Upasana

श्री समर्थ पाठ

|| १ ||
चित्सूर्य सूर्याजी राणीव या जी का | राणूबाई लेका प्रसवली || १ ||
नारायण जो का नरा आयतन | सत्य सनातन ब्रह्ममूर्ती ॥ २ ॥
गुरुरूपे ब्रह्म नामरूपा आलें । विश्वासी लाधलें निजगुज ॥ ३ ॥
निजगुज सार साधारे स्वहीत ।। पायीं या निवांत रहा वेगीं ॥ ४ ॥
मायेसी असंग दाविण्या स्वज्ञान | केलें पलायन लग्नी ज्यानें ॥ ५ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुंया हा भव यया पंथे ॥ ६ ॥

|| २ ||
संसार जलधि अगाध अपार | कष्ट पैलपार पावाण्यासी ॥ १ ॥
जाणोनियां ऐसें दिनांचा दयाळू | भक्त कनवाळू प्रगटला || २ ||
आधीं करोनियां मग सांगितलें । विश्वजनां आले उपेगासी ॥ ३ ॥
ब्रह्मचारी महारुद्र अवतार | रामभक्तिसार सांगे जगा ॥ ४ ॥
वैराग्ये आगळा ज्ञानियां वरिष्ठ । रामभक्त श्रेष्ठ शिव जो का || ५ ॥
अनुपम्य तप स्वयें आचरीलें । विश्वजन धाले जयाचेनी ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव | तरुंया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ ३ ॥
ज्याने बाळपणी जगाच्या कल्याणा | केली विचारणा अहर्निशीं ॥ १ ॥
स्वार्थ त्यागोनियां भक्ति प्रेम जनीं । वाढविण्या वनीं वास ज्याचा ॥ २ ॥
दवादश वरुषे तीव्र तप केलें । जनांसी लाभलें तपस्तेज ॥ ३ ॥
तीर्थयात्रामिसें हिंडोनिया सर्व | ज्याने जग सर्व उद्धरिलें ॥ ४ ॥
सर्व संप्रदाय सर्व तो समाज | सूखी की सहज तपें ज्याच्या ॥ ५ ॥
सर्वही आयुष्य जगाच्या कल्याणा | वेचीयले जाणा जगी ज्यानें ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुंया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

|| ४ ||
धर्मग्लानि झाली मानहानी भली । काही न उरली चैतन्यता || १ ||
पारतंत्र्य बेड़ी यावनिक खोड़ी । गोविप्र सांकड़ी नेणो किती ॥ २ ॥
स्वधर्माभिमाना क्षयरोग जडे । पंडुरोग दडे स्वाभिमानी || ३ ||
मरतोंडे मढ़ी प्रेतकळा आली । व्यथेने पीडली बहुसाल || ४ ||
राष्ट्राचा तो काळ कंठगत झाला । या काळी लाधला वैदयराज || ५ ||
वैद्यराज माझा समर्थावतार | जो का रोगहर झाला राष्ट्रा ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ ५ ॥
ब्रह्मचर्याचा जो ओतीव पुतळा | संपूर्ण चित्कळा मुसावली ॥ १ ॥
तपस्तेज कळा शांतीने आगळा | दयेचा पुतळा मूर्तिमंत || २ ||
मृतां संजीवन तृषार्ता जीवन | क्षुधार्तासी अन्न मिळे जेवीं ॥ ३ ॥
लाधे महाराष्ट्रा पुर्वसंचीतानें । महाराष्ट्र ज्याने जीवविला ॥ ४ ॥
सूर्य तेजोराशी उजळीत जेवीं । प्रकाशित तेवीं महाराष्ट्रा ॥ ५ ॥
समर्थ चैतन्य ज्यांच्या योगें मान्य । महाराष्ट्र धन्य जाहलासे ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ ६ ॥
जिवंत अमोघ तेजस्वी वाणीने | जीवन हे ज्याने दिलें राष्ट्रा || १ ||
आशेचा वसंत स्फूर्तीचा जनक | ज्याची अलौकीक विचारणा || २ ||
कळी कांपे ज्यासी काळ धाके ज्यासी । तुळितां जयासी नसे साम्य || ३ ||
अधर्म खंडन धर्माचें मंडन । संतांचे जीवन जो का झाला ॥ ४ ॥
सज्जना विश्राम धार्मिका आराम । राष्ट्रा सुखधाम जो का असे ॥ ५ ॥
चैतन्याचा गाभा स्वतस्तेजें उभा । ज्याची दिव्य शोभा न वर्णवे ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुंया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ ७ ॥
राक्षस रावण निपटण्यालागीं । राम लागवेगी भूमि आला || १ ||
देवां सोडविलें ऋषी निवविले । धार्मिक पाळिले रामरायें || २ ||
असाह्य निधडा शूर पराक्रमी । तुलना विक्रमी नाहीं ज्याला ॥ ३ ॥
सज्जनां जीवन भक्तांचे पालन । अधर्म कंदन जयाचेनि ॥ ४ ॥
एकबाणी तैसा एकवाणी पूर्ण । भक्तजन पूर्ण धाले ज्यानें ॥ ५ ॥
ज्ञान्याचे जीवन योगियां जे ध्यान | राष्ट्रा निवडून दिले ज्याने ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुंया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ ८ ॥
वज्रदेही तैसा ब्रह्मचारी जो का | सामर्थ्याचा जो का पुतळाची ॥ १ ॥
धैर्याचा जो मेरू विदयेचा आगरु । ज्ञानियां जो थोरु भक्तराज || २ ||
गर्भीच जयाला सुवर्ण कांसोटी । काळ लाळ घोटी जयापुढे ॥ ३ ॥
भक्त-संरक्षणी रामरायें ज्याला | चिरंजीव केला जगामाजीं ॥ ४ ॥
रामभक्त जो का संरक्षिता स्वतां । सम ज्या तत्वता नाहीं कोणी ॥ ५ ॥
जाणोनियां ऐसें राष्ट्राच्या कल्याणा | मारुती-स्थापना केली ज्यानें ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव | तरुंया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ ९ ॥
योगीराय जैसा अर्जुनाकरवी । भूभार हरवी तयाकाळीं ॥ १ ॥
तेवीं श्रीसमर्थे शिवराया हातीं । गतभार क्षिती करविली ॥ २ ॥
सामर्थ्य जयाचें अतुल म्हणोनी । ‘समर्थ’ हे जनी नाव जया || ३ ||
जया नसे काहीं अशक्यचि मात । सर्वही इच्छित घडवी जो || ४ ||
राज्य स्थापियेले स्वातंत्र्य राखिलें । धार्मिक रक्षिले दिन जे का ॥ ५ ॥
साम्प्रतीही जरी वांछितसां मुक्ति । सांगतसे युक्ती हिची एक ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुंया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

|| १० ||
ऐका सांगतसे समर्थ-करणें | देवाच्या कारणें त्याग केला || १ ||
त्याग केला सर्व धर्मोद्धारालागीं । भक्ति प्रेम जगी वाढविण्या ॥ २ ॥
वाढविण्या शांती स्वधर्म विरक्ति । कष्ट बहु प्रीतिं सोशीयेले ॥ ३ ॥
सोशीयेले कष्ट तारियेले भ्रष्ट | पतित जे नष्ट धर्मद्रोही ॥ ४ ॥
धर्मद्रोही तेची धर्म रक्षिण्यासी । उदार प्राणासी केले ज्याने ॥ ५ ॥
केले ज्याने सर्व हिंदू एके ठायीं । “मरा धर्मापायी” सांगितलें ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुंया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ ११ ॥
रामराये कैसें वानरांच्या हातें । राक्षस दळातें मारविलें ॥ १ ॥
तेवीं श्रीसमर्थे मावळ्यांच्या हातें । दुष्ट यवनाते निर्दाळिलें ॥ २ ||
स्फूर्तीदिनकर राष्ट्रा या लाधला । जेणें सुखी झाला सर्व लोक ॥ ३ ॥
स्वधर्म-स्थापना अधर्म-खंडना । भूमी जनार्दना येणें झालें ॥ ४ ॥
घातिली सांगड प्रपंच परमार्था । जीवा सत्य स्वार्था दावियेले ॥ ५ ॥
भक्तां मेरुमणी ज्ञान्यां कंठमणी । वैराग्याची खाणी जो का झाला ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ १२ ॥
सुर्यापासोनिया जेवीं स्फुर्तीकर | होती विश्वभर पसरोनी ॥ १ ॥
समर्थ गुरुचे तेवीं परिकर । शिष्य ते अपार विश्वभरी || २ ||
प्रत्येक तो शिष्य वैराग्य आगळा | शोभे ज्ञानकळा जया अंगी ॥ ३ ॥
चैतन्याची स्फुर्ती पहातां ज्यालागी । ऐसे जो विभागी शिष्यगण ॥ ४ ॥
जयाचिये कृपे उद्धव कल्याण | भानजी वामन वासुदेव ॥ ५ ॥
अनंत ते शिष्य अक्का वेणु आदि । विश्व भवव्याधी घालवीत ॥ ६ ॥
नक्षत्र मालिकी शोभे चंद्र जेवीं । शिष्यगणी तेवी शोभे प्रभु ॥ ७ ॥
कुबडी माळ झोळी एकची लंगोटी । काळ धाके पोटी पाहतां ज्या ॥ ८ ॥
वैराग्य सामर्थ्य ज्ञानाचा वसंत | राष्ट्रासी बहुत शोभा ज्याने ॥ ९ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव | तरुया हा भव यया पंथे ॥ १० ॥

॥ १३ ॥
कितीतरी काल अरण्यी एकांतीं । निर्विकल्प स्थिती राहोनिया ॥ १ ॥
जगाचिया हिता दयाळू होवोनी । जो जगद्वनीं विचरत ॥ २ ॥
हाती माळ पाहा रामची तारक | रामनाम एक साधन हें ॥ ३ ॥
“अखंड हे नाम उच्चारा रे मुखें । काळ तुम्हां धाके आम्हासम ॥ ४ ॥
केले, करी तुम्हां सांगितलें हीत । रामनामें कृत्य सर्व साधे” || ५ ॥
ज्या हातींची माळ ऐसें जगाप्रती । सांगते त्याप्रिती शरण या ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ १४ ॥
शांत तेजोराशी विचरे महीवरी । जीवन पसरी दर्शनेची ॥ १ ॥
पूर्ण चंद्र जैसा जीवन चकोरा | तैशापरी नरां सर्वांलागीं ॥ २ ॥
‘रामनामें आम्हा योग सिद्ध झाला’ । दाविण्या घेतला योगदंड ॥ ३ ॥
काळासी उदंड दंडू रामकृपे । योग शक्ती सोपें विश्वकार्य ॥ ४ ॥
सव्यकारी माळ नाशा भवजाळ | जिंकण्यासी काळ दंड दुज्या ॥ ५ ॥
कांसोटी कौपिन शांती प्रभा फांके | झोळी ज्याच्या काखे विराजीली ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ १५ ॥
जगाचे जीवन बाह्य मुसावलें । सुखें सुखावले दृष्टीपुढें ॥ १ ॥
ज्याच्या पदधूळी अरीष्टांची होळी | आनंदसमेळी दर्शन तें ॥ २ ॥
सोलीव चैतन्य भासे दृष्टी पुढे । लीन जन गाढे लोटांगणी ॥ ३ ॥
मृदू हास्य ज्याचे कृपादृष्टीयुक्त । पाहतां निवांत लोक होती ॥ ४ ॥
भिक्षे स्वामी जातां नुरे भवव्यथा । आनंदी मग्नता जयकारी ॥ ५ ॥
मृदू मंजुळ तो ध्वनी की श्लोकाचा | येतां कानीं ज्याच्या मन निवे ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव | तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ १६ ॥
अष्ट महासिद्धी उपेक्षुनी दीक्षा । घरोघरी भिक्षा मागे देव ॥ १ ॥
निजानंद सुखी वैराग्याचे भाग्य । भोगणे की योग्य महाजना ॥ २ ॥
जगाच्या कल्याणा अवतार जाणा । झाली विचारणा तयाकाळी || ३ ||
आनंद-चिद्रसे ओतीव घडला | पाहता ज्या डोळा समाधान ॥ ४ ॥
शुकाचे वैराग्य वसिष्ठाचे ज्ञान | वाल्मीकाचे गान जया अंगी ॥ ५ ॥
नारादापरी जो सर्व-कला-पूर्ण । व्हाया उद्धरण जगताचें ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

|| १७ ॥
नीती न्याय श्रद्धा चातुर्याचा गाभा । विश्वेश्वरी आंबा-वर-दत्त ॥ १ ॥
क्षत्रीय वृत्तीचा कोरीव पुतळा । मनाचा कोवळा अरिंदम ॥ २ ॥
शौर्यपंचानन सद्यशाचा रवि । दर्शनें नीववी सज्जन जो || ३ ||
धर्मराजापरी धर्म संरकक्षणीं । अविद्या जो रणी प्राणहर |॥ ४ ॥
कर्णापरी दाता मान्य साधुसंता | राष्ट्रा स्वतंत्रता जयाचेनी ॥ ५ ॥
जनक जो दुजा शिव छत्रपती । विदेह जगतीं कृपें ज्याच्या ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ १८ ॥
भूवैकुंठ ख्याती जयाची जगतीं । प्रेमछंदे गाती भक्त जेथें ॥ १ ॥
नामाचा गजर कोंदोनिया राहे । मन गुंग पाहें जया नादी ॥ २ ॥
भक्ति प्रेमा जेथें सदा नांदणुक | मोक्ष हा पायिक जेथे झाला ॥ ३ ॥
क्षीराब्दीनायक पंढरीसी आला | पुंडलीकें केला उपकार ॥ ४ ॥
अनंत ब्रह्मांडे साठवी उदरीं | तोचि हा श्रीहरी विटे उभा ॥ ५ ॥
धन्य श्रीसमर्थ दाविण्यासी लोकां । अयोध्येसी जो का राम झाला ॥ ६ ॥
अयोध्या पंढरी श्रीराम विठ्ठल | जेणें तो अतुल नमा त्यासी ॥ ७ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ८॥

॥ १९ ॥
गिरिं गुहेमाजी एकांत विजनीं । जयाच्या अवनीं राम सज्ज || १ ||
नाथपंथी बाळ होवोनी श्रीराम | करी सेवा काम समर्थांचे ॥ २ ॥
समुदायी गुप्त अरण्यी प्रगट । होत हा चोखट सेवेकरी ॥ ३ ॥
धन्य भाग्य त्याचें जयाचा सेवक । त्रिलोक-नायक विष्णु झाला ॥ ४ ॥
साक्षात श्रीविष्णूसी करणे सेवा ज्याची । उपमा कोणाची दयावी तया ॥ ५ ॥
समर्थ’ हे नाम शोभे तयालागी । प्रभु जयालागी सेवेकरी ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ २० ॥
प्रेमळ शेटी नामें वर्षे एकादश | नैवेद्य परेश करी स्वतां ॥ १ ॥
कोणासी न कळे कोण हा संसारी । पुढे सज्जनगिरी गुप्त झाला ॥ २ ॥
जयाची किं सेवा वांछित श्रीहरी । तया या संसारी सरी कोणा ॥ ३ ॥
समर्थांची सेवा केली लक्ष्मीकांतें । आश्चर्य मज तें नोहे कांहीं ॥ ४ ॥
प्रल्हादपंत भोळ्यारामदी शिष्यांची ।केली सेवा साची देवरायें ॥ ५ ॥
ज्याच्या शिष्यासाठी राबत श्रीहरी । काय त्याची थोरी वर्णावी हो ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ २१ ॥
परमहंस धर्म जागविण्या क्षितिं । अवतार घेती देवत्रय ॥ १ ॥
ब्रह्मानंद सुखें तृप्त तदाकार । नाहीं ज्या विकार जगतीचा || २ ||
सच्चिदघनानंदी अस्तित्व जयाचें । ओझे मायिकाचे जया नाहीं ॥ ३ ॥
जयामुखीं शोभा सच्चिदानंदाची । पदत्रीतयाची शोभतसे ॥ ४ ॥
स्वरूप भक्तांसी दिलेसे म्हणोनी । दत्त ऐसें जनीं म्हणती ज्या ॥ ५ ॥
दत्त अवधुते जया बरोबरी । स्वपात्रामाझारी जेवियेलें ॥ ६ ॥
समर्थ मद्रूप दाविण्या स्वभक्तां । योगदंड स्वतां दिला ज्यासी ॥ ७ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ८ ॥

॥ २२ ॥
एकाच पिंडाचे जरी पांच जण | परि राम जाण श्रेष्ठ जैसा ॥ १ ॥
समर्थ-पंचकी तेवीं श्रीसमर्थ । समस्ती समर्थ तयापरी ॥ २ ॥
चहुं महावाक्य ब्रह्मैक्य विज्ञान | तेवीं जो का जाण चौघांमध्ये ॥ ३ ॥
केशव रंगोबा श्रीआनंदमूर्ती । जयरामें पूर्ती चतुष्काते ॥ ४ ॥
चहुं वाणीमध्ये जैसा अंतरात्मा । शोभे परमात्मा तेवीं चौघीं ॥ ५ ॥
समर्था समर्थ प्रगटे यथार्थ | टाळण्या अनर्थ जगताचा ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ २३ ॥
अकराशें मुख्य मठ स्थापियेले । चैतन्य आणिले हिंद देशा ॥ १ ॥
आत्मा जैसा गुप्त राहोनी शरिरी । ज्याची तैशापरी वर्तणूक || २ ||
प्रयत्न तो देव सांगितला ज्यानें । विदेहस्थितीनें भक्तिमार्ग ॥ ३ ॥
स्वरूपी राहोनी सर्व काही कर्म । ज्यानें ऐसा धर्म सांगितला ॥ ४ ॥
जेवीं व्याप तेवीं वैभव राष्ट्राला | आणि उदयाला सांगोनी हें ॥ ५ ॥
करता करविता राम हे मानोनी । धर्मोद्धारा ज्यांनी सांगितले ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ २४ ॥
हुरमुजी रंगाचा उंच मोतीदाणा | रामदासी बाणा रंगाचा या ॥ १ ॥
पीतवर्ण कांती तेज अघटीत । आवळू शोभत भृकुटीमाजी ॥ २ ॥
रामनाम मुद्रा द्वादश हे टिळे | पुच्छ तें वळवळे कटीमाजी ॥ ३ ॥
काष्टाच्या पादुका स्वामींच्या पायांत । स्मरणी हातात तुळशीची ॥ ४ ॥
कौपिन परिधान मेखळा खांद्यावरी । तुंबा कुबडी करी समर्थांच्या ॥ ५ ॥
कृष्णातटाकासी जाहले दर्शन | वंदिले चरण तुका म्हणे ॥ ६ ॥
संत तुकारामें समर्थ म्हणोनी । ठेविला चरणीं माथा ज्यांच्या ॥ ७ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ८ ॥

॥ २५ ॥
महापापी जण जरी पूर्वीचे ते । सद्य साधूची ते कृपे हों ज्या ॥ १ ॥
कृपें हो ज्या सर्व होताती उपाय । नासती अपाय नानाविध || २ ||
नानाविध जन होताती सुबुद्ध । वाचितां प्रसिद्ध ग्रंथराज ॥ ३ ॥
ग्रंथराज करी प्रपंची परमार्थी | विश्वी सत्य स्वार्थी स्वानुभवें ॥ ४ ॥
स्वानुभवें मग निरसे अज्ञान | जें कां भेदभान स्वरूपाचें ॥ ५ ॥
स्वरूपाचे भान ज्याच्या योगें जीवा | तेथें मन लावा विवेकी हो ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ २६ ॥
सद्गुरू-चरित असे हो अनंत | ठाऊक समस्त कोणा होये ॥ १ ॥
वर्णाया नवचे चरित्र हो याचें । ओढे हे मनाचे प्रेमास्तव ॥ २ ॥
जीवन अनंत परी पोटापुरतें । घेवोनी तृषार्ते तृप्त होती ॥ ३ ॥
पाणी पाणवाटे सहजचि धावें । प्रेम हे स्वभावें तैशापरी ॥ ४ ॥
बोबड्या बोलाचे कौतुक जनका | तेवीं माझें देखा सद्गुरुसी ॥ ५ ॥
शक्त्यनुसार देव पुजावा हे सार | देवेंची विचार सांगितला ॥ ६ ॥
अनंत सुखाब्दी चिद्रसें भरला । मूर्त परी झाला भक्तासाठी ॥ ७ ॥
मायेमाजी भक्तां संरक्षिता स्वतां । म्हणोनी तत्वता गावें वाटे ॥ ८ ॥
पतितचि परी पदा ज्या लागोनी । पावन या जगी पाश-त्यागें ॥ ९ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ १० ॥

॥ २७ ॥
समर्थांची काया ब्रह्मीं गुप्त झाली । नाहीं कुठे गेली सत्य जाणा ॥ १ ॥
आतां जरी आम्ही एकाग्र मनानें । करुणावचनें प्रेमें बाहूं ॥ २ ॥
प्रगटोनी मूर्ती रक्षी आम्हांप्रति । अधर्माची स्थिती खन्डोनियां ॥ ३ ॥
सांगितला धर्म धरूं अंतरीं तो । ‘दासबोध’ जो तो विवरुंया ॥ ४ ॥
राहों आम्ही सदा सद्गुरुपदेशी । ना हों परदेशी कोण्या काळी ॥ ५ ॥
‘समर्थ’ ‘समर्थ’ गर्जू मुखें सुखें । जाती भवदुःखें जयाचेनि ॥ ६ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ७ ॥

॥ २८ ॥
“स्वरूप सांडोनी मीच देह भावी । तो जीव रौरवी पचईल ॥ १ ॥
पचईल नरकी देहाच्या संबंधे । सज्जनाच्या बोधे सांडवला ॥ २ ॥
सांडूनी विवेक वेदमहावाक्य । जीव शिव ऐक्य जयाचेनी ॥ ३ ॥
जयाचेनी तुटे संसारबंधन | तयाचे वचन दृढ धरा ॥ ४ ॥
दृढ धरा मनीं अहंब्रह्म ऐसें” | समर्थे हे खासें सांगितलें ॥ ५ ॥
सांगितलें तें हें कळें तद्भजनें । सांगें तुम्हां तेणे सुगमोपाय ॥ ६ ॥
‘समर्थ ‘समर्थ’ गर्जु मुखें सुखें । जाती भवदुःखें जयाचेनी ॥ ७ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव । तरुया हा भव यया पंथे ॥ ८ ॥

॥ २९ ॥
समर्थे समर्थ करावें आम्हांसी । म्हणोनी प्रभूसी वर्णियेलें ॥ १ ॥
‘समर्थ पाठ’ दे सामर्थ्याचा पाठ । करोनीया पाठ समर्थ व्हा ॥ २ ॥
समर्थसेवेचे भाग्य ज्या लाभलें । श्रीधरें त्या केले अभंग हे || ३ ॥
समर्थदर्शन उघडे येथ घडे । दौर्बल्य विघडे राष्ट्राचेंची ॥ ४ ॥
अभंग अठ्ठावीस ‘समर्थपाठा’ चे । सामर्थ्य राष्ट्राचे सत्य जाणा ॥ ५ ॥
अभंग सामर्थ्य अभंगे या जोडे । मोक्षहि आतुडे निज सौख्ये ॥ ६ ॥
निजधर्म तेजें विश्वमौलीमणीं । होवोनी अवनी शोभे राष्ट्र ॥ ७ ॥
‘समर्थ’ ‘समर्थ’ गर्जु मुखें सुखें । जाती भवदुःखे जयाचेनी ॥ ८ ॥
तयाच्या चरणी ठेवोनिया भाव | तरुया हा भव यया पंथे ॥ ९ ॥

end-content-img