Literature

भजस्वमाम्

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्वमाम्’ ‘असारे इह संसारे सारमेकं हरेः पदम् !’

असार असलेल्या ह्या संसारांत श्रीहरिचरणयुगलांच्या ठिकाणी निष्काम भक्ति असणे ही एक साररूप गोष्ट आहे. तीमुळे नराचा नारायण होतो. आपणांस ज्याचा कंटाळा येत नाही असा एकहि पदार्थ ह्या जगांत नाही. आपणांस उपभोग्य वस्तूंची प्राप्ति होत असतां व उपभोग घेतल्यानंतरहि कोणतें ना कोणतें दुःख निर्माण केलें नाहीं असा कोणताहि उपभोग नाही. आपल्या देहाइतका किळसवाणा असा दुसरा कोणताहि पदार्थ नाही. मानवदेह हा अत्यंत किळस आणणारा आहे. आपलाच काय किंवा इतरांचा काय, सर्व मनुष्यमात्रांचा देह हा किळसवाण्या पदार्थांचे आगरच होय. अशा देहामुळे तिरस्कार उत्पन्न न करणाऱ्या कोणत्या सुखाचा उपभोग घेता येईल ? अर्थात कोणत्याहि सुखाचा उपभोग घेता येणार नाही. ह्या देहाने उपभोगिल्यानंतर कंटाळा न आणणारा असा जो कोणता पदार्थ असेल तर ते फक्त हरिचरणारविंदच होत. तें सुख म्हणजे फक्त हरिचरणारविंदसुखच. तें सुख अनुभवित असतां देहभान रहात नाही. ह्या उत्कट भक्तीमुळे उत्पन्न होणारे सर्वार्षिक सुख होय. परमात्मा निरवधि आनंदरूप असल्याने त्यापासून मिळणारा आनंदहि तसाच निरवधि आनंदस्वरूप असतो. सातिशय पदार्थांचे सुख सोडून ह्या निरतिशय सुखासाठी यत्न करण्यानेच ह्या मनुष्यजन्माचें सार्थक होतें. जगांतील सर्व सुखे दुःख, भय, शोक, चिंता, कंटाळा, अपूर्णता, अनुकूल मनप्रवृत्ति, देशकाल, वस्तूंचे सापेक्ष व इत्यादींनी परिपूर्ण आहेत. ह्यांच्या अगदी उलट जें सुख तेंच परमात्मसुख. तें सर्वनिरपेक्ष, स्वयंसिद्ध, अखिल दुःखरहित, शोकशून्य, निर्भय, चिंता न करणारे उलट चिंता दूर करणारे आहे.

समासक्तं यथा चित्तं जंतोविषयगोचरे। यद्येवं ब्रह्मणिस्यात् कोन मुच्येत बन्धनात् ॥’

आपण विषयावर जेवढी प्रीती करतो तेवढीच प्रीती देवाच्या ठिकाणी केल्यास विषयचिंतना इतकेंच भगवत् चिंतन केले तर, विषयांत जेवढी आसक्ति ठेवतो तितकीच आसक्ति भगवंताच्या ठायी ठेवल्यास कोण बरें मुक्त होणार नाही? कोणाचे भवबंधन आपोआप नाहीसे होणार नाहीं? भगवंताची भक्ति करण्यासाठी इतर कोणत्याच विशिष्ट अभ्यासाची आवश्यकता नाही. देहास आवश्यक वाटणारे पदार्थजन्य सुख हे सुख नसून दुःखच होय. वारंवार कितीहि उपभोग घेतला तरी आतापावेतो कोणासहि त्यांपासून तृप्ति किंवा समाधान प्राप्त झाले नाही. त्याच्यामध्ये सुख नसतांना तें सुख आहे असे मानून विषयांचा कितीहि उपभोग घेतला तरी मुळांतच तें दुःखरूप असल्याने शेवटी त्यापासून एका दुःखाशिवाय आणखी दुसरे काय पदरांत पडणार? तसेंच त्यामुळे कोणतें भाग्य लाभणार ? “सुखं स्वप्नेऽपि दुर्लभम।। विषयभोगापासून स्वप्नांतहि सुख लाभणे दुर्लभच. ह्या गोष्टींची अनुभवानें परीक्षा घेतली गेली आहे. शीतावरून भाताची परीक्षा करताना ना तसेंच. अन्य पदार्थामुळे अन्य इंद्रियांमुळे अन्य इंद्रियांमुळे स्वत:च्या देहेंद्रियामुळे होणारे सुख विषयसुखच असल्याने विषयसुखाचें एक सर्वसामान्य लक्षण पाहिले तर ह्या भूलोकांतच नव्हे तर स्वर्गलोकींच्या सुखाचाहि त्यांत अंतर्भाव होतो. कोणत्याहि एका खाण्यापिण्याच्या पदार्थांचे सुख पहा ! सर्वच पदार्थ तिरस्कार उत्पन्न करतात असें आपणास म्हणावे लागेल. देहाकरता एखाद्या गोष्टीची इच्छा उत्पन्न झाली तर सर्व देहाचीच इच्छा उत्पन्न होईल असें आपणास मानावें लागल. अशा एखाद्या व्यक्तीच्या तोंडाची दुर्गंधी येऊन मन विटून गेलें तर त्यायोगें इतर सर्व इंद्रियांचा तिरस्कार कमी जास्त प्रमाणांत येईल, असे गृहित धरावे लागेल. देहेंद्रियांच्या सभोगाने दु:ख होते, असा एक नियम ठरल्यावर कोणताहि देह असो वा परलोकी असो, सर्व ठिकाणी तें दुःखरूपीच आहे असे सिद्ध होतें. दृग्गोचर होणारें देह, इंद्रिये आदि जगांतील पदार्थ. ह्याना निजसुख नाही असे म्हटल्यावर जगाच्या कणाकणांत असूनहि जगाच्या बाहेर असणारा श्रीहरीच एकमेव ‘ सुखरूप ‘ आहे. ‘सुखमय’ आहे असें ठरते. सुखासाठी आपण त्याचाच आश्रय घेतला तर सुख मिळेलच मिळेल. जगांतील दृश्य पदार्थाचा कितीहि उपभोग घेतला तरी त्यापासून सुख मिळत नाही ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. जन्मलेल्यास मृत्यु हा आहेच. उत्पन्न होऊन नष्ट झालेल्या पदार्थात सुख आहे असें एकदा म्हटले तरी तेंहि भासमान होऊन नष्ट होत असल्याचेच स्पष्ट होते. तेव्हां असें नष्ट होणारे सुख तें सुख नव्हेच. सुखच नष्ट झाल्यावर मग दुसरे काय साध्य होणार? दु:ख नष्ट व्हावें, सुखाचा नाश होऊ नये. असेच आपल्याला वाटत असते. दुःख नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्यावर ते नष्ट केल्याचा अनुभव आपणास असल्यामुळे दुःखास नाश आहेच ही गोष्ट आपोआपच सिद्ध होते. ह्या विधानामुळे उत्पन्न होऊन नष्ट होणारे पदार्थ दुःखरूपी असल्याकारणाने त्यांच्या उपभोगाने दुःखच प्राप्त होणार हे कोणालाहि समजल्यासारखे आहे. उत्पन्न होऊन नष्ट होणे’ हे दुःखाचे लक्षण असल्याने त्याविरुद्ध सुख म्हणजेच उत्पत्तिनाशरहित, नित्य, अखंड असून केव्हांहि कोणत्याहि विकाराने नष्ट न होणे ही सुखाची लक्षणे होत. उत्पत्तिनाशरहितच सुख. उत्पत्ति-नाश असणाऱ्या देहेंद्रिय, पदार्थ, क्रिया इत्यादींनी प्राप्त होण्यासाठी धडपडणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच नाहीं काय ? उत्पत्ति-नाश-शून्य सुख, उत्पत्तिनाश ह्यांनी परिपूर्ण भरून असलेल्या देहेंद्रियादि पदार्थांनी मिळवू, प्राप्त करूं असें म्हटल्यास दु:खापासून सुख अनुभवण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणेच ठरतें; दुःखासच सुख समजल्यासारखें होतें. ज्याचे त्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत असें जरी मानले तरी ते आपण मानल्यासारखें न ठरतां त्याच्या अनुभवाने त्याच्या यथार्थरूपाचा आपणास अनुभव येतो. अशा प्रकारे दुःखास सुख म्हणून अथवा उत्पत्तिनाश असणान्या जीव पदार्थामध्ये आपण तें कितीहि सुखदायक म्हणून इच्छा करून, जगोत्पत्तीपासून जगाच्या अंतापर्यंत पूर्णपणे त्यांचा अनुभव घेतला तरी त्यापासून शेवटी आपणास प्राप्त होणार ते फक्त दुःखच !!

कार्य म्हणजे झालेलें. झालेले म्हणजे कोणत्यातरी वस्तूपासून उद्भवलेलें, जन्मलेलें. ज्याच्यामुळे तें जन्मलें तें त्याचे कारण होय व जें जन्माला आले तें कार्य. उत्पन्न होतांना, उत्पन्न झाल्यानंतर व उत्पन्न होऊन नष्ट झाल्यानंतरहि सत्तारूपाने त्याचे कारण रहात असल्यामुळे कारण हे उत्पत्ती, स्थिति व नाश यांनी शून्यच असतें हैं सिद्ध होते. कार्य उत्पन्न होत असतां त्यास आधाररूप असलेले कारण, कार्योत्पत्ति नंतर तें टिकविण्याकरता त्यास रहावे लागते. तसेंच तें कार्य लय पावत असतांनासुद्धा त्यास आधाररूपानें कारण असावें लागते. अशा प्रकारे कार्याची उत्पत्ति, स्थिति व लय ह्या तिन्ही काळी कारण अस्तित्वात असल्यामुळे तें अविनाशी आहे असेंच म्हणता येईल. जड असणारे कार्य आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या चैतन्यरूपी कारणापासून निर्माण होत असल्यामुळे कार्याला स्वत:ची स्वत:वरच सत्ता नाही अशा प्रकारचे त्यास अस्तित्व असतें, तसेंच लय पावणे हे सुद्धा आपल्या कारणरूप असलेल्या चैतन्यामुळेच घडते हे सुद्धा स्वतःच्या अधिकाराने घडत नाहीं हेंहि आतां सिद्ध होत नाहीं काय? कार्य व कारण हे दोनच विभाग आहेत. कार्य हे उत्पत्ति, स्थिति व लय यांनी युक्त आहे तर कारण हे उत्पत्ति, स्थिति व लय ह्यांनी रहित आहे असें सिद्ध झाल्यावर कारण हेच मुख्य ठरते. कार्य दुःखरूपी आहे हे सिद्ध झाल्यावर कारण हेच एकमेव आनंदरूप आहे हे सिद्ध होते. चैतन्यरूपी परमात्मा जड अशा कार्यापासून जन्मला की चैतन्यरूप परमात्म्यापासून जड अशा कार्याचा जन्म झाला? परमात्म्यापासून कार्य जन्मले असल्याने परमात्माच कारण ठरतो. कारण हे सुखरूप असल्यामुळे परमात्माच एकमेव सुखस्वरूप आहे हे सिद्ध होते. परमात्म्यास किंवा परमात्मस्वरूप सुखास उत्पत्ति, स्थिति, लय आहे असे म्हटल्यास परमात्म्यापासून प्राप्त होणारे सुख सुद्धा कार्यात सामावून कारण हे एक वेगळेच असेल. त्यालाहि कार्य म्हणून म्हटले तर कशाला तरी कारण म्हणून गृहित धरावे लागेल. अशाप्रकारे प्रलयकालापर्यंत आपण गृहित धरू लागलों तरी तें संपणार नाही. तें अनवस्य दोष म्हणून सांगण्यांत आल्यामुळे कारणरूप असलेल्या परमात्म्यास किंवा त्याच्या रूपसुखास उत्पत्ति, स्थिति व नाश नाही ही गोष्ट खरी आहे, सत्य आहे. त्याची प्राप्ती करून घ्यावयाची असल्यास त्यालाच, त्या परमात्म्यालाच शरण गेले पाहिजे. ह्याशिवाय कार्यात समावेश होणाऱ्या उत्पत्तिस्थिति-लयानी समाधिष्ठित असलेल्या इतर कोणत्याहि पदार्थ, प्राणी यांना शरण गेलो तर शाश्वत सुख मिळणार नाही हे स्पष्ट असल्यामुळे अनित्य आणि दुःखरूपी अशा ह्या लोकांत तुम्ही जन्मला असतां ह्यास सुख असे गृहित न धरतां, सुखासाठी हे प्राप्त न करतां ‘मीच सुख आहे’ असे गृहित धरून सुखासाठी माझी प्राप्ती करून घे असें श्रीकृष्ण भगवानानी सांगितले आहे.

परमात्मसुख अथवा खरें सुख कसे मिळवावें ? याचा आतां विचार करूया ! कारण म्हणजे सुख. कार्य म्हणजे दुःख याप्रकारे जगांत कार्यकारण, दु:ख-सुख ह्या दोनच गोष्टी आहेत. या खेरीज तिसरी गोष्ट नाहीं असेंच यावरून ठरते. आपण कार्य झालो तर दुःखरूपी होऊ व कारण झालों तर सुखरूप होऊ. सुखाची प्राप्ती करून घ्यावयाची म्हणजे आपण स्वतःच सुखरूप झाले पाहिजे; असाच अर्थ होतो. आपण ‘सुखरूप’ व्हावयाचे म्हणजे ‘सुखरूप ‘ असा परमात्माच आपल्या स्वरूपांत आहे असें जाणावें. आनंदरूपच आपलें रूप आणि बाकी सर्व कार्य दुःखरूप म्हटल्यावर सुखास, आनंदास दुःखाची इच्छा नसल्याने आनंदरूपी असलेल्या आपणास दुःखाची म्हणजे कार्याच्या कार्यात समाधिष्ठित असलेल्या कोणत्याहि जीव वा पदार्थाची इच्छा होणें असंभवनीय आहे असेंच ठरेल व आनंदामध्ये दुःख नसल्यामुळे आनंदरूप अशा आपणांत दुःखरूप असणारे कार्य नाही असाच त्यांतून अर्थ निघतो. कार्यरहित असें कारणच आपण आहोत असें ठरल्यावर दुसरें दुःख नसून आपण सर्वजण एकमेव आनंदरूपी ब्रह्मतत्त्व आहोत असे स्पष्ट होते. दुसरे काही नाही असे म्हटल्यावर दुसरा कोणताहि विचार किंवा इच्छा भोग-भोग्या आणि भोक्तृभाव आपणास नाही असाच अर्थ निघतो. कार्य जडरूप असल्याने व कार्य केवळ कारणरूप असल्याने आपणांस दुसऱ्या कोणत्याहि प्रकारची भावनाहि नसल्याने आपण एक आनंदरूप अन्यनिरपेक्षित असल्यामुळे एका आनंदरूपाची निष्ठाच त्या निर्विकल्प आनंदरूपामुळे खऱ्या आनदाची किंवा ब्रह्मारूपी परमात्म्याची नित्य प्राप्ती झाली असें वाटणार नाही का?

सर्वे जनाः सुखिनो भवन्तु ।’

home-last-sec-img