेगीं ॥ १ ॥
ज्याची सर्व सत्ता त्याहूनी परता । पैल पावविता आम्हां कोण ॥ २ ॥
विष्णुमाया मोह पाडी जीवालागीं । नसे तेचिं उगी भासविते ॥ ३ ॥
मजचि शरण जे कां जागीं येती । माया ही तरती देव बोले ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ १२ ॥

जागृतीचें दृश्य स्वप्नीं पाहा नाहीं । स्वप्न पाहा नाहीं गाढ झोंपी ॥ १ ॥
नाही गेला दीन पुन्हां ये पाहतां । विचारें तत्वतां फोल सारे ॥ २ ॥
मृत्यु येतां काया पडे पुढे काय । विचारूनी सोय धरूं कांहीं ॥ ३ ॥
ज्याच्यानें जगणें त्यांसी की चुकणें । वायाची कां होणें कष्टी जगीं ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ १३ ॥

नासोनियां जाये त्याची आस काये । वेगी धरूं सोये शाश्वताची ॥ १ ॥
पिंड-ब्रह्मांडासी येणें परी नाश । होतां याची आस फोलचि कीं ॥ २ ॥
पिंड-ब्रह्मांड हे जेथूनी प्रगटे । रहाटे नी आटे जया सत्तें ॥ ३ ॥
धरावा तो राम शाश्वत हा एक । सर्वं हे मायीक तयावीण ॥ ४ ॥
दुःखमूळ जन्म ज्ञानें निरसावा ।विवेकें पाहावा सारासार ॥ ५ ॥
सारा निराकार आकार असार । निराकारें पार पाविजेत ॥ ६ ॥
तीन पांच ऐसे घालती गोंधळ । आम्हां भवजाळ नाहीं नाहीं ॥ ७ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ८ ॥

॥ १४ ॥

संतांच्या संगती सुलभ ही भक्ती । रामपायीं प्रीति ठेवा सदा ॥ १ ॥
ठेवा प्रीति रामीं नित्य सुखाधामीं । तेणें मोह भ्रमीं नातळाल ॥ २ ॥
मोह-भ्रमीं पुन्हा नातळाल तेणें । संसारासी येणे पुन्हा नाहीं ॥ ३ ॥
पुन्हा नाही होणें आम्हां गर्भवास । रामरुपी वास अखंडीत ॥ ४ ॥
स्वयें अखंडीत निर्गुण जो झाला । तोची एक भला समाधानी ॥ ५ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ६ ॥

॥ १५ ॥

स्थूल सूक्ष्म तैसा कारणाचा झाडा । करितां उघडा आत्मा दाटे ॥ १ ॥
तीन्ही अवस्थेसी जो कां एकरूप । सत्य ते स्वरूप जाणावें त्या ॥ २ ॥
तयावरी सर्व तयाच्या आधारें । वर्तताहि खरें तोचि एक ॥ ३ ॥
पाहिजे निश्चयो दृढ स्वरूपाचा । तीही प्रतीतीचा ऐक्य-भाव ॥ ४ ॥
सर्वकाळ संग सोडावा आपुला । मीपणाच्या बोलां लागों नये ॥ ५ ॥
रामप्रसादानें जाणाल हें खरें । एकरूप सारे रामचि हा ॥ ६ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ७ ॥

॥ १६ ॥

पावावया मुक्ती श्रीरामभाजन । श्रवण मनन सर्वकाळ ॥ १ ॥
सर्वकाळ होये सार्थक श्रवणें । ब्रह्मनिरुपणें संतसंगे ॥ २ ॥
संतसंगे ब्रह्मपद ओळखावें । विवेकें पावावे निरंजना ॥ ३ ॥
निरंजनाठायी निर्मळ निश्चळ। एकचि प्रांजळ दुजेवीण ॥ ४ ॥
दुजेवीण स्थिती बाणलीसे जया। मग तया माया आढळेना ॥ ५ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ६ ॥

॥ १७ ॥

वर्णाश्रमाचारीं असावी स्वक्रिया । संतांचिया ठाया भक्तिभाव ॥ १ ॥
परस्त्री-कांचनीं असावी विरक्ति । धर्मन्याय निती काल न्यावा ॥ २ ॥
यथाशक्ती दान दीन-जनसेवा । रामभक्तीं लावा चित्त कांही ॥ ३ ॥
लागों नये कदा मना-मागें मागें । कल्पनेच्या त्यागे समाधान ॥ ४ ॥
रामभक्ती करा असोनी संसारी । तुम्हा रावणारी संरक्षीत ॥ ५ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ६ ॥

॥ १८ ॥

कांही देशकार्य समाजाचें हित । धर्माची ती मात आठवावी ॥ १ ॥
समुदायीं प्रेमें मिळोनियां काजीं । राखावा तो राजी समुदावो ॥ २ ॥
विश्वपूर्ण भाग घटक मी त्याचा असावा मनींचा भाव ऐसा ॥ ३ ॥
स्नान संध्या जप पूजा वैश्वदेव । ब्रह्मयज्ञ भाव अतिथी सेवा ॥ ४ ॥
कुलाचार नेम तीर्थ व्रत पर्व । रामजन्मोत्सव प्रेमभावें ॥ ५ ॥
निंदा द्वेष वाव रामनामीं भाव । भक्ती हा उपाव सोपा जगीं ॥ ६ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ७ ॥

॥ १९ ॥

नारद तो हिंडे गुनागानी नित्य । सर्वाहि सांगत भक्ती करा ॥ १ ॥
भक्तिप्रेम छंदे वेडावून हिंडे । भव मोह बंडे विध्वंसूनी ॥ २ ॥
नारं शब्दें ज्ञान ददातीति देत । नारद म्हणत तेणें तया ॥ ३ ॥
सनकादि झाले तान्मयत्वीं धाले । भान विसरले प्रेमरंगी ॥ ४ ॥
अजुनीहि होती पुढेंहि असती । रामछंदे अती उद्धरले ॥ ५ ॥
नवविधा भक्ती गुंतविता मन । होतें समाधान संसारी या ॥ ६ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ७ ॥

॥ २० ॥

सगुण निर्गुण चरित्र श्रवण । जाणा ही श्रवण आद्य भक्ति ॥ १ ॥
ऐकिलें वाचीलें वाचेनें बोलिलें । कीर्तन हें भलें भक्ति दुजी ॥ २
रूप ज्याचे जाणा सगुण निर्गुण । तन्नामस्मरण भक्ति तिजी ॥ ३ ॥
लक्षण चौथीचें तें ऐसें जाणावें । चरण सेवावे सद्गुरूचें ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ २१ ॥

गुरुदेव पूजा तेंचि तें अर्चन । सहावें वंदन नमस्कार ॥ १ ॥
नमस्कार कीजे अनन्य देवासी । उद्धरी मजसी म्हणोनियां ॥ २ ॥
दास भावे देवा स्वामी हा म्हणोनि । सर्वस्व सेवनीं दास्यभक्ति ॥ ३ ॥
लक्षण हें सख्य आठवे भक्तीचें । सांगावे जीवींचें देवापाशीं ॥ ४ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ५ ॥

॥ २२ ॥

आलीयारे सांग कोण तूं आहेसी । वेगीं आपणासीं ठायीं पाडी ॥ १ ॥
ठायी पाडीं तूज तुंचि चुकलासीं । देहाचा धरीसी अभिमान ॥ २ ॥
अभिमान देहीं कोणत्या भूताचा । पांचा पंचकाचा स्तूळ देह ॥ ३ ॥
स्तळ देह दृश्य जड नाशिवंत । विकार पावत क्षणक्षणा ॥ ४ ॥
क्षणक्षणां जे कां विकार पावत । त्यातें प्रकाशीत वेगळा तो ॥ ५ ॥
वेगळा तोयासी देह मीं ज्या वाटे । जाणे मी त्या तुटे तुज बंध ॥ ६ ॥
नाम मुखीं येता अनंतीं ऐक्यता । भवीं सार्थकता रामरूपें ॥ ७ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ८ ॥

॥ २३ ॥

पंचवीस तत्वें या लिंग देहाचीं । साक्षीं वेगळाचि स्वानुभवें ॥ १ ॥
साक्षी स्वानुभवें स्थूल सूक्ष्माचा तूं । जागृत स्वप्नींचा तूं प्रकाशिता ॥ २ ॥
प्राण अंतःकरण विषय पंचक । इंद्रिये दशक सूक्ष्म देही ॥ ३ ॥
जाणता एकला तूंचि ज्ञानरूपें । तुज नाना रुपें नाहीत की ॥ ४ ॥
वासनेचा देह जयाची वासना । तो तूं नित्य मना आणी वेगीं ॥ ५ ॥
आपणासी पाहे जो कोणी शोधोनी । तो जन्मापासोनी मुक्त झाला ॥ ६ ॥
ओळखितां तेथे तत्वेंचि सरती । नाहीं अहंकृती कांही एक ॥ ७ ॥
भवदाह नामें शांत होये सत्य । मायिकाचें कृत्य आटोपतें ॥ ८ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ९ ॥

॥ २४ ॥

नामरूप देहीं साक्षी तो विदेहीं । विवेकें या नाहीं देहबुद्धी ॥ १ ॥
केवल अदृश्य साक्षी ज्ञानरूप । त्यांत दृश्यरूप तुज भासे ॥ २ ॥
दृश्य भासे तेणें अज्ञान कल्पावें । कारण जाणावें देहद्वयां ॥ ३ ॥
वेगळाचि तिहीं देहाविलक्षण । अससी आपण साक्षीरूपें ॥ ४ ॥
साक्षीरूपें तुज जाणीव नेणीव । नाहींच कीं भाव वृत्तीचा हा ॥ ५ ॥
साक्षीरूपें सर्व पदार्था जाणतां । तो कांही तत्वतां आत्मा नोहें ॥ ६ ॥
आत्मरूप मन बुद्धी अगोचर । आठव विसर जेथें नाहीं ॥ ७ ॥
रामनामें वृत्ती निश्चळीं त्या विरे । अविद्येचें वारें शांत होत ॥ ८ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ९ ॥

॥ २५ ॥

निवृत्ति उन्मनी निःशब्द विज्ञान । ऐसें समाधान अनिर्वाच्य ॥ १ ॥
अनिर्वाच्य येथ नाहीं जाणपण । आपुले आपण पुरातन ॥ २ ॥
पुरातन “अहंब्रह्म” हे वचन । ब्रह्म सनातन तूंची बापा ॥ ३ ॥
तूंची बापा ऐसा जाणसी जै तूंतें । ब्रह्मस्वरूपातें एकरूप ॥ ४ ॥
एकरूप ब्रह्मीं आत्मनिवेदन । भक्ती सत्य जाण नवमी ही ॥ ५ ॥
नवमी ही भक्ती स्वरूपीं आसक्ती । येणें लाभे मुक्ती स्वयंब्रह्म ॥ ६ ॥
रामनामें वेद वाक्याचें तें सार । प्रगटे साचार अंतरंगी ॥ ७ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ८ ॥

॥ २६ ॥

वेदशास्त्री भक्ती राघवाची सार । तेणें पैलपार पाविजेत ॥ १ ॥
गुणेंचि निर्गुण कळे सर्व खूण । म्हणुनि सगुण देव धरी ॥ २ ॥
धरावा सगुण निर्गुणाकरणें । पावावें सगुणें निर्गुणासी ॥ ३ ॥
स्वरूप रामाचे मनीं आठवावे । नाम उच्चारावें रात्रंदीस ॥ ४ ॥
तया नाहीं शोक तया नाहीं दुःख । दास म्हणे एक राम ध्यातां ॥ ५ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ६ ॥

॥ २७ ॥

दीस ना रजनी मन ना उन्मनी । ज्ञाता जनीं वनीं सारिखाची ॥ १ ॥
सांडूं नये भक्ती स्वधर्म विरक्ती । ब्रह्मज्ञान प्राप्ती रामदासी ॥ २ ॥
जो कां नित्यनेमें पठे यासी भावें । तयासी राघवें संरक्षीजे ॥ ३ ॥
संरक्षोनी त्यासी देऊनियां ज्ञान । मांडिल्या निर्वाण उडी घाली ॥ ४ ॥
थोर भाग्य त्याचे राम ज्याचे कुळीं । संकटीं सांभाळी भावबळे ॥ ५ ॥
ज्याने भावबळे धरिला अंतरीं । तया क्षणभरी विसंबेना ॥ ६ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ७ ॥

॥ २८ ॥

कळवळोनि मन आले हे उद्गार । प्राणी भवपार पावण्यासी ॥ १ ॥
विश्वलोकां तुम्हां असो दंडवत । बापांनों स्वहित करा वेगीं ॥ २ ॥
मृगजळ पूर वाहतो अपार । गुंतुं नका सार सांगितले ॥ ३ ॥
गुरुकृपें येथें निवडोनी हीत । राहारे निवांत ब्रह्मरूपी ॥ ४ ॥
शिणो नका व्यर्थ साधा परमार्थ । चुकवा अनर्थ संसारींचा ॥ ५ ॥
एकरूप पूर्ण ब्रह्म आत्मा नित्य । सत्य सत्य सत्य सांगितलें ॥ ६ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ७ ॥

॥ २९ ॥

सुलभ उपायें होण्या भवभंग । रचिले अभंग श्रीधारानें ॥ १ ॥
समर्थ कृपेचे कवच आपुलें । तुम्हां लेवविलें विश्वलोकां ॥ २ ॥
जो जो जें जें कांही वांछील हिताचें । रामपाठें साचें लाभें तया ॥ ३ ॥
भक्ती मुक्ती युक्ती साधन विरक्ति । साधे अंती मुक्ति रामापाठें ॥ ४ ॥
अठ्ठाविसाचा हा रामपाठ निका । संसारीचा धोका चुकवील ॥ ५ ॥
असाध्य तें साध्य रामपाठें होय । रामकृपा काय करुं नेणें ॥ ६ ॥
राम मुखें म्हणा राम मुखें म्हणा । तुम्हां रामराणा सोडवील ॥ ७ ॥

end-content-img